गर्भधारणा ही बाब एका महिलेसाठी कायमच आनंददायी असते. एका महिलेसाठी आई होण्याची भावना सुखावणारी असते. मात्र, आई होणे हे जेवढे हवेहवेसे वाटते तेवढेच आव्हानात्मक आणि त्रासदायकही असते. सध्या तर संपूर्ण जगाला आश्चर्यात पाडणारा एक प्रकार समोर आला आहे. अलाबामा येथील एका महिलेच्या दोन गर्भाशयात दोन बाळं आहेत. त्यामुळे जन्माला येणाऱ्या या बाळांना जुळी मुलं म्हणावं की आणखी काही? असा प्रश्न डॉक्टरांना पडला आहे. त्यामुळे या महिलेसोबत घडलेला हा प्रकार नेमका काय आहे? डॉक्टरांचे नेमके म्हणणे काय? हे जाणून घेऊ या….

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेमकं प्रकरण काय?

अमेरिकेतील अलाबामा या राज्यात हॅचर नावाची महिला गर्भवती राहिली असून या महिलेच्या पोटात दोन गर्भ आहेत. विशेष म्हणजे हे दोन्ही गर्भ वेगवेगळ्या गर्भाशयात आहेत. या दोन्ही बाळांना अन्न पुरवण्यासाठी दोन वेगवेगळे प्लॅसेन्टा (नाळ) आहेत. त्यामुळे या महिलेच्या पोटात असलेल्या बाळांना जुळे म्हणावे की काय? असा प्रश्न डॉक्टरांना पडला आहे. हॅचर सध्या ३४ आठवड्यांच्या गरोदर आहेत. डॉक्टरांनी सांगितल्यानुसार २५ डिसेंबर म्हणजेच ख्रिसमसच्या दिवशी त्या प्रसूत होणार आहेत.

पोटात दोन गर्भ असल्याचे कसे समजले?

हॅचर यांनी या आगळ्यावेगळ्या गर्भधारणेबाबत माहिती दिली आहे. त्यांनी “ही बाब समजली तेव्हा मला आश्चर्य वाटले. मी माझ्या पतीला याबाबत सांगितले. माझ्या पतीलादेखील यावर विश्वास बसला नव्हता. माझ्या पोटात दोन अर्भकं दोन वेगवेगळ्या गर्भाशयात आहेत, हे समजल्यावर याआधी एखाद्या महिलेची माझ्याप्रमाणेच स्थिती राहिलेली आहे का? हे शोधण्याचा मी प्रयत्न केला. मला त्यांचा अनुभव जाणून घ्यायचा होता. मात्र, संपूर्ण जगात माझ्याप्रमाणे फक्त दोन महिलांचीच प्रसूती झाल्याचे मला समजले. या दोन्ही महिलांशी माझा संपर्क होऊ शकला नाही”, असे हॅचर यांनी सांगितले.

हॅचर यांना तीन मुलं

हॅचर यांना दोन गर्भाशये आहेत. वयाच्या १७ व्या वर्षी त्यांना ही बाब समजली. हॅचर यांना याआधी तीन वेळा गर्भधारणा झालेली असून त्यांना तीन मुले आहेत. या तिन्ही वेळा एखाद्या सामान्य महिलेप्रमाणेच त्यांना गर्भधारणा झालेली होती. यावेळी मात्र त्यांच्या पोटात दोन अर्भकं असून ती दोन्ही वेगवेगळ्या गर्भाशयात आहेत. त्यांची दोन मुलं प्रत्येकी सात, चार वर्षांची असून तिसरे मूल २३ महिन्यांचे आहे.

सोनोग्राफी केल्यानंतर पोटात दोन बाळं असल्याचे समजले.

चौथ्यांदा गरोदर राहिल्यानंतर हॅचर यांनी आठव्या आठवड्यात सोनोग्राफी केली, यावेळी त्यांच्या पोटात दोन अर्भकं असल्याचे डॉक्टरांना समजले. “माझ्या पोटात एकच बाळ आहे, असे अगोदर नर्स आणि मला वाटले होते. मात्र, काही काळानंतर नर्स आणि माझ्यादेखील निदर्शनास आले की, माझ्या पोटात दोन बाळं आहेत. हे पाहून मी हसत होते”, असे हॅचर यांनी सांगितले. हॅचर यांच्या दोन गर्भाशयांत दोन अर्भकं पाहून डॉ. श्वेता पटेल यांनादेखील सुरुवातीला आश्चर्य वाटले. “ही फार दुर्मीळ बाब आहे. जगात असे काही प्रसूतीतज्ज्ञ असतात, ज्यांनी आपल्या पूर्ण कारकिर्दीत अशी अपवादात्मक स्थिती पाहिलेली नसते”, असे पटेल म्हणाल्या.

