भारतासह जगभरात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) मोठा गाजावाजा होत असतानाच ‘एआय’चे गॉडफादर म्हणून ओळखले जाणारे डॉ. जेफ्री हिंटन यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचे धोकेही समोर आणले आहेत. पुढील ३० वर्षांत ‘एआय’मुळे मानवी उपयोगिता नामशेष होण्याची शक्यता २० टक्क्यांपर्यंत वाढली आहे. शक्तिशाली एआय प्रणालींमुळे निर्माण हेाणारे धोके कमी करण्यासाठी त्याच्या नियमनावर भर देण्याचे आणि सरकारी हस्तक्षेपाचे आवाहन ते करतात. डॉ. हिंटन यांनी समोर आणलेल्या ‘एआय’ धोक्यांविषयी…
कोण आहेत डॉ. जेफ्री हिंटन?
डॉ. जेफ्री हिंटन हे ब्रिटिश कॅनेडियन संगणक शास्त्रज्ञ आणि संज्ञानात्मक मानसशास्त्रज्ञ (कॉग्निटिव्ह सायकॉलॉजिस्ट) आहेत. ते त्यांच्या कृत्रिम न्यूरल नेटवर्क क्षेत्रातील योगदानाबद्दल प्रसिद्ध आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्राचे प्रणेते अशी त्यांची ओळख आहे. मात्र आता त्यांनीच एआय विकासाशी संबंधित संभाव्य धोक्यांबाबत इशारा दिला आहे. ‘बीबीसी रेडिओ’ला दिलेल्या मुलाखतीत हिंटन यांनी संकेत दिले की, पुढील तीन दशकांमध्ये एआयमुळे मानवी उपयोगिता नामशेष होण्याची शक्यता १० ते २० टक्क्यांपर्यंत वाढली आहे. सध्या कृत्रिम बुद्धिमत्ता मानवी बुद्धिमत्तेपेक्षा वरचढ नाही. मात्र तीन दशकांनंतर कृत्रिम बुद्धिमत्ता मानवी बुद्धिमत्तेवर मात करू शकते. अत्यंत शक्तिशाली एआय तंत्रााच्या बुद्धिमत्तेच्या तुलनेत मानव लहान मुलांसारखा असेल. एखाद्या तीन वर्षांच्या मुलाची जितकी बुद्धिमत्ता असते, तितकीच बुद्धिमत्ता एआय तंत्रापुढे मानवाची असेल, असा धोकादायक इशारा देण्यात आला आहे. म्हणजेच मानवी बुद्धिमत्तेची आवश्यकता असलेली कार्ये करणारी संगणक प्रणाली म्हणून केली जाऊ शकते.
हेही वाचा : विश्लेषण : भारतीय लष्करातील प्राणी-विभागावर ‘कॅग’चे कोणते ठपके?
‘एआय’चे तोटे काय असू शकतात?
आज मानवी बुद्धिमत्तेवर आणि कार्यक्षमतेवर जी कामे केली जातात, ती संगणक प्रणालीद्वारे केली जाणार आहेत. त्यामुळे मानवी उपयोगिता कमी होऊन संगणकाचे महत्त्व वाढणार आहे. ज्याचा धोका मानवी संस्कृतीवरही होण्याची भीती संशोधक व्यक्त करतात. मानवी हाताचे काम संगणक हिसकावून घेणार असल्याने मानवी अवलंबित्व कमी होऊन बेरोजगारी वाढण्याची शक्यता आहे. ‘एआय’मुळे माणसाला काही स्वरूपाच्या मदतीसाठी मानवी सहकार्याची गरज भासत नाही. संकेतस्थळावर ग्राहकांशी संवाद साधताना चॅटबॉटचा वापर, पत्ता शोधण्यासाठी नकाशे, वाहतुकीसंदर्भात माहिती मोबाइलमध्ये उपलब्ध असते. मात्र या सर्व सुविधांमुळे मानवाचे स्वत:च्या बुद्धिमत्तेवरचे अवलंबित्व कमी होऊन मानवी बुद्धीच्या निष्क्रियतेला चालना मिळेल, अशी भीती तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. समाजमाध्यमांवर बनावट छायाचित्रे, मजकूर, चित्रफिती यांचा सध्या सुळसुळाट असून ‘एआय’मुळे त्यात मोठी भर पडण्याची भीती आहे. त्याशिवाय भविष्यात ‘एआय’चा वापर करून संहारक अस्त्राची निर्मिती होण्याची भीती आहे.
हिंटन यांनी ‘गूगल’चा राजीनामा का दिला?
