तंत्रज्ञानाच्या जोरावर माणूस दिवसेंदिवस प्रगती करत आहे. मात्र, याच प्रगतीसोबत प्रदूषणदेखील तेवढ्याच प्रमाणात वाढत असून त्याचा वाईट परिणाम मानवी जीवनावर पडत आहे. याच प्रदूषणासंदर्भात शिकागो विद्यापीठाच्या एनर्जी पॉलिसी इन्स्टिट्यूटने एक महत्त्वाचा अहवाल जारी केला आहे. या अहवालानुसार हवा प्रदूषणामुळे दक्षिण आशियाई देशातील लोकांचे आयुर्मान ५.१ वर्षांनी घटत आहे, असे सांगण्यात आले आहे. याच अहवालात भारतातील प्रदूषणावरही महत्त्वाचे आणि काळजीत टाकणारे भाष्य करण्यात आले आहे. हा अहवाल काय आहे? या अहवालात भारतासंदर्भात काय माहिती देण्यात आलेली आहे, यावर नजर टाकू या….

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतातील नागरिकांचे आयुर्मान ५.३ वर्षांनी कमी होत आहे

‘एअर क्वालिटी लाईफ इन्डेक्स (एक्यूएलआय) ॲन्यूअल अपडेट २०२३’ असे या अहवालाचे नाव आहे. या अहवालात खराब हवेमुळे भारतातील नागरिकांचे आयुर्मान साधारण ५.३ वर्षांनी कमी होत आहे, असे सांगण्यात आले आहे. सूक्ष्म कणांमुळे होणारं प्रदूषण (Particulate Pollution) आणि या प्रदूषणाचा मानवावर होणारा परिणाम याचा या अहवालात अभ्यास करण्यात आला आहे. त्यासाठी २०२१ सालच्या सूक्ष्म कणांच्या (पार्टिक्यूलेट मॅटर- पीएम २.५) डेटाची मदत घेण्यात आलेली आहे.

दक्षिण आशिया आणि हवा प्रदूषण

सध्या हवा प्रदूषण हा दक्षिण आशियापुढचा सर्वांत महत्त्वाचा आणि चिंतेचा विषय ठरतोय. विशेष म्हणजे बांगलादेश, भारत, नेपाळ, पाकिस्तान या देशांतील नागरिकांना याबाबत चिंता करणे गरजेचे आहे. या देशांत राहणाऱ्या लोकांचे हवा प्रदूषणामुळे आयुर्मान कमी होत असल्याचे वर नमूद केलेल्या अहवालात सांगण्यात आले आहे. “तंबाखू सेवनामुळे या देशातील लोकांचे आयुर्मान साधारण २.८ वर्षांनी कमी होत आहे; तर दूषित पाणी, स्वच्छता यामुळे येथील लोकांचे आयुर्मान साधारण एक वर्षाने कमी होत आहे. मद्य सेवनामुळे हेच आयुर्मान अर्ध्या वर्षाने कमी होत आहे”, असे या अहवालात सांगण्यात आले आहे. “२००० साली हवा प्रदूषणाचे प्रमाण स्थिर राहिले असते, तर त्या देशांतील लोकांचे आयुर्मान २०२१ रोजी ५.३ वर्षांनी कमी न होता ते ३.३ वर्ष इथवरच स्थिर राहिले असते”, असेही या अहवालात सांगण्यात आले आहे.

बांगलादेशमध्ये सर्वाधिक प्रदूषण

या अहवालानुसार जगाच्या तुलनेत बांगलादेशमध्ये सर्वाधिक प्रदूषण होते. या देशात २०२० सालाच्या तुलनेत २०२१ साली सूक्ष्म कणांच्या प्रदूषणात साधारण २.१ टक्क्याने घट झालेली आहे. असे असले तरी जागतिक आरोग्य संघटनेच्या मर्यादेपेक्षा हे प्रदूषण गेल्या दशकाच्या तुलनेत साधारण १४ ते १५ टक्के जास्त आहे. या प्रदूषणामुळे दक्षिण आशियाई देशातील प्रत्येक नागरिकांचे सरासरी आयुर्मान साधारण ६.८ वर्षांनी कमी होणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशानुसार सूक्ष्म कणांचे (पार्टिक्यूलेट मॅटर- पीएम २.५) वार्षिक सरासरी प्रमाण हे ५ µg/m3 (मायक्रो ग्रॅम प्रति घनमीटर) पेक्षा जास्त नसावे.

