विमान प्रवास करताना बोर्डिंग पास, ठरावीक वेळेआधी उपस्थित राहून चेक-इन आणि इतर प्रक्रियेमुळे प्रवासाच्या किमान दोन तास आधी विमानतळावर पोहोचणं अपेक्षित असतं. अशा वेळी या सर्व प्रक्रिया ऑनलाइन झाल्या तर… मग तर विमान प्रवास आणखी सोईस्कर ठरेल. डिजिटलायजेशनच्या या काळात आता विमान प्रवासाबाबतही काही सुधारणा केल्या जाण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेने (ICAO) केलेल्या धोरणात्मक बदलामुळे, येत्या काही वर्षांत चेक-इनची पद्धत आणि प्रवासासाठी लागणारी कागदपत्रे या प्रक्रियेत बदल होऊ शकतात. कारण- बहुतांश क्षेत्रात आता बायोमेट्रिक ओळख आणि डिजिटल क्रेडेन्शियल्सद्वारे सर्व प्रक्रिया केल्या जातात.

नक्की बदल कोणते?

चेक-इन प्रक्रिया आणि बोर्डिंग पास जारी करणे यांसारख्या दीर्घकालीन प्रक्रियांवर उपाय शोधला जात आहे. त्यासाठी नागरी विमान वाहतुकीसाठी आंतरराष्ट्रीय मानके निश्चित करणारी संयुक्त राष्ट्रांची विशेष एजन्सी (ICAO) पुढाकार घेत आहे. यूकेतील एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, “संघटना दोन ते तीन वर्षांत जगभरात स्वीकारले जाऊ शकते, असे नवीन डिजिटल प्रोटोकॉल लागू करण्याची योजना आखत आहे. त्यामुळे विमानतळावरून प्रवास करते वेळी केल्या जाणाऱ्या प्रक्रियेमध्ये आमूलाग्र बदल होऊ शकतो.
सध्याच्या बोर्डिंग पास पद्धतीऐवजी डिजिटल ट्रॅव्हल क्रेडेन्शियल ही पद्धत वापरात आणण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे प्रवाशांना त्यांच्या स्मार्टफोनमध्ये व्हेरिफाइड पासपोर्ट उपलब्ध होऊ शकतो.

या डिजिटल क्रेडेन्शियल्समुळे एअरपोर्ट आणि एअरलाइन्स प्रशासनाला प्रवाशांची पडताळणी फेशियल रेकग्निशनमार्फत करता येईल. प्रवाशाची ओळख पटवून घेण्यासाठी सध्याप्रमाणे कागदोपत्री पडताळणीची गरज लागणार नाही. ही नवीन पद्धत एअरपोर्ट पायाभूत सुविधा पुरवणाऱ्या प्रशासनाशी किंवा एअरलाइन्स प्रशासन आणि प्रवासी यांमध्ये संवाद साधण्याची आतापर्यंतची सर्वांत मोठी सुधारणा ठरेल.

प्रवासी पास याबाबत माहिती

यामध्ये सर्वांत महत्त्वाचा बदल म्हणजे बोर्डिंग पास आणि मॅन्युअल चेक-इनच्या जागी डिजिटल प्रवासी पास घेणे. हा पास प्रवाशांना विमान प्रवास बुक करताना त्यांच्या फोनवर उपलब्ध होईल. त्यामध्ये प्रवासासंबंधित सर्व आवश्यक माहिती असेल आणि प्रवासात होणारे कोणतेही बदल आपोआप नमूद होतील. त्यामुळे प्रवाशांना ऑनलाइन किंवा विमानतळावर चेक-इन करण्याची आवश्यकता नाही. विमान कंपन्या त्यांच्या प्रवाशांसाठीच्या माहितीसाठी चेक-इन प्रक्रियेवर अवलंबून नसतील. प्रवासी विमानतळावर पोहोचल्यावर या नवीन पद्धतीप्रमाणे प्रवेश करताना त्यांचा चेहरा स्कॅन होईल. त्यानुसार तो प्रवासी विमानतळावर उपस्थित असून, तो प्रवास करण्यास तयार असल्याची सूचना एअरलाइन सिस्टीमला आपोआप मिळेल. सध्या एअरलाइन कंपन्यांना प्रवाशांची माहिती स्वहस्ते ट्रान्स्फर करावी लागते. मात्र, या पद्धतीने ही सर्व प्रक्रिया डिजिटल माध्यमातून होईल.
“सध्या एअरलाइन्सकडे बऱ्याच बंद असलेल्या सिस्टीम्स आहेत”, असे अमेडियसमधील जागतिक प्रवास तंत्रज्ञान प्रदात्या व्हॅलेरी व्हायल यांनी एका वृत्तपत्राला सांगितले. “चेक-इन पेज उघडल्यावर आरक्षण प्रणालीत डिलिव्हरी सिस्टीममध्ये तुमचे आरक्षण तुम्हाला दिसेल. भविष्यात अधिकाधिक प्रमाणात या नवीन पद्धतीचा वापर होईल आणि प्रवासी पासमार्फत प्रवास अधिक गतिमान होईल”, अशी माहिती व्हायल यांनी दिली.

