भारतातील अनेक शहरांमध्ये आता दरवर्षी वायू प्रदूषणाची समस्या उद्भवू लागली आहे. त्यामुळे हिवाळ्यात उबदार कपड्यासंह मास्कही वापरावा लागतोय. मागच्या काही वर्षांमध्ये करोना महामारीमुळे मास्क वापरण्याची सवय आता भारतीय नागरिकांना झालेली आहेच. करोना काळात वापरात असलेले अनेक सर्जिकल आणि कापडी मास्क फुफ्फुसात आणि रक्तप्रवाहात खोलवर जाण्यास सक्षम असलेल्या लहान प्रदूषण कणांना रोखण्यात कुचकामी ठरतात. ‘लॅन्सेट’ या जगप्रसिद्ध वैद्यकीय नियतकालिकाने २०१९ साली प्रसिद्ध केलेल्या ‘ग्लोबल बर्डन ऑफ डिजिज’ अहवालानुसार भारतात वायू प्रदूषणामुळे १.६७ दशलक्ष लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले होते. या अहवालात नमूद केल्याप्रमाणे घरगुती वायू प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूमध्ये १९९० ते २०१९ दरम्यान ६४.२ टक्क्यांची घट झालेली आहे. मात्र, त्याचवेळी बाहेरच्या वायू प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूच्या संख्येमध्ये ११५.३ टक्क्यांची वाढ झाली आहे.

मास्क वायू प्रदूषणापासून वाचवू शकतो का?

डॉक्टरांच्या मते वायू प्रदूषणासाठी मास्क वापरणे अव्यवहार्य असले तरी एन-९५ मास्क जर व्यवस्थितरित्या वापरला तर लहान प्रदूषण कणांपासून काही अंशी सरंक्षण होऊ शकते. सर गंगा राम रुग्णालयाचे चेस्ट सर्जन डॉ. अरविंद कुमार यांनी द इंडियन एक्स्प्रेसला सांगितले, “सध्याची प्रदूषण पातळी इतक्या उच्च स्तरावर पोहोचली आहे की, लोकांना आठवड्याचे २४ तास एन-९५ मास्क वापरावा लागू शकतो. मात्र, हे अव्यवहार्य आणि अशक्य आहे. पण, जर बाहेर जाताना एन-९५ मास्क व्यवस्थित चेहऱ्याला लावून वापरला तर त्याचा काही अंशी तरी फायदा नक्कीच होईल.”

air pollution in Mumbai news
मुंबईची हवा पुन्हा प्रदूषित; कुलाबा, कांदिवली येथे ‘वाईट’ हवेची नोंद
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
50 to 60 school students hospitalised after lpg gas leak at jsw company in jaigad
जयगड येथील जेएसडब्ल्यू कंपनीमध्ये एलपीजी वायू गळती; नांदिवडे माध्यमिक विद्यालयाच्या ५० ते ६० विद्यार्थ्यांना त्रास
Graded Response Action Plan project to monitor air pollution Pune news
पिंपरी: हवा प्रदूषणावर आता ‘ग्रॅप’ची नजर; प्रदूषण करणारे उद्योग…
badlapur east gas spread loksatta news
बदलापूर पूर्वेत पसरला रासायनिक वायू; रहिवाशांना डोळे चुरचुरणे, श्वसनाचा त्रास, वायूगळतीचा संशय
Union Health Minister confirms sudden deaths in India are not caused by COVID-19 vaccines, addressing public concerns about vaccine safety.
Deaths Due To Corona Vaccine : “करोना लशीमुळे झाले नाहीत लोकांचे मृत्यू”, मोदी सरकारने संसदेत सांगितली अचानक मृत्यूंमागील कारणे
george soros loksatta editorial
अग्रलेख : ‘परदेशी हाता’चे भूत!
clean up marshal action against those responsible for littering
क्लीन अप मार्शलकडून अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा; पालिकेच्या तिजोरीत आठ महिन्यांत ३ कोटी दंड जमा

हे वाचा >> “घरातही मास्क घालावा लागत आहे”; दिल्लीतील प्रदूषणावरुन सरन्यायाधीशांनी केंद्र सरकारला फटकारले

