विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर जगात अनेक अविष्कार घडत आहेत. कधी कल्पनाही न केलेल्या आणि प्रत्यक्षात येणार नाहीत, असे वाटणाऱ्या गोष्टी आज आपण वापरत, पाहत आहोत. सध्या रस्त्यावरील वाहनांची गर्दी, वायू प्रदूषण हा मुद्दा भारतासह संपूर्ण जगापुढील एक प्रमुख समस्या झाला आहे. रस्त्यांवरील ट्रॅफिकमुळे अर्ध्या तासाच्या प्रवासाला कित्येक तास लागतात. याच कारणामुळे आता प्रदूषण कमी व्हावे तसेच प्रवासात वेळ जाऊ नये म्हणून भारतात हवेत प्रवास करणाऱ्या एअर टॅक्सीची २०२६ सालापर्यंत सुरुवात होण्याची शक्यता आहे. ही एअर टॅक्सी नेमकी काय आहे? अशा प्रकारच्या टॅक्सीचा नेमका फायदा काय? ही संकल्पना कधीपर्यंत प्रत्यक्षात येऊ शकते? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ या…
दोन कंपन्या आल्या एकत्र
भारतात एअर टॅक्सीला मूर्त रुप देण्यासाठी इंडिगो या विमान वाहतूक कंपनीची पालक कंपनी इंटर ग्लोब इंटरप्रायजेस तसेच अमेरिकेतील आर्चर एव्हीएशन या दोन्ही कंपन्या एकत्र आल्या
आहेत. या दोन्ही कंपन्या भागीदारीच्या माध्यमातून २०२६ सालापर्यंत भारतात एअर टॅक्सी कार्यान्वित करण्याच्या प्रयत्नात आहेत. एअर टॅक्सीची ही सुविधा देशात सर्वप्रथम दिल्ली, मुंबई, बंगळुरू या प्रमुख शहरांत सुरू केली जाणार आहे. एअर टॅक्सीमुळे एकूण ९० मिनिटांचा प्रवास ७ मिनिटांत होईल, असा दावा या कंपन्यांनी केला आहे.
२०२६ सालापर्यंत भारतात एअर टॅक्सी?
इंटरग्लोब आणि आर्चर एव्हीएशन या दोन्ही कंपन्या २०२६ सालापर्यंत भारतात एअर टॅक्सी सुविधा सुरू करण्याच्या प्रयत्नात आहेत. हा प्रकल्प खरंच प्रत्यक्षात उतरल्यास वाहतूक कोंडीची समस्या काही प्रमाणात कमी होऊ शकते. शुक्रवारी (१० नोव्हेंबर) एअर टॅक्सीच्या या प्रकल्पाची इंटरग्लोब इंटरप्राजेस या कंपनीने घोषणा केली. विशेष म्हणजे ही सुविधा किफायतशीर असेल, असे आश्वासन या कंपन्यांनी दिले आहे.
९० मिनिटांचा प्रवास फक्त ७ मिनिटांत
या ई-एअरक्राफ्टमधून पायलटसह एकूण पाच जण प्रवास करू शकतात. या प्रकल्पाअंतर्गत अशा प्रकारच्या एकूण २०० एअर टॅक्सी सरू केल्या जाणार आहेत. या एअर टॅक्सी दिल्ली, मुंबई, बंगळुरू अशा प्रमुख आणि मोठ्या शहरांत सुरू केल्या जातील. या कंपन्यांच्या म्हणण्यानुसार दिल्लीमध्ये एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी साधारण ६० ते ९० मिनिटे लागत असतील तर त्याच ठिकाणी एअर टॅक्सीच्या माध्यमातून अवघ्या सात मिनिटांत पोहोचता येईल.
अन्य क्षेत्रांतही विस्तार करण्याचा प्रयत्न
इंटरग्लोब इंटरप्रायजेस कंपनी आपल्या eVTOL विमानसेवेचा कार्गो, मालवाहतूक, वैद्यकीय सेवा, आपत्कालीन तसेच चार्टर सेवा अशा वेगवेगळ्या क्षेत्रात विस्तार करण्याच्या प्रयत्नात आहे. आर्चर एव्हीएशन या कंपनीने याआधीच अमेरिकेच्या वायूसेनेशी अशा प्रकारचा एक करार केला आहे. तसेच संयुक्त अरब अमिरातीसोबतही असाच करार करण्याचा प्रयत्न आर्चर एव्हीएशनकडून केला जात आहे.
अमेरिकेशी ११४२ कोटी रुपयांचा करार
या वर्षाच्या जुलै महिन्यात आर्चर एव्हीएशन या कंपीने अमेरिकेशी १४२ डॉलर्सचा (११४२ कोटी रुपये) करार केला आहे. या कराराअंतर्गत ही कंपनी अमेरिकेला एकूण ६ मीडनाईट विमाने पुरवणार आहे. तसेच संयुक्त अरब अमिरातीमध्ये ऑक्टोबर महिन्यात एअर टॅक्सी सेवा सुरू होण्याची शक्यता आहे.
भारतात पायाभूत सुविधा नाही
दरम्यान, भारतात मात्र आपल्या eVTOL विमानसेवेसाठी नियमावली तसेच आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध नाहीत. नागरी उड्डाण मंत्रालय अशा प्रकारच्या सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. भारतात शहरीकरण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तसेच शहरातील लोकसंख्यादेखील सातत्याने वाढत आहे. अशा स्थितीत आपल्या eVTOL विमानसेवा ही संभाव्य मोठी बाजारपेठ असू शकते. त्यावर भारताकडून विचार केला जात आहे.