Evolution of AI in Home Robotics: तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे मानवी जीवन अधिक सुलभ आणि स्मार्ट होत आहे. स्वयंचलित उपकरणे आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) आधारित तंत्रज्ञानामुळे अनेक क्षेत्रांमध्ये आमूलाग्र बदल होत आहेत. अशातच, घरगुती रोबोट्सचा उदय ही एक नवीन क्रांती ठरली आहे. वर्षाच्या सुरुवातीला दरवर्षी होणाऱ्या कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शोमध्ये त्या वर्षात येऊ घातलेल्या नव्या तंत्रज्ञानाची झलक पाहायला मिळते. यंदाच्या लास वेगास कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो (CES 2025) मध्ये घरगुती रोबोट्स हे प्रमुख आकर्षण ठरले. हे रोबोट्स केवळ घरातील कामे उरकण्यासाठी नाहीत, तर संवाद साधण्याची क्षमता असलेले, बुद्धिमान सहाय्यक म्हणून विकसित करण्यात आले आहेत. अंगणातील गवत कापणे, जमीन स्वच्छ करणे, किचनमध्ये मदत करणे, मुलांबरोबर संवाद साधणे, अगदी बारटेंडरिंगसारख्या सेवा देण्यापर्यंत त्यांची क्षमता विस्तारली आहे. परंतु, ही घरोघरी पोहोचणारी नवी यंत्रमानव क्रांती खरोखरच सुरू झाली आहे का? हे रोबोट्स बाजारात सहज उपलब्ध होत आहेत का? आणि सर्वसामान्यांसाठी ते कितपत उपयुक्त ठरू शकतात? या सर्व प्रश्नांचा या लेखात सखोल आढावा घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या वर्षीच्या लास वेगासमधील कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शोमध्ये एक ठळक ट्रेण्ड दिसून आला, तो म्हणजे रोबोटिक्सचा. घरगुती रोबोट्स लॉन कापणे, जमीन स्वच्छ करणे, पूल स्वच्छ करणे आणि घर नेटनेटके ठेवणे यासारखी कामे करताना दिसले.

सीईएसमधील रोबोट्स वेगळे का ठरत आहेत?

कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शोमध्ये वेगवेगळे रोबोट्स होते. त्यात रिचटेक रोबोटिक्सचा बारटेंडर ‘Adam’, संवादाची नक्कल करणारा रोबोट ‘Mirumi’, टॅंजिबल फ्यूचरने तयार केलेला ChatGPT तंत्रज्ञान असणारा वैयक्तिक सहाय्यक ‘Looi’ रोबोट, एन्कॅन्टेड टूल्सचा माणसाची वैशिष्ट्ये असणारा ‘Mirokai’ होम असिस्टंट, ओपनड्रॉइड्सचा घरकाम करणारा ‘R2D3’, जिझायचा ‘Mi-Mo’ आणि सॅमसंगचा प्रोजेक्टर रोबोट ‘Ballie’ यांचा समावेश आहे. हे बहुतेक रोबोट्स मानवी काम पार पाडण्यासाठी तयार करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे हा केवळ ऑटोमेशनचा चमत्कार नाही, तर हे थेट तुमच्याशी संवाद साधणारे रोबोट आहेत. यापूर्वी असे रोबोट्स केवळ कल्पनेत किंवा विज्ञानकथेतच अस्तित्त्वात होते.

यापूर्वीच्या रोबोट्सपेक्षा हे नवे रोबोट्स वेगळे आहेत का?

कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शोमध्ये यंदा प्रदर्शित झालेले रोबोट्स हे खूपच वेगळे आहेत. सीईएस २०२५ मध्ये सादर करण्यात आलेल्या रोबोट्समधील सर्वात मोठा बदल म्हणजे त्यांच्यातील संवादाची पातळी. उदाहरणार्थ, Mirokai या रोबोटमध्ये अ‍ॅनिमेटेड चेहरा आहे. तो जवळपास माणसासारखाच दिसतो. तो तुमच्याबरोबर संवाद साधण्यासाठी प्रोग्राम केला जाऊ शकतो. तसेच ‘if-this-then-that’ तंत्रज्ञानावर आधारित कोणतेही नवीन काम तो शिकू शकतो. याशिवाय, जनरेटिव्ह AI मॉडेल्स हे रोबोट्सच्या संवादक्षमतेला चालना देत असल्यामुळे हे केवळ विशिष्ट कार्यांसाठी तयार केलेले यंत्र राहिले नाहीत. त्यामुळे आता हे रोबोट्स घरांमध्ये अधिक प्रभावीपणे काम करू शकतात आणि केवळ यंत्रणांपुरते मर्यादित न राहता अधिक परस्परसंवादी आणि बुद्धिमान सहाय्यक ठरत आहेत.

