हृषिकेश देशपांडे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याविषयी राज्याच्या राजकारणात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. विरोधी पक्षनेते असलेले अजित पवार वेगळी भूमिका घेणार काय, हा मुद्दा आहे. त्यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन आपण पक्षातच राहणार असल्याचे निक्षून सांगितले असले, तरी चर्चा थांबलेल्या नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ५३ पैकी ३० आमदार अजित पवार यांच्या पाठीशी असल्याची बातमी आल्याने पुन्हा चर्चा सुरू झाली. अजित पवार जो मार्ग निवडतील त्याला आमचा पाठिंबा आहे अशी प्रतिक्रिया त्यांच्या एका समर्थक आमदाराने वृत्तवाहिनीला दिली.

अजित पवार यांची ताकद किती?

६३ वर्षीय अजित अनंतराव पवार हे रोखठोक बोलणारे व्यक्तिमत्त्व. जनतेची कामे तातडीने मार्गी लावण्याची हातोटी असलेली व्यक्ती म्हणून दादा ओळखले जातात. आमदार तसेच कार्यकर्त्यांशी सातत्याने त्यांचा संपर्क असतो. त्यामुळे पक्षात त्यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या मोठी आहे. सहकार क्षेत्रातही काम करणाऱ्यांमध्ये अजित पवार यांना मानणारे अधिक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे पुतणे असलेले अजित पवार अलिकडे सातत्याने चर्चेत आहेत. भाजपबरोबर जाणार की ते वेगळा गट स्थापन करणार अशा बातम्या येत असतात. त्याचा इन्कार अजित पवार यांनी केला आहे. मात्र रविवारी महाविकास आघाडीची नागपूरमध्ये सभा झाली त्यात अजित पवार यांनी भाषण केले नाही. त्यासाठी प्रत्येक पक्षाच्या दोन नेत्यांनी भाषण करण्याचे ठरले होते असा युक्तिवाद केला जातो. मात्र सातत्याने राजकारणात सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर पाच ते सात मिनिटांत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असती, तर चित्र स्पष्ट झाले असते. पुत्र पार्थ यांचा २०१९च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यापासून अजित पवार अस्वस्थ असल्याचे विरोधक सांगतात. नोव्हेंबर २०१९मध्ये अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरच्या बहुचर्चित सकाळच्या शपथविधीनंतर अजित पवार यांच्याबाबतच्या वावड्या उठत असतात. याही वेळी तसे झाले आहे.

न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष…

शिंदे गटाच्या १६ आमदारांबाबत सर्वोच्च न्यायालयात निर्णय अपेक्षित आहेत. अशा वेळी नवी समीकरणे तयार होतात काय, याचे आडाखे बांधले जात आहेत. त्याला काही प्रमाणात सत्तारूढ गटातून खतपाणी घातले गेले. राज्यातील काही मंत्र्यांनी अजित पवार यांची स्तुती केली होती. त्यातच भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी दिल्लीवारी केल्याने याला बळच मिळाले. चंद्रशेखर बावनकुळे यांनी तर हा महिना पक्षप्रवेशाचा असल्याचे सांगितले. त्यांनी कुणाचेही नाव घेतले नाही. मात्र राजकारणात कोणी कायमचे मित्र किंवा शत्रू नसते असे दाखले दिले जात आहेत.

नाराजीच्या चर्चांवर अजित पवारांनी मांडली थेट भूमिका, म्हणाले…

राजकीय गणिते…

महाराष्ट्रात भाजपने २०२४मध्ये लोकसभेच्या ४८ पैकी ४० जागांचे लक्ष्य ठेवले आहे. उत्तर प्रदेशच्या ८० जागांनंतर राज्यात दुसऱ्या क्रमांकाच्या ४८ जागा आहे. बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल-संयुक्त जनता दल तसेच डावे पक्ष व काँग्रेसची आघाडी पाहता तेथील ४० जागांपैकी भाजपला यश मिळणे आव्हात्मक आहे. राजस्थान, मध्य प्रदेशात लोकसभेच्या बहुतेक सर्व जागा गेल्या वेळी भाजपने जिंकल्या होत्या. राजस्थानमध्ये गेल्या वेळी सर्व २५ तर मध्य प्रदेशातील २९ पैकी २८ जागी भाजप विजयी झाला होता. मात्र २०२४मध्ये त्याची पुनरावृत्ती करण्याच्या शक्यतेबद्दल शंका आहे. अशा वेळी उत्तर प्रदेश तसेच महाराष्ट्रात स्थान बळकट करण्याचा भाजपचा प्रयत्न सुरू आहे. त्यातूनच मग नव्या समीकरणांविषयी चर्चेला सुरुवात होते.

Video: अजित पवारांबाबतच्या दाव्यांवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; स्पष्टीकरण देताना म्हणाले, “ही चर्चा…!”

केंद्रीय यंत्रणांच्या दुरुपयोगाचा आरोप भाजपवर केला जात आहे. त्यासाठी पक्षबदल घडवले जात असल्याची टीका होते. अर्थात यातही काही मुद्दे अनुत्तरित आहेत. शिंदे गट तसेच अजितदादांना एकाच वेळी बरोबर कसे ठेवणार? शिंदे गटाचे नेते संजय शिरसाठ यांनीही सत्तेत राहण्याबाबत तसे विधान केले. त्यामुळे एकाच वेळी सगळ्यांचे समाधान भाजप करणे शक्य आहे काय? नेत्यांनी जरी पक्ष किंवा निष्ठा बदलली तरी मतदारांचा तसा प्रतिसाद राहील काय? या ‘जर तर’च्या शक्यता राजकीय पातळीवर पडताळल्या जात आहेत. प्रत्यक्षात अजितदादांच्या मनात काय आहे, याविषयी मात्र तर्कवितर्क सुरूच आहेत.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar not joining shinde fraction bjp alliance maharashtra politics print exp pmw