Air India on wheelchair controversy : दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी (तारीख ८ मार्च) ८२ वर्षीय वृद्ध महिला अचानक तोल जाऊन पडली. या घटनेत तिच्या डोक्याला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली. सध्या या वृद्ध महिलेवर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. “एअर इंडियाने व्हीलचेअर देण्यास नकार दिल्याने माझ्या आजीला पायी चालावे लागले. यादरम्यान, थकवा आणि अशक्तपणामुळे ती खाली पडली आणि तिला गंभीर दुखापत झाली”, असा आरोप वृद्ध महिलेच्या नातीने केला आहे. दुसरीकडे एअर इंडियाने या घटनेवर संवेदना व्यक्त केली असून तरुणीचे आरोप फेटाळून लावले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“व्हीलचेअर उपलब्ध नसल्याने वृद्ध महिलेला कर्मचाऱ्यांनी काहीवेळ थांबण्यास सांगितले होते. मात्र, त्यांनी वाट न बघता स्वत: पायी जाण्याचा निर्णय घेतला. यात आमची कुठलीही चूक नाही, असं स्पष्टीकरण एअर इंडियाकडून देण्यात आलं आहे. या घटनेनंतर नेटकऱ्यांनी एअर इंडियाला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, वृद्धांना व्हीलचेअर नाकारल्याचा एअर इंडियावर झालेला हा काही पहिलाच आरोप नाही. यापूर्वी देखील अनेकांनी कंपनीवर अशा आशयाचे आरोप केले आहेत. व्हीलचेअरबाबत एअर इंडियाचे काय नियम आहेत? याबाबत जाणून घेऊ.

घटना नेमकी कशी घडली?

घटनेनंतर वृद्ध महिलेची नात पारुल कंवरने आपल्या एक्स अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये पारुलने असा दावा केला की, “दिल्लीहून बेंगळुरूला जाण्यासाठी मी मंगळवारी (४ मार्च) एअर इंडियाच्या विमानाचे तिकीट काढलं होतं. माझ्याबरोबर वृद्ध आजी असल्याने तिला व्हीलचेअर उपलब्ध करून द्यावी, अशी विनंती मी एअर इंडियाकडे केली. तिकीट बुक झाल्यानंतर त्यावर व्हीलचेअर कन्फर्मेशन देखील होते. परंतु, जेव्हा आम्ही इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचलो, तेव्हा तिथे व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आली नव्हती. आम्ही तासभर वाट बघितली, कर्मचाऱ्यांशी बोललो, तरीही त्यांनी आम्हाला व्हीलचेअर दिली नाही.”

आणखी वाचा : Heatwave Effects : अति उष्णतेमुळे वेळेआधीच वृद्धत्व येतं? नवीन संशोधनात काय दावा करण्यात आला?

वृद्ध महिलेच्या नातीने काय आरोप केला?

पुढे बोलताना पारुल म्हणाली, “शेवटी कंटाळून आम्ही पायी चालण्याचा निर्णय घेतला. परंतु, चालता-चालता माझ्या वृद्ध आजीला अशक्तपणा आला आणि ती एअर इंडियाच्या प्रीमियम इकॉनॉमी काउंटरसमोर पडली. तिच्या ओठातून रक्त येत होतं, डोक्याला आणि नाकाला गंभीर दुखापत झाली होती. यानंतर आम्ही एअर इंडियाकडे वैद्यकीय मदत मागितली. परंतु, तिच्यावर कोणतेही उपचार न करता जखमी अवस्थेतच तिला विमानात बसवण्यात आलं. विमानातील कर्मचाऱ्यांनी आजीच्या चेहऱ्यावर आईस पॅक लावले आणि वैद्यकीय मदतीसाठी बंगळुरू विमानतळाशी संपर्क साधला.”

जखमी झालेली महिला माजी सैनिकाची पत्नी

“तिथे गेल्यावर डॉक्टरांनी तिच्यावर उपचार केले, ती सध्या आयसीयूमध्ये असून तिला टाके घालण्यात आले आहेत. मी हे पोस्ट करत आहे कारण माझ्याकडे पर्याय नाही. माणुसकीचाही विचार न करणारी वागणूक दिल्याने मला राग येतोय”, असा संतापही तरुणीने व्यक्त केला आहे. दरम्यान, ज्या वृद्ध महिलेला गंभीर दुखापत झाली, त्या माजी सैनिकांच्या पत्नी आहेत. त्यांचे पती सैन्यदलात लेफ्टनंट पदावर होते. विविध युद्धांमध्ये त्यांनी देशासाठी आपलं शौर्य दाखवलं आहे. राज पसरीचा असं जखमी झालेल्या वृद्ध महिलेचं नाव आहे.

