पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दल (एसएडी)चे माजी अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांना सुवर्ण मंदिरातील भांडी आणि स्नानगृह स्वच्छ करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ‘अकाल तख्त’चे जथेदार यांनी सुखबीर सिंग बादल यांना धार्मिक शिक्षा ठोठावली आहे. २००७ ते २०१७ दरम्यान पंजाबमधील पक्ष आणि त्यांच्या सरकारने केलेल्या चुकांमुळे अकाल तख्तने सुखबीर बादल यांना एसएडी अध्यक्षपदावरून हटवण्याची मागणी केली. मंगळवारी सुखबीर बादल यांनी धार्मिक शिक्षा स्वीकारली आहे. समोर आलेल्या काही दृश्यांमध्ये माजी एसएडी नेते सुवर्ण मंदिराच्या प्रवेशद्वारावर व्हीलचेअरवर बसलेले आणि त्यांच्या गळ्यात एक फलक आणि भाला धरल्याचे पाहायला मिळत आहे. सुखबीर बादल यांच्यावर काय आरोप आहेत? त्यांना कोणती शिक्षा देण्यात आली आहे? त्याविषयी सविस्तर जाणून घेऊ.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुखबीर बादल यांच्यावरील आरोप काय?

ऑगस्टमध्ये अकाल तख्तने २००७ ते २०१७ या काळात उपमुख्यमंत्री असताना घेतलेल्या काही निर्णयांबद्दल सुखबीर बादल यांना ‘तनखा’ (धार्मिक गैरवर्तनासाठी दोषी) घोषित केले. अकाल तख्तच्या पाच मुख्य पुजाऱ्यांनी ही घोषणा केली होती. ‘अकाल तख्त’चे जथेदार ग्यानी रघबीर सिंग यांनी आदेश वाचताना सांगितले की, सुखबीर बादल आणि इतर शीख कॅबिनेट मंत्र्यांनी १५ दिवसांत लेखी स्पष्टीकरण सादर करावे. अकाल तख्तच्या म्हणण्यानुसार, या कालावधीत भारतीय जनता पक्ष (भाजपा) बरोबर युती करून पंजाबचे शासन करणाऱ्या एसएडीने धार्मिक चुका केल्या, असे वृत्त ‘हिंदुस्तान टाइम्स’ने दिले आहे. सुखबीर बादल यांच्यावरील एक आरोप २०१५ मध्ये शीख धर्माचा मध्यवर्ती पवित्र धर्मग्रंथ असलेल्या गुरु ग्रंथ साहिबच्या अपमान प्रकरणाशी संबंधित आहे.

ऑगस्टमध्ये अकाल तख्तने २००७ ते २०१७ या काळात उपमुख्यमंत्री असताना घेतलेल्या काही निर्णयांबद्दल सुखबीर बादल यांना ‘तनखा’ (धार्मिक गैरवर्तनासाठी दोषी) घोषित केले. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

हेही वाचा : पाकिस्तानच्या हॉटेलसाठी न्यूयॉर्कवासीयांना अब्जावधीचा भुर्दंड का?

विशेष म्हणजे, अकाल तख्तने २०११ मध्ये सुखबीर यांचे दिवंगत वडील प्रकाशसिंग बादल यांना दिलेली ‘पंथ रतन फक्र-ए-कौम’ (समुदायाची शान) ही पदवी काढून घेतली आहे. त्यांना त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात शीखविरोधी निर्णय घेतल्याबद्दल शिक्षा झाली. पंजाबचे पाच वेळा मुख्यमंत्री राहिलेले प्रकाश बादल यांचे गेल्या वर्षी एप्रिलमध्ये निधन झाले. राम रहीम यांच्यावरील आरोपानंतर संपूर्ण पंजाबमध्ये शीख आणि डेरा अनुयायांमध्ये हिंसक संघर्ष झाला होता. २००७ मध्ये राम रहीमला शीख समुदायातून बहिष्कृत करण्यात आले होते, तरीही अकाली नेतृत्वाने त्याच्याशी संबंध ठेवल्याचा आरोप होता. त्यानंतर सुखबीर बादल आणि पक्षाचे इतर नेते डेरा प्रमुखाला अकाल तख्तकडून माफी मिळवून देण्याच्या प्रयत्नात होते. शिक्षा घोषित करण्यापूर्वी अकाल तख्तच्या जथेदारांनी सुखबीर सिंग बादल यांची अनेक मुद्द्यांवर चौकशी केली. शिखांची हत्या केल्याचा आरोप असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांना प्रोत्साहन देण्यास आणि तत्कालीन जथेदारांना चंदीगड येथील त्याच्या निवासस्थानी बोलावून गुरमीत राम रहीमला माफी देण्यास ते जबाबदार आहेत का, असे त्यांना विचारण्यात आले, असे ‘द प्रिंट’च्या वृत्तात नमूद करण्यात आले.