भारतातील हवेत सूक्ष्म कणांचे प्रमाण प्रमाणापेक्षा जास्त

भारत हा सर्वाधिक लोकसंख्या असलेला दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. या देशात साधारण १.३ अब्ज लोक राहतात. या देशातही सूक्ष्म कणांमुळे होणारे प्रमाण जागतिक आरोग्य संघटनेने घालून दिलेल्या मर्यादेपेक्षा खूप जास्त आहे. वायुप्रदूषणावर नियंत्रण राहावे म्हणून भारताने वातावरणातील सूक्ष्म कणांचे प्रमाण हे ४० मायक्रोग्रॅम प्रति घनमीटरपेक्षा जास्त नसावे, असे निश्चित केलेले आहे. प्रत्यक्षात मात्र वायुप्रदूषण हे वर नमूद केलेल्या राष्ट्रीय वायू गुणवत्ता मानकापेक्षा कितीतरी जास्त आहे.

२०१३ ते २०२१ या काळातील ५९.१ टक्के प्रदूषणवाढीसाठी भारत जबाबदार

गेल्या काही वर्षांपासून भारतातील वायुप्रदूषण दिवसेंदिवस वाढत गेलेले आहे. या अहवालानुसार १९९८ ते २०२१ सालापर्यंत सूक्ष्म कणांचे प्रदूषण हे साधारण ६७.७ टक्क्यांनी वाढलेले आहे, तर सरासरी आयुर्मान हे २.३ वर्षांनी घटले आहे. २०२० ते २०२१ या काळात भारतातील सूक्ष्म कणांचे प्रमाण (पीएम २.५) हे ५६.२ पासून ५८.७ मायक्रो ग्रॅम प्रति घनमीटर एवढे वाढले आहे. ही वाढ जागतिक आरोग्य संघटनेच्या ठरवून दिलेल्या प्रमाणाच्या तुलनेत दहा पटीने जास्त आहे. यासह जगातील २०१३ ते २०२१ या काळातील ५९.१ टक्के प्रदूषणवाढीसाठी भारत जबाबदार आहे, असेही या अहवालात सांगण्यात आले आहे.

प्रदूषणामुळे साधारण १६.७ लाख लोकांचा अकाली मृत्यू

भारताच्या उत्तर भागातील मैदानी प्रदेशात सर्वाधिक प्रदूषण होत आहे. या भागात दिल्ली परिसरातील पीएम २.५ चे प्रमाण हे २०२१ साली तब्बल १२६.५ मायक्रो ग्रॅम प्रति घनमीटर एवढे आढळून आले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात वायुप्रदूषण होत असल्यामुळे दिल्लीकरांचे सरासरी आयुर्मान हे ११.९ वर्षांनी कमी होण्याची शक्यता आहे. लॅन्सेटने २०२२ साली एक अभ्यास केला होता. या अभ्यासानुसार वायुप्रदूषणामुळे भारतात २०१९ साली साधारण १६.७ लाखांपेक्षा अधिक अकाली मृत्यू झाले. यातील ९.८ लाख मृत्यू हे पीएम २.५ मुळे झाले होते; तर ६.१ लाख मृत्यू हे घरगुती वायुप्रदूषणामुळे झाले होते.

वायुप्रदूषण वाढण्याचे कारण काय?

दक्षिण आशियामध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषणात वाढ होत आहे. सातत्याने वाढत असलेले औद्योगिकीकरण, आर्थिक विकास, लोकसंख्या वाढ अशा काही कारणांमुळे प्रदूषणात सातत्याने वाढ होत आहे. वर नमूद केलेल्या अहवालानुसार २००० सालापासून भारत आणि पाकिस्तानमध्ये वाहनांत चार पटीने वाढ झाली आहे. बांगलादेशमध्ये २०१० ते २०२० या काळात वाहनांची संख्या साधारण तिप्पट झाली आहे.

जीवाश्म इंधनामुळे प्रदूषणात वाढ

फक्त वाहनांमध्ये होणारी वाढ हेच एक कारण प्रदूषणवाढीस कारणीभूत नाहीये, तर जीवाश्म इंधनाच्या वाढत्या वापरामुळेही प्रदूषणात वाढ होत आहे. १९९८ ते २०१७ या कालावधीत बांगलादेश, भारत, नेपाळ, पाकिस्तान या देशांत जीवाश्म इंधनांचा वापर करून वीजनिर्मितीचे प्रमाण हे तिप्पट झाले आहे. वीजनिर्मिती वाढल्यामुळे या देशातील लोकांचे राहणीमान उंचावले आहे. या देशात प्रगती दिसू लागली आहे. असे असले तरी या वीजनिर्मितीमुळे सूक्ष्म प्रदूषण कणांमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Air pollution increasing in south asia country life years reducing due to pollution know detail information prd