एअर इंडियाने फेटाळले सर्व आरोप

या घटनेनंतर नेटकऱ्यांनी एअर इंडियावर टीकेची झोड उठवली. तासांभरातच #BoycottAirIndia आणि #ShameOnAirIndia सारखे हॅशटॅग ट्रेंड होऊ लागले. यानंतर एअर इंडियाने एक निवेदन जारी करून आपली बाजू मांडली. “घडलेल्या घटनेवर आम्ही दु:ख व्यक्त करतो. परंतु, वृद्ध महिला ही विमानतळावर महिला नियोजित वेळेपेक्षा खूप उशिरा पोहोचली होती. व्हीलचेअरसाठी एक तास वाट पाहण्याचा तरुणीचा दावा खोटा आहे. मागणी जास्त असल्याने व्हीलचेअर लगेच उपलब्ध नव्हत्या. महिलेने स्वतः चालण्याचा निर्णय घेतला”, असं एअर इंडियाने आपल्या निवेदनात म्हटलं.

“वृद्ध महिलेला दुखापत झाल्यानंतर दिल्ली विमानतळावरील डॉक्टरांनी तिच्यावर ताबडतोब प्रथमोपचार केले, परंतु तिच्या कुटुंबाने अतिरिक्त वैद्यकीय मदत घेण्यास नकार दिला. दिल्ली ते बंगळुरू विमान प्रवासादरम्यान महिलेला सर्वतोपरी मदत करण्यात आली आणि बंगळुरू पोहोचल्यावर वैद्यकीय सुविधा देखील देण्यात आली. वृद्ध महिलेच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी आमची इच्छा आहे, असं एअर इंडियाने आपल्या निवेदनात म्हटलं आहे.

व्हीलचेअरबाबत एअर इंडियाचे नियम काय?

एअर इंडियाच्या वेबसाइटवर असे म्हटलंय की, ज्या प्रवाशांना व्हीलचेअरची आवश्यकता आहे, ते तिकीट बुक करताना यासंदर्भातील माहिती एअरलाईन्सला कळवू शकतात. शेवटच्या क्षणी होणारा विलंब आणि व्हीलचेअरची अनुपलब्धता टाळण्यासाठी, प्रवाशांना बुकिंग किंवा तिकीट जारी करताना व्हीलचेअर्सची आगाऊ बुकिंग करण्याची विनंती केली जाते. वृद्ध आणि आजारी प्रवाशांसाठी तसेच वैद्यकीय रुग्णांसाठी व्हीलचेअर मोफत आहे. या सेवेचा लाभ घेण्यासाठी एअर इंडियाकडून प्रवाशाचा वैद्यकीय माहिती घेतली जाते. पडताळणीनंतरच संबंधित प्रवाशाला व्हीलचेअर मिळणार की नाही, हे ७२ तास आधीच सांगितले जाते.

हेही वाचा : Haircut in Space : अंतराळात कसे कापतात केस? सुनीता विल्यम्सच्या केसांची का होतेय चर्चा?

विमान वाहतुकीचे नियम काय सांगतात?

नागरी विमान वाहतूक (CAR) विभागाने दिव्यांग आणि कमी गतिशीलता असलेल्या प्रवाशांना मदत करण्यासाठी नियम निश्चित केले आहेत. कलम ४.१.१ नुसार, कोणतीही विमान कंपनी अपंग किंवा कमी गतिशीलता असलेल्या प्रवाशाला आणि त्याच्या उपकरणांना व्हीलचेअरवर नेण्यास नकार देऊ शकत नाही. मात्र, तिकीट बुकिंग करताना अशा व्यक्तींनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी त्यांच्या आवश्यकता एअरलाइनला कळवाव्यात. २०२२ मध्ये, इंडिगो कंपनीने एका दिव्यांग तरुणाला विमानात चढण्याची परवानगी नाकारली होती. त्यानंतर भारत सरकारच्या नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने विमान कंपन्यांना अपंग व्यक्तींना विमानात चढण्यास नकार देणे बेकायदा ठरवले आहे.

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने काय सांगितलंय?

नागरी विमान वाहतूक विभागाने आपल्या नियमांत सुधारणा करून असं म्हटलंय की, “एअरलाइन कोणत्याही व्यक्तीला अपंगत्वाच्या आधारावर प्रवास करायला नकार देऊ शकत नाही. जर विमान कंपनीला असे वाटत असेल की, अशा प्रवाशाची प्रकृती उड्डाणादरम्यान बिघडू शकते, तर त्या प्रवाशाची डॉक्टरांकडून तपासणी करावी, जे त्यांची वैद्यकीय स्थिती सांगतील आणि प्रवासी विमान प्रवास करण्यास योग्य आहे की नाही हे ठरवतील.” दरम्यान, गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये, मुंबई विमानतळावर व्हीलचेअर न मिळाल्याने एका ८० वर्षीय प्रवाशाचा बेशुद्ध पडून मृत्यू झाला होता. त्यानंतर एअर इंडियाला ३० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. या घटनेनंतर, डीजीसीएने सर्व विमान कंपन्यांना पुरेशा व्हीलचेअर ठेवण्याच्या सूचना जारी केल्या होत्या.