डेरा प्रमुखाला माफी देण्याच्या निर्णयाचे समर्थन करणाऱ्या जाहिरातींसाठी त्यांनी सुवर्ण मंदिराला दिलेल्या देणग्यांचा गैरवापर केला का, याबद्दलही त्यांना प्रश्न विचारण्यात आला, असे अहवालात म्हटले आहे. ऑक्टोबर २०१५ च्या कोटकापुरा पोलिस गोळीबारासह, अपवित्र वादाशी संबंधित अनेक घटनांशी ही शिक्षा जोडली गेली आहे. या काळात राज्याचे पोलिस प्रमुख म्हणून आयपीएस अधिकारी सुमेध सिंग सैनी यांची नियुक्ती केल्यानंतरदेखील सर्वोच्च शीख प्राधिकरणाकडून तीव्र टीका करण्यात आली होती. सैनी यांच्यावर पंजाबमधील दहशतवादाच्या काळात मानवाधिकारांचे उल्लंघन केल्याचाही आरोप आहे.

शीख धर्मीयांसाठी श्री गुरूग्रंथ साहिब याला श्रद्धेय मानले जाते. १४ ऑक्टोबर २०१५ रोजी, गुरुग्रंथ साहिबचा याचा अवमान केल्याप्रकरणी फरीदकोट जिल्ह्यातील बरगारी येथे निषेध करणाऱ्या कोटकपुरा आणि बेहबल कलान येथील आंदोलकांवर पोलिसांनी कथितपणे गोळीबार केला. बेहबल कलानमध्ये दोन शीख आंदोलकांना जीव गमवावा लागला, तर कोटकपुरा येथे अनेक जण जखमी झाले. फेब्रुवारी २०२३ मध्ये, एडीजीपी एलके यादव यांच्या नेतृत्वाखालील विशेष तपास पथकाने (एसआयटी) कोटकपुरा गोळीबार प्रकरणात आरोपपत्र दाखल केले. आरोपपत्रात प्रकाश सिंग बादल, त्यांचा मुलगा आणि सुखबीर बादल, माजी डीजीपी सुमेध सिंग सैनी यांच्यासह सहा पोलिस अधिकाऱ्यांची नावे आहेत.

त्यांना काय शिक्षा देण्यात आली?

अकाल तख्त सुखबीर बादल यांना ३ डिसेंबर रोजी दुपारी १२ ते १ या वेळेत श्री दरबार साहिब येथे स्नानगृह स्वच्छ करण्याचा आदेश देऊन ‘तनखा’ (धार्मिक शिक्षा) जाहीर केली. त्यांना तासभर भांडी धुणे आणि कीर्तन (गुरबानी) ऐकणेदेखील आवश्यक असल्याचे आदेशात सांगण्यात आले, असे वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे. विशेष म्हणजे भटिंडाच्या खासदार हरसिमरत कौर बादल यांचे पती सुखबीर बादल यांनी त्यांच्यावरील आरोप मान्य केले आहेत. सुखदेव सिंग धिंडसा, सुचा सिंग लंगाह, हिरा सिंग गाबरिया आणि बलविंदर सिंग भूंदर यांच्यासह शिरोमणी अकाली दलाशी संबंधित इतरांनाही धर्मगुरूंनी धार्मिक शिक्षा दिल्या. बादल यांना दोन दिवसांत दररोज एक तास सुवर्ण मंदिराबाहेर ‘सेवेदार’ म्हणून सेवा देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच त्यांना गुरुद्वारातील लंगरमध्ये तासभर सेवा देण्याचा आदेश आहे.

शीख धर्मगुरूंनी या आदेशाची सुनावणी करताना अकाली नेतृत्वावर टीका केली. त्यांनी सहा महिन्यांत एसएडी अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यासाठी नवीन निवडणुका घेण्याचे आवाहन केले आहे. विशेष म्हणजे सुखबीर बादल यांनी या वर्षी नोव्हेंबरमध्ये एसएडी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. “अकाली दल समाजासाठी अपयशी ठरला आणि परिणामी समाजाला शस्त्रे वापरून स्वतःचे रक्षण करावे लागले, त्यामुळे खूप रक्तपात झाला. पोलिसांनी क्रूरपणे महिला आणि मुलांसह शेकडो निरपराधांना ठार मारले,” असे तख्त श्री दमदमा साहिबचे जथेदार ग्यानी हरप्रीत सिंग म्हणाले, असे वृत्त ‘द प्रिंट’मध्ये दिले आहे.

हेही वाचा : ‘हा’ देश होणार पृथ्वीवरून गायब? कारण काय?

अकाली दलाचे सुखदेव सिंग धिंडसा, दलजित सिंग चीमा, हिरा सिंग गाबरिया, सुचा सिंग लंगाह, गुलजार सिंग राणीके आणि बलविंदर सिंग भुंदर या नेत्यांनाही अकाल तख्तने बादल यांनी घेतलेल्या निर्णयांचे समर्थन करण्यासाठी जबाबदार धरले होते. या सहाही नेत्यांना मंगळवार आणि बुधवारी तासभर सुवर्ण मंदिर संकुलातील स्वच्छतागृहे स्वच्छ करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर त्यांना लंगरमध्ये सेवा देण्याचे, भांडी धुण्याचे, तासभर कीर्तन ऐकण्याचे आणि शीख धर्माचा पवित्र धर्मग्रंथ सुखमणी साहिबचे संपूर्ण वाचन करण्याचेही आदेश आहेत.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akal takht ordered sukhbir badal to clean toilets wash utensils at golden temple rac