Air India Chicago Delhi Flight : लांब पल्ल्याचा प्रवास कमी वेळात पूर्ण करायचा असेल, तर विमानाशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. ट्रेन किंवा बसच्या तुलनेत विमान प्रवास हा अधिक सुखकर असतो, असा काहींचा समज आहे. त्यामुळेच सर्वसामान्य लोक विमानातून प्रवास करणाऱ्यांकडे चकित झाल्याच्या भावनेनं पाहतात. एअर इंडिया ही भारताची प्रमुख आंतरराष्ट्रीय कंपनी आहे. दररोज लाखो प्रवासी एअर इंडियाच्या विमानातून प्रवास करतात. मात्र, काही दिवसांपासून ही कंपनी चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. यामागचं कारण म्हणजे एअर इंडियाच्या व्यवस्थापनाबाबत प्रवाशांच्या अनेक तक्रारी आहेत. ८ मार्च रोजी एका वृद्ध महिलेला व्हीलचेअर नाकारल्यामुळे एअर इंडियाला नेटकऱ्यांनी लक्ष्य केलं होतं. आता एका गलिच्छ प्रकारामुळे कंपनीवर टीका केली जात आहे.
एअर इंडिया नेटकऱ्यांचे लक्ष्य का?
घडलेली घटना आठवडाभरापूर्वीची आहे. ५ मार्च रोजी एअर इंडियाचं एक विमान जवळपास ३०० प्रवाशांना घेऊन अमेरिकेच्या शिकागो येथून दिल्लीला येण्यासाठी निघालं होतं. मात्र, या विमानाला अर्ध्या रस्त्यातूनच माघारी फिरावं लागलं. त्यामागचं कारण म्हणजे विमानातील १२ पैकी तब्बल आठ शौचालयं निकामी झाली होती, ज्यामुळे प्रवाशांना मोठी हालअपेष्टा सहन करावी लागली. प्रवाशांची सुरक्षा आणि कुचंबणा लक्षात घेऊन हे विमान हवेतूनच माघारी फिरलं. विमानानं जेव्हा शिकागोकडं परतण्याचा निर्णय घेतला तेव्हा ते अटलांटिक महासागरावर होतं. या गलिच्छ प्रकाराचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी एअर इंडियाला लक्ष्य केलं.
एअर इंडियानं आपल्या निवेदनात काय म्हटलं?
सोशल मीडियावर उठलेली टीकेची राळ पाहता, एअर इंडियानं घडलेल्या प्रकाराबाबत स्पष्टीकरण दिलं. सोमवारी (१० मार्च) एका निवेदनात कंपनीनं म्हटलं की, ५ मार्च रोजी ग्रीनलँडवरून जाताना बोईंग ७७७-३०० ईआर विमानातील १२ पैकी आठ शौचकूप निरुपयोगी झाले होते. एअर इंडियाच्या प्रवक्त्यानं पुष्टी केली की, शिकागोहून दिल्लीला जाणारं विमान तांत्रिक बिघाडामुळं परत माघारी फिरवावं लागलं. युरोपमधील एखाद्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान उतरविण्याचा पर्याय होता. मात्र तिथे रात्रीच्या वेळी विमानातील तांत्रिक बिघाड दुरुस्त करणं शक्य होत नाही. त्यामुळे विमान पुन्हा शिकागोत उतरविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर विमानातील तुंबलेले शौचकूप साफ करण्यात आले. यादरम्यान विमानातील प्रवाशांची हॉटेलमध्ये राहण्याची पर्यायी व्यवस्था करण्यात आली होती. काही प्रवाशांना दुसऱ्या विमानानं दिल्लीला पाठवण्यात आलं, असंही एअर इंडियानं आपल्या निवेदनात म्हटलं आहे.
एअर इंडियाच्या शौचकूपात कोणत्या वस्तू सापडल्या?
एअर इंडियानं आपल्या निवेदनात म्हटलं की, शौचालयात प्लास्टिकच्या पिशव्या, डायपर्स, सॅनिटरी पॅड्स, इनरवेअर्स, पाण्याच्या रिकाम्या बाटल्या अशा वस्तू आढळून आल्या. कमोडमध्ये यांसारख्या वस्तू टाकून फ्लश केल्यानं शौचकूपाचा पाईप तुंबला होता, ज्यामुळे विमानातील प्रवाशांना त्याचा वापर करता येत नव्हता. प्रवाशांनी शौचालयात अशा वस्तू फ्लश करू नयेत, त्याचा योग्य रीतीनं वापर करावा, अशी विनंतीही एअर इंडियाकडून करण्यात आली.