हे रोबोट्स खरेदी करता येतात का?

Mirumi लवकरच ७० डॉलर्स या किमतीत विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. तर Looi हा रोबोट १६९ डॉलर्स देऊन खरेदीसाठी उपलब्ध आहे, तर Mi-Mo लॅम्प रोबोटची किंमत ३,५०० डॉलर्सपासून सुरू होते. मोठ्या मानवीय वैशिष्ट्यांसह असलेल्या रोबोट्सच्या किंमती जास्त आहेत. Mirokai ची किंमत ४० डॉलर्स, तर आरटूडीथ्रीची किंमत ६०००० डॉलर्स आहे. हे रोबोट्स यावर्षी खरेदीसाठी उपलब्ध असतील. या रोबोट्सची निर्मिती हा केवळ संकल्पनात्मक प्रकल्प राहिलेला नसून प्रत्यक्ष वापरासाठी ते बाजारात येत आहेत.

रोबोट्सच्या विक्रीचा वेग अजून का वाढलेला नाही?

घरगुती कामांमध्ये मदत करणारा रोबोट् ही संकल्पना अजूनही नवी आहे. आतापर्यंत बहुतेक रोबोट्स निश्चित आदेशांवर चालणाऱ्या अल्गोरिदमवर आधारित होते, त्यामुळे ते फक्त पूर्वनिश्चित कार्येच करू शकत होते. याशिवाय, त्यांच्यात नैसर्गिक संभाषणाची क्षमता नव्हती. AI मुळे आता रोबोट्स अधिक प्रगत होत आहेत. मात्र, भारतात उपलब्ध पर्याय खूप मर्यादित आहेत. उदाहरणार्थ, Miko रोबोट्स केवळ मुलांसाठी डिझाइन करण्यात आले गेले असून त्यांची क्षमता मर्यादित आहे. Emo हा रोबोट वैयक्तिक सहाय्यक म्हणून विकला जातो. परंतु, रोबोटिक्सच्या जागतिक बाजारपेठेत मोठी वाढ अपेक्षित आहे. या दशकात वार्षिक २०% दराने या बाजारपेठेचा विस्तार होईल असा अंदाज आहे.

AI मुळे रोबोट्स मोठ्या प्रमाणात स्वीकारले जात आहेत.

AI मुळे रोबोट्स मोठ्या प्रमाणात स्वीकारले जात आहेत. CES 2025 मध्ये सादर झालेल्या बहुतांश नव्या रोबोट्समध्ये जनरेटिव्ह AI चा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांचा माणसांबरोबरचा संवाद अधिक सुधारला आहे. लवकरच, नैसर्गिक भाषा प्रक्रिया (NLP) अल्गोरिदम रोबोट्सला मानवी आवाजावर आधारित आदेश आणि प्रतिसाद देण्यास सक्षम करेल. यंदाच्या रोबोट्सना भविष्यातील अपडेट्समुळे आणखी सुधारले जाऊ शकते. तज्ज्ञांनी या संदर्भात ‘मिंट’शी संवाद साधताना सांगितले की, पुढील पाच वर्षांत घरगुती सहाय्यक रोबोट्स आणि एखाद्या अपेक्षित व्यावसायिक कामासाठीचे कस्टमाइज्ड रोबोट्स विविध स्वरूपात भारतात मुख्य बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध असण्याची शक्यता आहे. याशिवाय, बाजाराचा विस्तार आणि उत्पादनाची वाढ यामुळे किंमतीही कमी होण्याची शक्यता आहे.

घरगुती रोबोट्सचे भविष्य आणि वास्तव

घरगुती रोबोटिक्स ही कल्पना रम्य वाटत असली तरी ती आता प्रत्यक्षात येत आहे. CES 2025 मध्ये प्रदर्शित झालेल्या नव्या रोबोट्सनी हे सिद्ध केले आहे. संवादक्षम आणि स्वयंचलित कार्यक्षमतेने सुसज्ज असलेल्या या रोबोट्समुळे घरातील रोजची कामे अधिक सुलभ होणार आहेत. परंतु, या रोबट्स क्रांतीचा व्यापक प्रसार होण्यासाठी काही महत्त्वाची आव्हाने अजूनही आहेत. किंमत, तांत्रिक मर्यादा आणि स्थानिक बाजारातील उपलब्धता यांसारख्या बाबी रोबोट्सच्या सार्वत्रिक स्वीकाराला अडथळा ठरू शकतात. तरीही, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबोटिक्समधील प्रगती पाहता येत्या काही वर्षांत हे रोबोट्स अधिक परवडणारे, कार्यक्षम आणि भारतीय घरांसाठी उपयुक्त ठरण्याची शक्यता आहे.