हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या (एचएएल) नाशिक प्रकल्पात ‘ए – ३२०’ या पहिल्या प्रवासी विमानाची संपूर्ण देखभाल-दुरुस्ती करण्यात आली. नुकतेच हे विमान एअरबसकडे सुपूर्द करण्यात आले. या केंद्रात आणखी दोन प्रवासी विमाने दुरुस्तीसाठी दाखल झाली आहेत. लढाऊ विमानांच्या निर्मितीसाठी आजवर नाशिक ओळखले जात होते. आता ते प्रवासी विमानांच्या देखभाल-दुरुस्तीचे केंद्र म्हणूनही नावारूपास येत आहे.
देशातील एकमेव ठिकाणी सुविधा
व्यावसायिक विमान कंपन्यांना सेवा देण्यासाठी एचएएलने नाशिकमध्ये स्थापलेले एकात्मिक देखभाल, दुरुस्ती व ओव्हरहॉल केंद्र कार्यरत झाले आहे. एअरबसच्या सहकार्याने ए – ३२० या लघू ते मध्यम पल्ल्याच्या व प्रवासी क्षमतेच्या विमानांच्या ताफ्यासाठी या ठिकाणी संपूर्ण देखभाल-दुरुस्तीची (एमआरओ, ओव्हरहॉल) सुविधा करण्यात आली. देशात अशा प्रकारची ही एकमेव ठिकाणी सुविधा आहे. यासंदर्भात नोव्हेंबर २०२३ मध्ये करार झाला होता. त्यानुसार पहिल्या ए – ३२० विमानाची दुरुस्ती पूर्ण करण्यात आली. स्टार एअर कंपनीची आणखी दोन विमानेही दुरुस्तीसाठी दाखल झाली आहेत. एअरबसच्या आशिया विभागातील सर्व प्रवासी विमानांची दुरुस्ती या केंद्रात केली जाणार आहे.
देखभाल-दुरुस्ती कशी असते?
प्रवासी विमानांच्या देखभाल-दुरुस्तीचे काम तीन पातळ्यांवर होते. विशिष्ट उड्डाण तासानंतर हवाई वाहतूक प्रचालक प्राथमिक पडताळणीची कामे आपल्या स्तरावर करतात. या विमानांची १८ ते २४ महिन्यांतून एकदा सखोल पडताळणी केली जाते. त्या अंतर्गत सर्व उपकरणे, इंजिन, ब्रेक, विमान उतरताना वापरला जाणारा गिअर, रचनात्मक सुटे भाग, विमान विज्ञानाशी संबंधित इलेक्ट्रॉनिक्स प्रणालींची तपासणी होते. त्यास अधिक वेळ लागतो. एअरफ्रेमची देखभाल, दुरुस्ती देशात होते. इंजिन व सखोल देखभालीची कामे अधिक्याने त्रयस्थ परदेशी संस्थेकडून करून घ्यावी लागत होती. हे अवलंबित्व नव्या केंद्रामुळे हळूहळू संपुष्टात येईल.
विस्तारणारा व्यवसाय
विमान कार्यरत राखण्यासाठी नियमित देखभाल, दुरुस्ती आणि संपूर्ण देखभाल-दुरुस्ती (ओव्हरहॉल) महत्त्वाची ठरते. या सेवा देणारे क्षेत्र एमआरओ उद्योग-व्यवसाय म्हणून गणले जाते. देशातील प्रवासी विमानांची संख्या एक हजारांचा टप्पा ओलांडण्याच्या मार्गावर आहे. वाढत्या प्रवासी संख्येमुळे भारतीय विमान वाहतूक जगातील तिसरी सर्वात मोठी हवाई प्रवासी वाहतूक बाजारपेठ बनणार आहे. विमान कंपन्यांच्या उत्पन्नातील जवळपास १३ टक्के निधी देखभाल, दुरुस्तीवर खर्च होतो. सध्या पावणेदोनशे कोटींवर असणारा दुरुस्ती व्यवसाय काही वर्षात ५०० कोटींवर जाण्याचा अंदाज आहे.
नाशिकची जागतिक पातळीवर ओळख
एचएएलच्या दुरुस्ती केंद्रामुळे नाशिक हे विमान वाहतूक (एव्हिएशन) क्षेत्राच्या जागतिक नकाशावर आले आहे. पुढील काळात देशातील नव्हे तर, जगातील अन्य कंपन्याही प्रवासी विमान दुरुस्तीसाठी नाशिककडे आकर्षित होतील, असा विश्वास नाशिक इंडस्ट्रीज ॲण्ड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि एव्हिएशन समितीचे अध्यक्ष मनिष रावत व्यक्त करतात. या केंद्रामुळे स्थानिक उद्योगांना विमानाचे सुटे भाग आणि तत्सम साहित्य पुरविण्याची संधी मिळेल. देशातील प्रवासी विमानांच्या ताफ्याबरोबर एमआरओ सेवांची मागणी वाढत आहे. देशात कमी खर्चात, कमी वेळेत विमान देखभाल, दुरुस्ती करता येईल. आवश्यक ते कुशल मनुष्यबळही स्थानिक पातळीवर उपलब्ध आहे. एचएएलचे हे केंद्र नाशिकच्या अर्थव्यवस्थेला चालना देणार आहे.
लढाऊ विमान ते प्रवासी विमान…
मिग, सुखोई या लढाऊ विमानांची बांधणी व संपूर्ण देखभाल-दुरुस्ती करणाऱ्या एचएएलने या निमित्ताने खासगी प्रवासी विमानांच्यी देखभाल, दुरुस्ती सेवा क्षेत्रात प्रवेश केला आहे. देशातील नागरी विमान वाहतूक उद्योग वेगाने विस्तारत आहे. यातील संधी साधण्याची तयारी कंपनीने केली. मागील सहा दशकात एचएएलने मिग प्रकारातील १८०० हून अधिक विमानांची देखभाल-दुरुस्ती, अद्ययावतीकरण केले आहे. सध्या सुखोई – ३० एमकेआयच्या दुरुस्तीचे काम केले जाते. जोडीला स्वदेशी बनावटीच्या तेजस लढाऊ विमानांची बांधणी प्रगतीपथावर आहे. लढाऊ विमानांच्या अनुभवाचा उपयोग खासगी प्रवासी विमानांसाठी केला जाणार आहे.
© The Indian Express (P) Ltd