‘एआय’ तंत्राचे प्रणेते डॉ. जेफ्री हिंटन यांनी दीड वर्षांपूर्वी गूगल कंपनीचा राजीनामा दिला. त्याला कारणही एआयचे संभाव्य धोके हेच होते. सध्या तंत्रज्ञानाचा झपाट्याने विकास होत असून काही वर्षांत कृत्रिम बुद्धिमत्ता मानवी प्रज्ञेला मागे टाकेल. गूगलमध्ये काम करत असताना या धोक्यांबाबत मोकळेपणाने बोलता येत नव्हते. मात्र राजीनाम्यानंतर आता या धोक्यांबाबत बोलण्याचे स्वतंत्र आहे, असे हिंटन सांगतात. एखादा संहारक वृत्तीचा माणूस ‘एआय’चा वापर हानिकारक हेतूंसाठी करू शकतो. ही भावना कृत्रिम सामान्य बुद्धिमत्तेच्या (एजीआय) उदयासंबंधी एआय सुरक्षा समुदायातील व्यापक भीतीशी संरेखित करते, जी मानवी नियंत्रण टाळून अस्तित्वाला धोका निर्माण करू शकते, असे हिंटन सांगतात.
हेही वाचा : महाराष्ट्रातील शासकीय बंगल्यांना नावे देण्याची परंपरा नेमकी काय आहे?
नियमन हवेच?
‘‘आज आपण जिथे आहोत, तिथे कालांतराने ते असेल’’ अशी भीती हिंटन एआयच्या धोक्यासंबंधी व्यक्त करतात. एआयमुळे मानवी संस्कृतीलाही बाधा येऊ शकते. त्यामुळे तिचा धोका टाळण्यासाठी काही नियमावली करणे आवश्यक आहे, असे ते सांगतात. त्यांनी एआयच्या नियमनावर भर दिला. एआयमुळे होणारे धोके कमी करण्यासाठी एआय तंत्राला सरकारी नियमनाची गरज आहे, असे हिंटन म्हणाले. एआयचा वापर करण्यासाठी कंपन्यांसाठी नियमावली तयार करण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक देशाच्या सरकारांचे एआयवर नियंत्रण असणे आवश्यक आहे, असे हिंटन यांनी सांगितले. सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी केवळ नफा-चालित कंपन्यांवर अवलंबून राहणे अपुरे आहे. या मोठ्या कंपन्यांना सुरक्षिततेवर अधिक संशोधन करण्यास भाग पाडणारी एकमेव गोष्ट म्हणजे सरकारी नियमन आहे, असे ते सांगतात.
कोणत्या देशांमध्ये कायदे?
युरोपीय महासंघाने २०१४ मध्ये ‘कृत्रिम बुद्धिमत्ता कायदा’ तयार केला. कृत्रिम बुद्धिमत्तेचे नियमन करणारा हा जगातला पहिला कायदा आहे. या कायद्याबाबत युरोपीय महासंघातील अनेक देशांमध्ये करार झाला असून ‘एआय’ला कायद्याच्या चौकटीत बसविले आहे. नवी दिल्ली येथे गेल्या वर्षी ‘ग्लोबल पार्टनरशिप ऑन आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ची शिखर परिषद झाली. त्यात कृत्रिम बुद्धिमत्तेशी निगडित अनेक विषयांवर सखोल चर्चा झाली. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराबद्दल नियम आणि कायदे हवेत याबद्दल यात एकमत झाले. अमेरिकेने क्षेत्रीय स्तरांवर लक्ष केंद्रित करून एआय नियमनासाठी विकेंद्रित दृष्टिकोन निर्माण केला आहे. एआय धोका व्यवस्थापन आराखड्याचा मसुदा त्यांनी तयार केला आहे. अमेरिकेतील कोलेरॅडो राज्यात एआय नियमन कायदा लागू करण्यात आला आहे. सिंगापूरने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत, तर इस्रायलने एआय तत्त्वे, नियमन आणि नैतिकता यांवर सार्वजनिक सल्लामसलत करण्यासाठी एक श्वेतपत्रिका जारी केली. ऑस्ट्रेलिया, कॅनडा, चीन, ब्रिटन, इटली या देशांनीही एक नियमनाचे काही कायदे जारी केले आहेत. भारतात सध्या कोणतेही विशिष्ट कायदे नाहीत, जे थेट एआयचे नियमन करतात. एआय नियमनासाठी भारत अजूनही आपला दृष्टिकोन विकसित करत आहेत.
sandeep.nalawade@expressindia.com