बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारचा अभियंता जसवंत सिंग गिल यांच्या बायोपिकमधील फर्स्ट लूक सध्या व्हायरल होत आहे. ट्रेड एक्स्पर्ट तरण आदर्श यांनी अक्षय कुमारचे एक पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नाही, पण या चित्रपटाची चांगलीच चर्चा सुरू आहे. अक्षय कुमारच्या नवीन चित्रपटासाठी सगळे उत्सुक असतात. यावर्षी त्याच्या चित्रपटांनी फारशी कमाल बॉक्स ऑफिसवर दाखवली नसली तरी तो जे चित्रपट करतो त्यासाठी प्रेक्षक त्याचं प्रचंड कौतुक करतात. चित्रपटाचे पोस्टर समोर येताच अनेकांनी यावर मत व्यक्त केलं आहे. प्रत्येकालाच ही कथा वेगळी वाटत आहे. अमृतसर येथील इंजिनीअर जसवंत सिंग गिल यांच्याबद्दल खरंतर प्रत्येक भारतीयाला ठाऊक असणं अत्यंत आवश्यक आहे. जसवंत हे ६५ लोकांचे प्राण वाचवणाऱ्या त्यांच्या शौर्यासाठी जगभरात ओळखले जातात!
२२ नोव्हेंबर १९३७ रोजी जन्मलेले जसवंत गिल हे पंजाबच्या अमृतसर शहरातील सठियाला परीसरातले रहिवासी होते. अमृतसरमधील प्रसिद्ध खालसा महाविद्यालयात त्यांनी शिक्षण घेतले आणि १९५९ मध्ये पदवी प्राप्त केली. गिल यांनी १९८९ मध्ये पश्चिम बंगालमधील राणीगंज येथे पाण्याने भरलेल्या कोळश्याच्या खाणीत अडकलेल्या खाण कामगारांचा जीव वाचवण्याचं महान कार्य केलं.
आणखी वाचा : सैफ अली खानच्या खानदानी ‘पतौडी’ राजवाड्याची झलक दाखवणारा खास व्हिडिओ व्हायरल; अभिनेता म्हणाला…
२३ नोव्हेंबर १९८९ रोजी पश्चिम बंगालमधील राणीगंज येथील कोळसा खाणीत २२० खाण कामगार काम करत होते. त्यादरम्यान पश्चिम बंगालमध्ये जोरदार पूर आला होता आणि चुकून कोणीतरी खाणीच्या वरच्या सांध्याला स्पर्श केला आणि खाणीत पाणी आत शिरले. बरेच कामगार लिफ्टच्या सहाय्याने बाहेर पडण्यात यशस्वी ठरले. परंतु शाफ्ट पाण्याने भरल्यामुळे ७१ खाण कामगार अडकले. या घटनेत सहा जणांचा बुडून मृत्यू झाला असून ६५ कामगार अडकले होते ज्यांना वाचवण्याचं कार्य जसवंत सिंग गगिल यांनी केलं.
जसवंत सिंग गिल यांना १९९१ मध्ये भारताचे तत्कालीन राष्ट्रपती रामास्वामी वेंकटरामन यांनी त्यांना सर्वोत्तम जीवन रक्षा पदक देऊन सन्मानित केले. पंजाबमधील मजिठा रोडवरील एका चौकालाही त्यांचे नाव देण्यात आले आहे. २६ नोव्हेंबर २०१९ रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या आयुष्यावर बेतलेल्या या बायोपिकसाठी सगळेच उत्सुक आहेत. त्या कामगारांना वाचवण्यासाठी त्यांनी नेमकी कोणती शक्कल लढवली आणि त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल अधिक या चित्रपटाच्या माध्यमातून समोर येईल.
पडद्यावर अशी आदरणीय भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याने भारावून गेलेल्या अक्षय कुमारने ट्वीट करत आपला आनंद व्यक्त करत म्हणाला, “या कथेसारखी दुसरी कथा नाही!”. या चित्रपटाचे दिग्दर्शन टिन्नू सुरेश देसाई करणार असून, यांनी यापूर्वी अक्षय कुमारबरोबर राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट ‘रुस्तम’मध्ये काम केले आहे.