विमानातील शौचकूप तुंबल्याची अनेक प्रकरणं
- विमानातील शौचकूप तुंबल्याची ही काही पहिलीच घटना नाही. याआधीही विमान कंपन्यांना अशा समस्यांना सामोरं जावं लागलं आहे. गेल्या महिन्यात एका प्रवाशानं शौचकूप तुंबल्याची तक्रार केल्यानंतर एअर फ्रान्सच्या विमानाचं ब्राझीलमध्ये आपत्कालीन लँडिंग करावं लागलं होतं.
- गेल्या वर्षी फ्रँकफर्टहून सॅन फ्रान्सिस्कोला जाणाऱ्या विमानात शौचकूपामध्ये पाणी साचल्याचा प्रकार घडला होता. त्यावरून प्रवासी चांगलेच संतप्त झाले होती. तेव्हा युनायटेड एअरलाइन्सच्या वैमानिकांना जर्मनीतील एका हवाई पट्टीवर आपत्कालीन लँडिंग करावं लागलं होतं.
- २०२३ मध्ये ऑस्ट्रियन एअरलाइन्सच्या विमानातही असाच प्रकार घडला होता. व्हिएन्नाहून न्यू यॉर्कला जाणाऱ्या विमानातील आठपैकी पाच शौचकूप तुंबले होते, ज्यामुळे हे विमान न्यू यॉर्कला न जाता, अर्ध्या रस्त्यातूनच व्हिएन्नाकडे माघारी फिरलं होतं.
- २०१७ मध्ये एअर इंडियाला अशाच परिस्थितीचा सामना करावा लागला. दिल्लीहून ३४० प्रवाशांना घेऊन शिकागोला निघालेल्या विमानातील चार शौचकूप खराब झाले होते, ज्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता. गंतव्य स्थानापासून अवघ्या काही तासांच्या अंतरावर असताना या विमानातील उर्वरित आठ शौचकूपदेखील तुंबले होते.
- प्रवाशांनी प्लास्टिकच्या बाटल्या आणि सॅनिटरी पॅडसारख्या वस्तू कमोडमध्ये टाकल्याने विमानातील शौचकूप तुंबले होती, असा दावा एअर इंडियाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने केला होता. २०१६ मध्ये, एअर इंडियाच्या न्यू यॉर्क- मुंबई विमानातील सर्व शौचकूप तुंबल्याने वैमानिकांना इस्तंबूल येथे विमानाचं अनियोजित लँडिंग करावं लागलं होतं.
हेही वाचा : ATM Cash Problem : एटीएममधून पैसे काढण्यास अडचणी का येत आहेत? पैशांचा तुटवडा निर्माण होण्यामागचं कारण काय?
विमानातील शौचकूपाचा गैरवापर?
विमानातून प्रवास करणाऱ्या व्यक्ती शौचकूपाचा गैरवापर करत असल्याच्या घटना वारंवार समोर आल्या आहेत. “जर एखाद्या प्रवाशानं शौचकूपात प्लास्टिकची बाटली, घाणेरडे डायपर, टिश्यू पेपरचा तुकडा अशी कोणतीही वस्तू फेकली, तर त्यामुळे व्हॅक्युम फ्लश सिस्टीमचं नुकसान होऊ शकतं आणि त्यामुळे शौचकूपातील पाणी बाहेर येतं आणि घाणेरडा वास सुटतो.
“तुंबलेले शौचकूप साफ करण्यासाठी विमानातील सफाई कर्मचाऱ्यांना त्यात अडकलेली वस्तू शोधावी लागते. त्यानंतरच फ्लश सिस्टीम दुरुस्त होते. शौचकूपात अडकलेली घाण बाहेर काढण्यासाठी बराच वेळ जातो, ज्यामुळे पुढील उड्डाणाला उशीर होतो आणि विमान कंपन्यांचं आर्थिक नुकसान होतं,” असे एअरलाइन्सच्या एका सूत्रानं २०१७ मध्ये द टाइम्स ऑफ इंडियाला सांगितलं.
विमानातील क्रू-मेबर्स काय म्हणाले?
बोईंग ७७७ आणि बोईंग ७८७ सारखी विमानं व्हॅक्युम फ्लशसारखी प्रगत तंत्रज्ञान वापरतात. एअर इंडियाच्या एका वरिष्ठ केबिन क्रू मेबर्सने टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितलं, “जुन्या विमानांमध्ये निळ्या रंगाचा द्रव रासायनिक टॉयलेट फ्लश सिस्टीम वापरली जात होती. जेव्हा शौचकूप तुंबत होते, तेव्हा आम्ही गरम पाणी टाकून ते साफ करीत होतो. परंतु, व्हॅक्युम फ्लश असलेल्या विमानांमधील शौचकूप एकदा ब्लॉक झाले की, विमान कंपन्या फार काही करू शकत नाहीत. गैरवापरामुळ हे शौचकूप निकामी होतात, ज्यामुळे प्रवाशानांच नाही, तर ते विमान कंपन्यांनाही महागात पडतं.”