डॉ. अरविंद कुमार यांचे मत जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) व्यक्त केलेल्या मताशी मिळतेजुळते आहे. डब्लूएचओने म्हटल्यानुसार, आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी चेहऱ्यावरील मास्क हा उत्तम मानला जात नसला तरी विशिष्ट परिस्थितीमध्ये मास्क वापरला जाऊ शकतो. जसे की, हवेच्या गुणवत्तेने धोकादायक पातळी ओलांडल्यानंतर बाहेर दीर्घकाळ प्रवास करताना किंवा मोकळ्या जागेत काम करत असताना मास्कचा वापर करणे योग्य ठरू शकते.

२०२१ साली यूएसएमध्ये झालेल्या एका अभ्यासानुसार एन-९५ मास्कमुळे बारीक कणांपासून संरक्षण मिळते. व्हिएतनाम येथे झालेल्या आणखी एका अभ्यासानुसार, वेगवेगळ्या प्रकारचे मास्क वापरून अति सूक्ष्म कणांचे परीक्षण केले असता इतर मास्कच्या तुलनेत एन-९५ मास्कने सूक्ष्म कणांना रोखण्यात ६० टक्क्यांपर्यंत यश मिळवले असल्याचे दिसले. एखादी व्यक्ती मास्क कसा वापरते, त्यावर सर्व काही निर्भर आहे. जर मास्क घालताना दोन्ही बाजूंनी थोडीशी जरी मोकळी जागा राहिली असेल, तर त्यातून हवेसह बारीक कणांचा शिरकाव होऊ शकतो.

वायू प्रदूषकापासून मास्क सरंक्षण देऊ शकतो का?

डॉ. अरविंद कुमार यांनी सांगितले की, एन-९५ सारखे मास्क काही अंशी छोट्या कणांपासून संरक्षण देत असले तरी ते सल्फर डाय ऑक्साइड, नायट्रोजन डाय ऑक्साइड आणि ओझोन यांसारख्या वायू प्रदूषकांच्या संपर्कात येण्यापासून रोखू शकत नाहीत. वायू प्रदूषक एन-९५ मास्कलाही भेदून जाऊ शकतात. काही कार्बन फिल्टर्स विकसित करण्यात आलेले आहेत, पण ते सक्रिय ठेवण्यात अजून तरी पूर्णपणे यश आलेले नाही.

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, दिल्ली (AIIMS) यांनी केलेल्या एका अभ्यासात असे दिसले की, नायट्रोजन डाय ऑक्साइडच्या (NO2) संपर्कात शून्य ते सात दिवसांच्या कालावधीत अगदी थोड्या वेळाकरिताही संपर्क आला, तर रुग्णालयाच्या इमर्जन्सी विभागात ५३ टक्क्यांनी रुग्णसंख्या वाढते. एम्सच्या म्हणण्यानुसार ही चिंताजनक परिस्थिती आहे. कारण आपल्याला परिचित असलेल्या पीएम २.५ च्या पातळीत वाढ झाल्यानंतर रुग्णसंख्या तुलनेने १९.५ टक्के वाढत असते.

कोणता मास्क वापरणे योग्य राहील?

द इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या माहितीनुसार, सर्जिकल आणि कापडी मास्क वापरणे व्यवहार्य ठरणार नाही. कारण वायू प्रदूषणाच्या घटकांना रोखण्यात असे मास्क अपयशी ठरतात. तुमच्या चेहऱ्यावर योग्यरितीने बसणारे एन-९५ किंवा एन-९९ मास्क वापरणे योग्य ठरू शकते. मास्क चेहऱ्यावर घट्ट बसण्यासाठी नाकाच्या वर मास्कला क्लिप असणे आवश्यक आहे. मास्क व्यवस्थित बसविण्याची सोय हवी. ज्याच्या पट्ट्या डोक्यावरून घेता येऊ शकतात, जेणकरून मास्कमधून हवा आत-बाहेर करण्यास जागा मिळणार नाही.

तुमचा मास्क प्रभावी आहे, याची खात्री कशी कराल?

