‘एआय’चा वापर लवकरच सर्वव्यापी होईल. त्यामुळे आयटीबरोबरच इतर क्षेत्रांतील नोकरभरतीची पद्धतही बदलणार आहे. त्यामुळे पदवी अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सातत्याने कौशल्यवृद्धी करत राहण्याला पर्याय नाही.
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काय बदलते आहे?
करिअरसाठी माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचे आकर्षण गेली काही वर्षे टिकून आहे. केवळ संगणक अभियांत्रिकीच नाही, तर संगणकशास्त्रातील विविध प्रकारच्या पदव्या वा आवश्यक अभ्यासक्रम पूर्ण करून माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात प्रवेश करणाऱ्यांची संख्या गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढली. एकीकडे संगणकीय भाषेचे शिक्षण या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्यांसाठी खुश्कीचा मार्ग ठरत होते, तर उत्पादन क्षेत्रातील कंपन्यांना माहिती तंत्रज्ञानाधारित सेवा (आयटीईएस) पुरवण्याचे काम करणाऱ्या अनेक स्वतंत्र कंपन्या उभ्या राहत असल्याने तेथेही रोजगाराची संधी वाढत गेली. या कंपन्यांची उलाढालही कोट्यवधींपर्यंत जाऊन पोचली आणि ‘आयटी’त येणारा ऐटीत जगू लागला! आता मात्र काळ बदलतो आहे. उत्पादन क्षेत्रात पुनरावृत्ती होणारी कामे करणाऱ्या मनुष्यबळाची जागा स्वयंचलनीकरणाच्या (ऑटोमेशन) माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित विविध यंत्रांनी घेतली. त्यामुळे अशी कामे करणाऱ्या मनुष्यबळाला नवीन कौशल्ये शिकणे भाग पडले. अन्यथा, गच्छन्ती निश्चित झाली. आता ऑटोमेशनची प्रक्रिया माहिती तंत्रज्ञानाशी निगडित असल्याने डिजिटलायझेशनची प्रक्रिया करून देणाऱ्या आयटीईएस कंपन्यांना ऑटोमेशनने एक प्रकारे हात तर दिला. पण, त्यासाठी ‘आयटीईएस’मधील मनुष्यबळालाही नवी कौशल्ये शिकणे भागच पडले. कारण, डिजिटलायझेशनच्या प्रक्रियेतही ‘एआय’ची मदत मोठ्या प्रमाणावर घेणे सुरू झाले. दुसरीकडे, प्रत्यक्ष सॉफ्टवेअर तयार करणाऱ्या आयटी कंपन्यांतही ‘एआय’नेच सॉफ्टवेअरचे संकेतीकरण (कोडिंग) करायला सुरुवात केल्याने हे काम करणाऱ्या मनुष्यबळावर बेरोजगारीची टांगती तलवार आली आहे. ती टाळण्यासाठी, आहे त्या मनुष्यबळाला, असलेल्या कौशल्यांना नव्याने धार लावणे आणि जोडीने नवी कौशल्ये शिकणे क्रमप्राप्त झाले आहे. साहजिकच, या क्षेत्रात नव्याने येऊ पाहणाऱ्यांनाही हीच प्रक्रिया शिकणे अपरिहार्य आहे.
हेही वाचा >>> Sambhal mosque dispute:संभल विषयीचे ऐतिहासिक संदर्भ काय सांगतात? मंदिर खरंच बाबराने नष्ट केले होते का?
हा बदल कसा टिपला गेला?
ज्या आयटी कंपन्यांत सध्या नव्याने भरती सुरू आहे, त्यांनी भरतीसाठीच्या निकषांत केलेल्या बदलांमुळे आयटीत होत असलेल्या बदलांची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली. खरे तर चौथी औद्योगिक क्रांती म्हणजे ‘इंडस्ट्री ४.०’मध्ये हे घडणारच होते. आपल्याकडे या आमूलाग्र बदलांची सुरुवातीपासून फारशी गांभीर्याने दखल घेतली न गेल्याने प्रत्यक्ष नोकरकपात सुरू झाल्यावर आणि नोकरभरतीचे निकषच बदलू लागल्यावर, म्हणजेच रोजगारक्षमतेवर प्रश्नचिन्हे उभी राहिल्यावरच याचा ऊहापोह सुरू झाला. मनुष्याची कामे जर एआय बॉट करायला लागला, तर मनुष्याने काय करायचे याचे उत्तर तयार ठेवण्याची तसदी घेतली न गेल्याने अनेकांवर बेरोजगारीची वेळ आली आहे आणि अजूनही येईल, असे या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात. ‘एआय’ ही अपरिहार्यता असेल, तर त्याच्याशी जुळवून घेण्यात शहाणपणा आहे, हे समजून घेणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ, एखादे काम पूर्णपणे ‘एआय’ करणार असले, तरी ‘एआय’ला ते काम कसे करायचे, हे सांगणे मनुष्याच्या हातात आहे. त्यामुळे कंपनीच्या गरजेनुसार ‘एआय’कडून ते काम करून घेण्याचे कौशल्य प्राप्त करणे हाच यावरचा मार्ग असू शकतो.
हेही वाचा >>> Ajmer Sharif Dargah: अजमेर शरीफ़ दर्गा हे शिवमंदिर होते का? ऐतिहासिक संदर्भ काय सुचवतात?
आयटीतील नोकरभरतीत नेमका बदल काय?
सॉफ्टवेअर अभियंत्याला नोकरभरतीच्या वेळी पूर्वी कोड लिहायला सांगितले जायचे. आता ‘एआय’च कोड लिहून देतो. मग अभियंत्याचे काम काय आणि त्याची कसोटी कशी करायची? तर ‘एआय’ने लिहिलेला कोड वापरणे सुरक्षित आहे का, त्या कोडचे उत्पादनाच्या गरजेनुसार अनुकूलन करणे शक्य आहे का, हे ठरविण्याची आणि त्यानुसार ‘एआय’कडून कोड लिहून घेण्याची जबाबदारी भरतीसाठी आलेला उमेदवार पेलू शकतो का, हे पाहणे. अशी जबाबदारी पेलणारे मनुष्यबळ आयटीला हवे आहे.
भरतीतील बदलांचा सांगावा काय?
‘एआय’चा वापर लवकरच सर्वव्यापी होईल. त्यामुळे आयटीबरोबरच इतर क्षेत्रांतील नोकरभरतीची पद्धतही बदलणार आहे. त्यामुळे पदवी अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सातत्याने कौशल्यवृद्धी करत राहण्याला पर्याय नाही. ‘एआय’ हा शेवटी त्याच्याकडे उपलब्ध माहितीच्या आधारे काम करतो. त्याच्याकडून ती अधिक सर्जनशील पद्धतीने करून घेणे मनुष्याच्याच हातात आहे. शिवाय, त्याने केलेले काम, दिलेले उपाय पडताळून पुढच्या वेळी पुन्हा वेगळे काही तरी काढून घेणेही मनुष्याच्याच हातात आहे. थोडक्यात, त्याला कामाला लावणे आणि उद्योगाच्या गरजेप्रमाणे त्याच्याकडून काम करून घेणे, हेच आता मनुष्याचे काम होणार आहे. त्यासाठी केवळ उत्तरे शोधून चालणार नाहीत, तर योग्य प्रश्न विचारणेही गरजेचे आहे. नवे पदवीधर यासाठी तयार आहेत का, हा खरा प्रश्न आहे.
siddharth.kelkar@expressindia.com