-हृषिकेश देशपांडे
तमिळनाडूतील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या अण्णा द्रमुकमधील गटबाजी शिगेला पोहोचली आहे. पक्षाचे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष असून, माजी मुख्यमंत्री ई. के. पलानीस्वामी आणि ओ. पन्नीरसेल्वम यांच्या गटांमध्ये हाणामारी झाली. त्यावरून या संघर्षाची कल्पना येते. या दोन गटांतील वाद न्यायालयात गेला. पहाटे साडेचार वाजता न्यायालयाने आदेश देत पलानीस्वामी यांना पक्षावर ताबा घेण्यापासून रोखले. या साऱ्यात पक्षाच्या शिस्तीचे धिंडवडे निघाले.
वादाचे कारण काय?
पक्ष संस्थापक एम. जी. रामचंद्रननंतर जयललिता यांचे पक्षावर नियंत्रण होते. जयललिता यांच्या निधनानंतर म्हणजे २०१६पासून पक्ष ताब्यात ठेवण्यासाठी वाद सुरू झाला. अण्णा द्रमुकमध्ये सरचिटणीसपद हे सर्वांत महत्त्वाचे. १९८९ ते २०१६पर्यंत जया अम्मांनीच हे पद सांभाळले. मात्र जयललितांच्या पश्चात सुंदोपसुंदी सुरू झाली. जयललिता यांची मैत्रीण शशिकला यांना पक्षापासून दूर ठेवण्यासाठी पलानीस्वामी व पन्नीरसेल्वम हे दोघे एकत्र आले. मात्र त्यांचा हा दोस्ताना अल्पकाळच टिकला. पक्षनेतृत्वावरून पन्नीरसेल्वम व पलानीस्वामी यांच्या गटात वाद सुरू झाला. त्यातून मग शक्तिशाली अशा सरचिटणीस पदाऐवजी दोन समन्वयक नेमण्याचा तोडगा काढण्यात आला. पक्षात एकच सत्ताकेंद्र असू नये हा त्यामागील हेतू. मात्र यात दोन्ही गटांचे ऐक्य अशक्य झाले. सत्ता असेपर्यंत वाद फारसा बाहेर आला नाही. गेल्या वर्षी राज्यातील सत्ता गमावल्यानंतर आता वाद रस्त्यावर आला. पक्षातील बहुसंख्य पदाधिकाऱ्यांचा पलानीस्वामी यांना पाठिंबा आहे. पक्षांतर्गत वाद न्यायालयात गेला. न्यायालयाने पलानीस्वामी यांचा सरचिटणीस पदाचा मार्ग तूर्तास रोखला आहे.
पक्षाच्या बैठकीत गदारोळ
चेन्नईत नुकत्याच झालेल्या पक्षाच्या सर्वसाधारण परिषदेत पन्नीरसेल्वम यांच्यावर बाटल्या फेकण्यात आल्या. या घडामोडी पाहता अण्णा द्रमुकची पुढची वाटचाल बिकट असल्याचे दिसून येते. पक्षाच्या बैठकीत ज्येष्ठ नेते तमिळमगन हुसेन यांची कार्यकारी अध्यक्ष (प्रिसिडियम चेअरमन) म्हणून निवड करण्यात आली आहे. या वेळी बैठकीतील बहुसंख्य वक्त्यांनी पन्नीरसेल्वम यांचा उल्लेखही केला नाही. त्यांचा अपमान करण्यात आला. काही जणांनी तर पक्षाचा वाद न्यायालयात नेल्याबद्दलही त्यांना खडसावले. बैठकीतील विषयपत्रिकेवर पक्षात सरचिटणीस पद हाच विषय होता. मात्र त्यावर निर्णय झाला नाही. आता ११ जुलैला पुन्हा बैठक होणार आहे. त्यात पलानीस्वामी यांची निवड होईल असे संकेत पक्षातील नेत्यांकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे वाद थांबेल असे दिसत नाही.
पुढे काय?
तमिळनाडूत द्रमुकची सत्ता आहे. गेली पाच दशके राज्यातील राजकारण हे द्रमुक-अण्णा द्रमुकभोवतीच फिरत आहे. राष्ट्रीय पक्ष असलेले काँग्रेस व भाजपला या दोन प्रादेशिक पक्षांना बरोबर घेतल्याखेरीज राजकारण करणे कठीण जात आहे. आताही अण्णा द्रमुकमधील वादात भाजप हस्तक्षेप करेल असे मानले जात आहे. त्यातही पन्नीरसेल्वम हे भाजपच्या जवळचे मानले जातात. तर पक्षातील इतर नेत्यांना भाजपशी असलेली आघाडी तितकी मान्य नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीत द्रमुक-अण्णा द्रमुक यांच्या मतांमध्ये सात टक्क्यांचे अंतर आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या नेतृत्वात द्रमुकने सहज जिंकली. राज्यातील सर्व महापालिकांमध्ये सत्ता आणली. या दोन पक्षांच्या साठमारीत भाजपने अस्तित्व दाखवून दिले आहे. तरीदेखील द्रविडीयन राजकारणात भाजपच्या हिंदुत्वाच्या विचाराला आजपर्यंत फारसे स्थान मिळालेले नाही. कन्याकुमारीच्या परिसरातच काय तो भाजपचा प्रामुख्याने प्रभाव आहे. पण बदलत्या राजकारणात भाजपने तमिळनाडूवर लक्ष केंद्रित केले आहेत. त्यातच अण्णा द्रमुकमध्ये नेतृत्वासाठी सुंदोपसुंदी वाढली तर विरोधकांच्या राजकारणात एक पोकळी निर्माण होईल. त्याचा लाभ उठविण्याच्या तयारीत भाजप आहे.
तडजोड शक्य?
एम.जी. रामचंद्रन, जयललिता यांच्या काळात अण्णा द्रमुकचे एकखांबी नेतृत्व होते. आजची स्थिती वेगळी आहे. जनमानसात इतकी उत्तुंग लोकप्रियता असलेला नेता त्या पक्षात नाही. तर दुसरीकडे द्रमुकचा वाढता प्रभाव आणि भाजपने राज्यात शिरकाव करण्यासाठी सुरू केलेले प्रयत्न अशा दुहेरी कात्रीत अण्णा द्रमुक आहे. हा पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीत आहे. भाजपबरोबरील मैत्रीने निवडणुकीत अल्पसंख्याक मते मिळाली नाहीत ही वस्तुस्थिती आहे. अशा स्थितीत कार्यकर्त्यांना प्रेरणादायी ठरेल असे नेतृत्व देणे तसेच प्रबळ विरोधकाची भूमिका बजावणे असे दुहेरी आव्हान अण्णा द्रमुकपुढे आहे. यातून मार्ग काढण्यासाठी पन्नीरसेल्वम आणि पलानीस्वामी यांचे गट कितपत लवचीक भूमिका घेतात यावर पक्षाचे भवितव्य अवलंबून आहे. त्या दृष्टीने ११ जुलै रोजी होणारी पक्षाची बैठक निर्णायक ठरण्याची चिन्हे आहेत.