विमानतळावरील कार्यपद्धती

या नवीन पद्धतीनुसार प्रभावीपणे काम करण्यासाठी जगातील सर्व विमानतळ प्रशासनांनी पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा करण्याची गरज आहे. या पद्धतीनुसार विमानतळावरील चेक-इनची प्रमुख ठिकाणे म्हणजेच मुख्य प्रवेशद्वार, सामानाचे ठिकाण, सुरक्षा चौक्या व बोर्डिंग गेट्स इथे चेहऱ्याची ओळख पटवणाऱ्या तंत्रज्ञानाची सुविधा उपलब्ध करणे आवश्यक आहे, ज्यामार्फत प्रवाशांना त्यांचा चेहरा स्कॅन करून ओळख पटवून देता येईल.
त्याचप्रमाणे फोनवरून थेट पासपोर्ट डेटा पडताळण्यासाठी आणि विविध प्रवास प्रणालींमध्ये प्रत्येक क्षणाचे अपडेट राखण्यासाठी सुरक्षित आणि त्वरित डेटा ट्रान्स्फर सुनिश्चित करण्यासाठी विमानतळ प्रशासनाला त्याप्रमाणे तंत्रज्ञान विकसित करावे लागेल.

व्हायल यांनी याबाबत काही समस्या व्यक्त करताना म्हटले, “या उद्योगात सर्व काही सुसंगत आणि परस्परपूरक पद्धतीने चालणे आवश्यक आहे. परंतु, अनेक विमानतळांवरील प्रवास प्रणाली गेल्या ५० वर्षांहून अधिक काळ बदलल्या गेलेल्या नाहीत.” तसेच डिजिटल दृष्टिकोनाकडे वळण्यासाठी संबंधित सरकार, तंत्रज्ञान प्रदाते, विमान कंपन्या आणि विमानतळ ऑपरेटर यांच्यात प्रक्रिया आणि प्रणालींचे प्रमाणीकरण करण्यासाठीचे परस्पर सहकार्यदेखील आवश्यक आहे.

ही पद्धत वेगळी का ठरते?

डिजिटल प्रवास प्रमाणपत्र आणि प्रवासी पासचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे विमान प्रवासातील व्यत्यय अधिक कार्यक्षमतेने हाताळण्याची क्षमता. विमान प्रवासास विलंब किंवा चुकीच्या माहितीमुळे प्रवाशांना काही वेळा नाहक त्रास सहन करावा लागतो. अशा वेळी या पद्धतीमार्फत प्रवाशांना फोनवर तत्काळ सतर्क करता येऊ शकते. त्याशिवाय नवीन बोर्डिंग माहिती प्रदान करता येईल आणि प्रवासाच्या नवीन माहितीसह डिजिटल पास अपडेट होऊ शकतो. या पद्धतीचा मूळ उद्देश प्रवासातील व्यत्ययादरम्यान ताण आणि अनिश्चितता कमी करणे आहे. त्याशिवाय यामुळे प्रवाशांना रांगेत किंवा ग्राहक सेवा पोर्टलवर वेळ घालवण्याची गरज लागणार नाही.

माहिती गोपनीयतेचा प्रश्न

अशा पद्धतींचा वापर केला जात असताना माहिती गोपनीयतेबाबत चिंता वाटू शकते. नवीन पद्धतीमध्ये बायोमेट्रिक आणि स्कॅनिंग अशी यंत्रणा वापरल्याने माहिती गोपनीयतेबाबत किती सुरक्षितता पाळली जाईल याबाबत प्रवाशांनीही प्रश्न उपस्थित केले आहेत. गोपनीयता आणि संरक्षण हे या पद्धतीत आधीपासूनच असेल, असे अमेडियस या कंपनीकडून सांगण्यात आले आहे. या कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, प्री-सिक्युरिटी गेट किंवा बोर्डिंगच्या ठिकाणी प्रक्रिया पूर्ण झाली की, १५ सेकंदांच्या आत प्रवाशाचा डेटा हटवला जाईल. त्यासाठी डेटा रिटेन्शन विंडो तयार करण्यात आली आहे. त्यामध्ये वैयक्तिक माहिती राखून ठेवणे आणि ती चुकीच्या पद्धतीने हाताळणे, तसेच ओळख पडताळणी सुनिश्चित करणे या बाबींचा समावेश आहे. या पद्धतीचा अवलंब करणे ही आताच्या काळातील प्रवासी प्रक्रियेतील सर्वांत महत्त्वाकांक्षी आणि व्यापक सुधारणा आहे. “२००० सालादरम्यान ई-तिकीट या पद्धतीचा केला गेलेला अवलंब हा प्रवासी प्रक्रियेतील शेवटचा बदल होता. तेव्हा आता अ‍ॅमेझॉन वापरत असलेल्या आधुनिक प्रणालीप्रमाणे अपग्रेड करण्याची वेळ आली आहे”, असे व्हायल यांनी सांगितले.