अयोध्या नगरीत राम मंदिराचा भव्य असा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. २२ जानेवारी रोजी पार पडणाऱ्या या सोहळ्याची तयारी सुरू झाली आहे. अयोध्या नगरी विविध धार्मिक कार्यक्रमांनी, भक्तगण आणि साधू-संतांनी दुमदुमली आहे. या सोहळ्याला हजारो भक्तगण, मोठ्या संख्येने साधू-संत आणि विशिष्ट व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. उत्तर प्रदेश सरकार शहराच्या सुरक्षेत कोणतीही कसर राहणार नाही याची काळजी घेत आहे. थल, जल, वायू अशा सर्वोपरी सुरक्षेच्या दृष्टीने अयोध्यानगरी सज्ज झाली आहे.

शहर सुरक्षेसाठी दहशतवादविरोधी पथकाचे कमांडो, बुलेटप्रूफ वाहने सोहळ्यापूर्वीच तैनात करण्यात आली आहेत. शहराची सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी आणि विशिष्ट व्यक्ती, यात्रेकरू व पर्यटकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी पहिल्यांदाच ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे.

अयोध्यानगरीच्या मजबूत सुरक्षेसाठी ‘एआय’ची भूमिका काय असेल? जाणून घेऊ सविस्तर…

अयोध्येला ‘एआय’ तंत्रज्ञान कसे सुरक्षित ठेवेल?

‘न्यूज१८’च्या माहितीनुसार, संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आणि पाळत ठेवण्यासाठी ‘एआय’ तंत्रज्ञान प्रणालीचा वापर करण्यात येत आहे. ‘एआय’ तंत्रज्ञानाद्वारे संपूर्ण शहरावर हवाई पाळत ठेवली जात आहे. ‘एआय’ तंत्रज्ञानावर आधारित ‘अॅंटी-माइन ड्रोन’चा वापर भूमिगत खदान, स्फोटक स्कॅन करण्यासाठी केला जात आहे. त्यासह ‘ड्रोन’, ‘एआय इंटिग्रेटेड कॅमेरा’देखील मंदिर सुरक्षेत मोठी भूमिका निभावणार आहे.

गुरगावस्थित ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स स्टार्टअप स्टैक टेक्नॉलॉजी’ने १५ जानेवारीला घोषणा केली की, जार्विस या ‘एआय’चलित ऑडिओ आणि व्हिडीओ विश्लेषण प्लॅटफॉर्मद्वारे रिअल टाइम सुरक्षा ठेवली जाईल. त्यातील सॉफ्टवेअर फेस रेकग्निजेशन आणि नंबर प्लेटची ओळख करून संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवेल आणि काही चुकीचे आढळल्यास अधिकाऱ्यांना त्वरित अलर्ट करील.

‘बिझनेस स्टॅण्डर्ड’च्या माहितीनुसार, स्टैकचे एआय चलित जार्विस प्लॅटफॉर्म संशयास्पद हालचालींचे निरीक्षण करील. शहरात आधीपासून लावण्यात आलेले कॅमेरे वापरून अधिकाऱ्यांना रिअल-टाइम अलर्ट देईल, असे ‘स्टैक टेक्नोलॉजीज’चे सह-संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल राय यांनी सांगितले.

‘एआय’ तंत्रज्ञान प्रणाली इनपुट आणि हालचालींच्या आधारावर वस्तू आणि लोक ओळखण्यासाठी ‘रिव्हर्स फेशियल रेकग्निशन’चा वापर करील. ‘रिव्हर्स फेशियल रेकग्निशन’मुळे पोलिसांना छायाचित्राचा वापर करून संपूर्ण शहरात एखाद्या विशिष्ट व्यक्तीचा शोध घेणे सहज शक्य होईल. सॉफ्टवेअर मजकूर स्वरूपात दिलेल्या माहितीच्या आधारावरही एखादी व्यक्ती किंवा वस्तू शोधण्याची परवानगी देईल, असे राय यांनी ‘मिंट’ला सांगितले.

अयोध्या शहरात आधीपासून असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये जार्विस बसवण्यात आले आहेत. हे कॅमेरे शहरातील मुख्य भाग म्हणजेच कनक भवन, हनुमान गढी, श्री नागेश्वर नाथ मंदिर, राम की पैडी, राम जन्मभूमीसह इतर प्रसिद्ध ठिकाणे कव्हर करतील, असे पीटीआय वृत्तसंस्थेने सांगितले.

