दिवसेंदिवस मानवी अस्तित्वाला आव्हान ठरेल अशा जगण्या-मरण्याच्या प्रश्नांची तीव्रता अधिकाधिक वाढत चालली आहे. त्यातीलच एक समस्या म्हणजे वायू प्रदूषण होय. २०२१ या वर्षामध्ये वायू प्रदूषणामुळे जगातील ८.१ दशलक्ष लोकांचा संपूर्ण जगभरात मृत्यू झाल्याची माहिती एका अहवालाद्वारे प्रसिद्ध झाली आहे. त्यातही भारतात २.१ दशलक्ष, तर चीनमध्ये २.३ दशलक्ष लोकांचा मृत्यू झाला आहे. यासंदर्भात सविस्तर माहिती देणारा अहवाल आज बुधवारी (१९ जून) प्रकाशित झाला आहे.

हेल्थ इफेक्ट इन्स्टिट्यूटने (HEI) हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. ही अमेरिकेतील संशोधन संस्था असून त्यांनी ‘युनिसेफ’बरोबर एकत्र येत हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार, २०२१ या वर्षी वायू प्रदूषणामुळे भारतातील पाच वर्षांखालील १,६९,४०० लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर नायजेरिया (१,१४,१००), पाकिस्तान (६८,१००), इथिओपिया (३१,१००) आणि बांगलादेश (१९,१००) या देशांचा क्रमांक लागतो. दक्षिण आशियामधील बहुतांश मृत्यूंसाठी उच्च रक्तदाब, चुकीचा आहार आणि तंबाखू यांच्यानंतर वायू प्रदूषण हाच घटक कारणीभूत ठरत असल्याचेही या अहवालामध्ये नमूद केले आहे.

हेही वाचा : आमिर खानच्या मुलाने साकारलेले करसनदास मुलजी तेव्हाही आणि आताही वादात; चित्रपटावर बंदीची मागणी का होत आहे?

२०२१ मध्ये झालेल्या मृत्यूंपैकी १२ टक्के मृत्यू वायू प्रदूषणामुळे

या अहवालामध्ये असेही नमूद करण्यात आले आहे की, “२०२१ मध्ये वायू प्रदूषणामुळे झालेले मृत्यू हे त्याआधीच्या कोणत्याही वर्षी झालेल्या मृत्यूंपेक्षा अधिक होते. जगभरात भारत आणि चीन या दोन्ही देशांची लोकसंख्या एक अब्जहून अधिक आहे. भारत (२.१ दशलक्ष मृत्यू) आणि चीन (२.३ दशलक्ष मृत्यू) या दोन्ही देशांमध्ये एकत्रितपणे झालेल्या मृत्यूंचे प्रमाण हे एकूण मृत्यूच्या ५४ टक्के आहे.”

उर्वरित जगातील ज्या देशांमध्ये मृत्यूचे अधिक प्रमाण आहे, त्यामध्ये दक्षिण आशियामधील पाकिस्तान (२,५६,०००), बांगलादेश (२,३६,३००) आणि म्यानमार (१,०१,६००) या देशांचा; तर आग्नेय आशियामधील इंडोनेशिया (२,२१,६००), व्हिएतनाम (९९,७००) आणि फिलीपाईन्स (९८,२०९) या देशांचा समावेश होतो. याशिवाय, आफ्रिका खंडातील नायजेरियामध्ये २,०६.७०० मृत्यू तर इजिप्तमध्ये १,१६,५०० मृत्यू झाले आहेत.

वायू प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या छोट्या कणांचा आकार म्हणजेच पार्टिक्युलेट मॅटर (PM) मोजला जातो. हे हवेमध्ये आढळणारे घन कण आणि द्रव थेंब यांचे जटिल मिश्रण असतात. हे कण आकार, रचना आणि उत्पत्तीमध्ये भिन्न असू शकतात. पार्टिक्युलेट मॅटरचे म्हणजेच हवेतील छोट्या कणांचा आकार त्यांच्या व्यासाच्या आधारे मोजला जातो. PM२.५ आणि ओझोनमुळे होणारे एकूण प्रदूषण जवळपास ८.१ दशलक्ष मृत्यूस कारणीभूत ठरले आहे. म्हणजेच ते २०२१ मध्ये झालेल्या एकूण मृत्यूपैकी १२ टक्के मृत्यूस कारणीभूत ठरले आहे. जगभरात वायू प्रदूषणामुळे झालेल्या एकूण मृत्यूंपैकी ९० टक्के मृत्यू (७.८ दशलक्ष) हे PM२.५ वायू प्रदूषणामुळे झाले आहेत. २.५ मायक्रोमीटरहून कमी व्यास असलेले अत्यंत छोटे कण आपल्या फुफ्फुसात जाऊ शकतात आणि तिथून ते रक्तप्रवाहामध्ये सहज सामील होऊ शकतात. याचा अनेक अवयवांना धोका निर्माण होऊन हृदयविकाराचा झटका, मधुमेह, फुफ्फुसाचा कर्करोग तसेच क्रोनिक ऑब्स्ट्रीक्टव्ह पल्मनेरी डिसीज (COPD) यांसारखे गंभीर आजार होऊ शकतात. या अहवालानुसार, PM२.५ मुळे जगभरातच या विकारांचे प्रमाण अधिक वाढले आहे.

हेही वाचा : लोकसभेचा हंगामी अध्यक्ष कोण असतो? त्याची निवड कशी केली जाते?

हेल्थ इफेक्ट इन्स्टिट्यूटचे (HEI) अध्यक्ष इलेना क्राफ्ट यांनी म्हटले की, “आमच्या ‘स्टेट ऑफ ग्लोबल एअर’ या अहवालामुळे लोकांना सध्या असलेल्या परिस्थितीची माहिती मिळेल आणि बदल घडवण्यासाठी प्रेरणाही मिळेल. वायू प्रदूषणाचा आपल्या आरोग्यावर मोठा परिणाम होतो. हवेची गुणवत्ता आणि जागतिक सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सुधारणे या दोन्हीही बाबी व्यावहारिक आणि साध्य करण्यायोग्य आहेत, याची आम्हाला जाणीव आहे.”

हेल्थ इफेक्ट इन्स्टिट्यूटच्या (HEI) ग्लोबल हेल्थच्या प्रमुख पल्लवी पंत यांनी या अहवालावर म्हटले आहे की, “हा नवीन अहवाल लहान मुले, वृद्ध लोकसंख्या आणि कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये वायू प्रदूषणामुळे मानवी आरोग्यावर होणाऱ्या महत्त्वपूर्ण परिणामांची स्पष्ट जाणीव करून देतो.” पुढे त्या म्हणाल्या की, “आरोग्यविषयक धोरणे आणि इतर असंसर्गजन्य रोगांना प्रतिबंध करण्यासाठी तसेच त्यांच्यावर नियंत्रण प्राप्त करण्यासाठी आवश्यक कार्यक्रम विकसित करताना देशांना हवेची गुणवत्ता आणि वायू प्रदूषण हे उच्च-जोखिमीचे घटक म्हणून विचारात घ्यावे लागतील, या मुद्द्याकडे हा अहवाल लक्ष वेधून घेतो.”