मास्क घालताना तुमचे नाक आणि तोंड व्यवस्थित झाकले गेले आहे का, याची खात्री करा. मास्क व्यवस्थित बसविण्यासाठी नाकावरील क्लिप घट्ट करा. विशेष म्हणजे वेळोवेळी मास्क बदलत रहा आणि तुटलेले मास्क वापरण्याचे टाळा. डॉ. कुमार म्हणाले, “एन-९५ मास्क तुटत नाहीत, तोपर्यंत तुम्ही ते वापरू शकता. जर तुम्ही सारखी मास्कची उघडझाप करत असाल तर मास्क लवकर खराब होईल. तुटलेला किंवा चुरगळलेला (घड्या पडलेला) मास्क तुम्हाला योग्य संरक्षण देऊ शकणार नाही. तसेच मास्क कधी ओला करू नये.”

हवेचा गुणवत्ता निर्देशांक (AQI) म्हणजे काय?

दिल्ली आणि मुंबई या दोन महानगरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वायू प्रदूषणाने उच्चांक गाठला असल्याच्या बातम्या येत आहेत. वायू प्रदूषणाची पातळी दर्शविण्यासाठी हवेचा गुणवत्ता निर्देशांक (Air Quality Index – AQI) सांगितला जातो. त्यावरून त्या त्या दिवसाची वायू प्रदूषण पातळी किती आहे, याचा अंदाज घेतला जातो. हल्ली तर आपल्या स्मार्टफोनमध्येही तुम्ही ज्या ठिकाणी नियमित जात असाल त्या ठिकाणचा एक्यूआय काय आहे, हे सांगणारे नोटिफिकेशन व्हेदर विजेटद्वारे (स्मार्टफोनमध्ये हवामानाबाबत अपडेट देणारी सुविधा) पाठविली जाते. अधिक एक्यूआयचा अर्थ अधिक प्रदूषण. शुक्रवारी दिल्लीमधील हवेचा एक्यूआय ४७१ एवढा होता. मुंबईचा सरासरी हवेचा गुणवत्ता निर्देशांक १६० च्या आसपास असल्याचे दिसून येत आहे. मात्र, उपनगरात वेगवेगळा निर्देशांक असू शकतो. एक्यूआय डॉट इन या वेबसाईटवर तुम्ही भारतातील सर्व शहरांचा रिअल टाइम एक्यूआय तपासू शकता.

एक्यूआय दाखविण्याची सुरुवात कधी झाली?

२०१४ साली भारतात रंगाच्या सहाय्याने एक्यूआय निर्देशांक दाखविण्यास सुरुवात झाली. या निर्देशांकामुळे सरकार आणि सामान्य नागरिकांनाही हवेच्या गुणवत्तेचा अचूक अंदाज घेणे शक्य होत आहे. वैद्यकीय क्षेत्र, वायू प्रदूषण अभ्यासक, शिक्षण क्षेत्र, विविध संस्था अशा क्षेत्रांतील तज्ज्ञांना एकत्र करून तांत्रिक अभ्यासाद्वारे आयआयटी कानपूर यांच्यातर्फे एक्यूआय निर्देशांक दाखविण्याची सुरुवात करण्यात आली.

या निर्देशांकाच्या सहा श्रेणी आहेत. ० ते ५० चांगली, ५० ते १०० समाधानकारक, १०० ते २०० मध्यम प्रदूषित, २०० ते ३०० खराब, ३०० ते ४०० अतिशय खराब आणि ४०० ते ५०० गंभीर परिस्थिती. या श्रेणीनुसार दिल्लीतील परिस्थिती गंभीर असल्याचे लक्षात येते, तर मुंबई मध्य प्रदूषित आणि काही उपनगरांमध्ये खराब हवामान असल्याचे दिसते.

केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या अखत्यारित असलेल्या केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, एक्यूआयमुळे विविध प्रदूषकांचे हवेतील जटिल प्रमाण एकाच संख्येत (निर्देशांक), नावात आणि रंगाद्वारे पाहता येणे शक्य झाले आहे. एक्यूआयद्वारे पीएम १०, पीएम २.५, नायट्रोजन डाय ऑक्साईड, ओझोन, कार्बन आदी प्रदूषकांची मोजदाद केली जाते.

Story img Loader