हॅचर यांची प्रसूती धोकादायक?

दरम्यान, हॅचर यांची प्रसूती त्यांच्या प्रकृतीसाठी धोकादायक ठरू शकते, असे म्हटले जात आहे. या जगात एका टक्क्यांपेक्षाही कमी महिलांना दोन गर्भाशय असतात. याबाबत बर्मिंगहॅम येथील अलाबामा विद्यापीठातील गर्भधारणाविषयक तज्ज्ञ डॉ. रिचर्ड डेव्हिस यांनी प्रतिक्रिया दिली. “एका महिलेत दोन गर्भाशय किंवा दोन योनीमार्ग असणे ही फार दुर्मीळ बाब आहे. हे प्रमाण अगदी एक टक्के आहे. या दोन्ही गर्भाशयांत दोन वेगवेगळे गर्भ असणे ही फार दुर्मीळ बाब आहे”, असे डॉ. रिचर्ड डेव्हिस म्हणाले.

हॅचर यांच्याकडे विशेष लक्ष द्यावे लागणार

हॅचर यांची प्रसूती धोकादायक ठरू शकते. याच कारणामुळे त्यांच्या प्रसूतीदरम्यान तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध असेल. सध्यातरी हॅचर यांच्या गर्भाशयातील दोन्ही अर्भकं उत्तम स्थितीत आहेत. मात्र, अशा प्रकारच्या प्रसूतींमधील धोका लक्षात घेता तज्ज्ञ डॉक्टरांची टीम अपलब्ध असेल. हॅचर यांच्या प्रसूतीबद्दल बोलताना “हॅचर यांना जेव्हा प्रसववेदना होतील, तेव्हा प्रत्येक गर्भाशयाकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. कोणत्या गर्भाशयाचे अगोदर आकुंचन-प्रसरण होत आहे, ते पाहावे लागेल. प्रसूतीदरम्यान दोन्ही गर्भाशयांची स्थिती वेगवेगळी आहे की सारखीच, यावर लक्ष ठेवावे लागेल”, असेही डॉ. डॅव्हिस यांनी सांगितले.

गर्भाशय वेगळे, नाळही वेगवेगळे

हॅचर यांच्या प्रसूतीसाठी काही तास, दिवस किंवा काही आठवडे लागू शकतात. कारण दोन्ही गर्भाशय वेगवेगळ्या वेळेला आकुंचन-प्रसरण पावू शकतात, असे काही डॉक्टरांना वाटते. हॅचर यांच्या पोटातील दोन्ही बाळं दोन वेगवेगळ्या गर्भाशयात असल्यामुळे तसेच या दोन्ही बाळांना अन्न पुरविणारी नाळही (प्लॅसेन्टा) वेगवेगळी असल्यामुळे या मुलांना जुळी मुले म्हणावे की अन्य काही? असा प्रश्न डॉक्टरांना पडला आहे. “हॅचर यांची गर्भधारणा ही दुर्मीळ बाब आहे. सध्यातरी त्यांच्या पोटातील बाळांना जुळी मुले म्हणत आहोत. यापेक्षा अधिक चांगली संज्ञा आम्हाला सध्यातरी सापडलेली नाही”, असे डॉ. पटेल म्हणाल्या.

“ही माझी शेवटची गर्भधारणा”

दुसरीकडे हॅचर यांना पोटात दोन बाळं असल्यामुळे आनंद झाला आहे. यापुढे आम्ही मूल जन्माला घालणार नाही, असे हॅचर यांच्यासह त्यांच्या पतीचे मत आहे. “आम्हाला आता मूल नको होते, तीन आपत्य आमच्यासाठी पुरेसे होते. मात्र, सध्या मी गरोदर राहिले असून त्याचा मला आनंद आहे. मात्र, माझी ही शेवटची गर्भधारणा असेल”, असे हॅचर यांनी सांगितले.

दोन गर्भाशय म्हणजे काय?

मायो क्लिनिकने दिलेल्या माहितीनुसार काही महिलांमध्ये जन्मतच दोन गर्भाशये असतात. अर्भकाचा विकास होताना गर्भाशयासाठी दोन नळ्या (ट्यूब्स) सामान्यत: एकत्र येतात. कधीकधी या दोन नळ्या पूर्णपणे एकत्र येत नाहीत. या दोन्ही नळ्या नंतर वेगळे अवयव म्हणून विकसित होतात. कधीकधी दोन्ही गर्भाशयांचा एकच योनीमार्ग (सर्व्हिक्स) असू शकतो. कधीकधी दोन्ही गर्भाशयांना दोन वेगवेगळे योनीमार्ग असतात”, असे मायो क्लिनिकने सांगितले.