या कॅमेऱ्यांना स्टैक त्रिनेत्रा सॉफ्टवेअरमध्ये आठ लाख गुन्हेगारांच्या डेटाबेसचा अॅक्सेस आहे; ज्यामुळे उत्तर प्रदेश पोलिस विभागाला गुन्हेगारी नोंदींचे डिजिटायझेशन करण्याची सुविधा देण्यात आली आहे. हा डेटाबेस ९९.७ टक्के अचूक माहिती देणार असून, नोंदणीकृत गुन्हेगारांमधील कोणताही संशयास्पद चेहरा आढळल्यास शहराच्या सुरक्षेला त्याची मदत होईल आणि तातडीने कारवाई करता येईल, असे कंपनीच्या एका प्रसिद्धिपत्रकात सांगितले गेले आहे.

जार्विस प्लॅटफॉर्म पाळत ठेवणार्‍या कॅमेर्‍यांना योग्य शोध घेण्यास अधिक सक्षम करते. त्यामुळे विशिष्ट व्यक्ती तिच्या संकलित केल्या गेलेल्या खुणांद्वारे गर्दीतून ओळखणे शक्य होते. जसे की कपडे, रंग, अॅक्सेसरीज किंवा सोबत असलेली मुले इत्यादी. कंपनीच्या म्हणण्यानुसार, हे सॉफ्टवेअर फुटफॉलचे विश्लेषण करण्यास आणि भव्य कार्यक्रमांमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटना शोधण्यातही सक्षम आहे.

राय हे ‘मिंट’ला दिलेल्या महितीत म्हणाले की, अयोध्येतील ‘एआय’ सर्व्हिलन्स सध्या एक महिन्याच्या पायलट प्रोजेक्टवर ठेवण्यात आले आहे. पायलट प्रोजेक्टला यश मिळाल्यावर भविष्यात संपूर्ण शहरामध्ये या प्रकल्पाच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा होईल.

‘एआय’ तंत्रज्ञान आणखी कुठे वापरले जाणार?

एआय तंत्रज्ञान केवळ अयोध्या सुरक्षित ठेवण्यातच मदत करणार नाही; तर इथे भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी दूरसंचार कनेक्टिव्हिटीचा अनुभवदेखील सुधारेल. ‘इकॉनॉमिक टाइम्स’च्या अहवालानुसार, दूरसंचार विभाग राम मंदिर उद्घाटनाला उपस्थित राहणाऱ्यांना अखंड कनेक्टिव्हिटी देण्यासाठी ‘एआय’ आणि ‘मशीन लर्निंग’चा उपयोग करीत आहे.

अभिषेक समारंभास उपस्थित राहणाऱ्या अंदाजित लोकांच्या संख्येवरून दूरसंचार विभाग एक पूर्वानुमानित विश्लेषण करीत आहे. या विश्लेषणात दूरसंचार कंपन्यांना किती अतिरिक्त मोबाइल साइट्स लावायच्या आणि कोणते तंत्रज्ञान २ जी, ४ जी किंवा ५ जी ऑफर करायचे ही माहिती देण्यात येईल. गर्दीच्या हालचालींनुसार हे मोबाइल टॉवर हलवताही येतील.

अयोध्येतील आणि शहराजवळील सर्व दूरसंचार हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी दूरसंचार विभागाने वॉर रूमची स्थापना करण्यात आली आहे.

एआय/एमएलच्या मदतीने आम्ही कोणता टॉवर आणि कोणता फ्रिक्वेन्सी बॅण्ड लोकांना सेवा देण्यासाठी सर्वोत्तम आहे हे ठरवू शकलो आहोत, असे एका अधिकाऱ्याने ‘इकॉनॉमिक टाइम’ला सांगितले. लोकांनी शहरातील कोणत्याही भागातून व्हिडीओ डाऊनलोड किंवा अपलोड करणे अपेक्षित आहे. त्यामुळे स्पेक्ट्रम बॅण्डचा वापर अशा प्रकारे करण्यात आला आहे की, या दोन्ही कार्यांना योग्य गती मिळेल.

दूरसंचार नेटवर्कला सायबर हल्ल्यांपासून वाचवण्यासाठीही पावले उचलली जात आहेत. आम्हाला माहीत आहे की, दूरसंचार सुविधांवरही सायबर हल्ला केला जाऊ शकतो. त्यामुळे नेटवर्कची सुरक्षा सर्वोपरी असणे आवश्यक आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Story img Loader