पाऊस हा भारतीयांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. या देशातील राजा असो वा रंक प्रत्येकालाच या ऋतूचे आकर्षण आहे. भारतीय लेखक, कवी, कलाकार यांच्या कलाकृतीतून नेहमीच वर्षा ऋतूचे व त्यानिमित्ताने सृष्टीला लाभणाऱ्या निसर्ग सौंदर्याचे वर्णन केले जाते. पाऊस हा कधी प्रियतमेचा सखा असतो तर कधी प्रेमिकांमधील प्रेमदूत असतो. या मनमोहक पावसाने कितीही अक्राळ- विक्राळ रूप धारण केले तरी भारतीयांना त्याच्याविषयीच्या वाटणाऱ्या आसक्तीत उणेपणा आलेला नाही. भारतातील वर्षा ऋतू आशा आणि आनंदाच्या भावनांशी जोडला गेला आहे. इतर जगात कोठेही न आढळणाऱ्या पावसाच्या धारणा भारतीय भारतीय संस्कृतीत आढळतात. भारत हा उष्ण कटिबंधीय देश असल्याने उन्हाच्या झळा सोसून गारवा देणाऱ्या पावसाचा डौल येथे निराळाच आहे.
परंतु गेल्या काही वर्षांपासून पाऊस आपले रौद्र रूप दाखवत आहे; अतिवृष्टीने स्वतःचाच एक वेगळा इतिहास रचला आहे. भारतीयांसाठी पावसाचे हे रूप नवीन नसले तरी आज त्या पावसाच्या कोसळण्यावर नाराजी व्यक्त केली जात आहे. भारतीय पाऊस हा असाच विराट रूप धारण करत होता, याचे अनेक दाखले इतिहासात आहेत. किंबहुना तत्कालीन विदेशी प्रवाशांनी भारताला दिलेल्या भेटीत पावसाचे भरभरून वर्णन केलेले आहे. म्हणूनच सध्या होणाऱ्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विदेशी प्रवाशांना भारतीय पावसाचे रूप मोहक वाटले की रौद्र हे जाणून घेणे रंजक ठरावे.
आणखी वाचा : विश्लेषण : भारतात आयात होत होता… अमेरिकन बर्फ! का, कशासाठी?
अलेक्झांडरलाही घ्यावी लागली माघार
इतिहासात भारतातील वादळी पावसाचे वर्णन करणाऱ्या अनेक घटना आहेत. त्यातील सर्वात प्रसिद्ध आणि मुख्य घटना म्हणजे अलेक्झांडर दी ग्रेट व त्याच्या सैन्याला भारतात आल्यावर याच अतिपावसाच्या माऱ्यामुळे माघार घ्यावी लागली होती. किंबहुना कौटिल्याने भारतात होणाऱ्या अतिवृष्टीच्या संदर्भात विविध भागातील पावसाचे मोजमाप दिले आहे. कौटिल्याच्या संदर्भानुसार पश्चिम भारत हा अतिपावसाचा प्रदेश होता. किंबहुना पश्चिम भारत, म्हणजेच महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, गुजरात या भागात होणाऱ्या अतिवृष्टीचे वर्णन आपल्याला बौद्ध साहित्यातही आढळते. म्हणूनच तत्कालीन व्यापारी व बौद्ध भिक्खूंनी या पावसापासून बचावासाठी दगडात कोरलेल्या लेणींचा आसरा घेतला होता. भारतीय पावसाचे रुद्र रूप दर्शविणारे अनेक प्राचीन संदर्भ असले तरी मध्ययुगीन काळात ज्या युरोपियन प्रवाशांनी भारताला भेट दिली, त्यांनी केलेले पावसाचे वर्णन रोचक आहे. यात मुख्यत्त्वे जेम्स टॉड, जीन बॅप्टिस्ट टॅव्हर्नियर, फ्रान्सिस्को बर्निअर, अलेक्झांडर फ्रेटर या प्रवाशांचे संदर्भ महत्त्वाचे ठरतात.
जेम्स टॉड आणि पावसाची भीषणता
जेम्स टॉप हे ब्रिटिश विद्वान म्हणून प्रसिद्ध होते. १९ व्या शतकाच्या पूर्वार्धात ब्रिटिश इंडिया कंपनीचे अधिकारी या नात्याने त्यांनी भारतभर प्रवास केला होता. इतकेच नव्हे तर या काळात त्यांनी भारतीय इतिहास व भूगोल यांच्या नोंदीचे महत्त्वपूर्ण कार्य केले. त्यांनी पश्चिम भारतात प्रवास केला, त्यावेळी या प्रवाचे वर्णन करणारे एक पुस्तक ‘ट्रॅव्हल्स इन वेस्टर्न इंडिया’ या नावाने लिहिले. या पुस्तकाच्या १२ व्या प्रकरणात त्यांनी जैन व हिंदू पवित्र स्थळांना दिलेल्या भेटीचे वर्णन केले आहे. तसेच अहमदाबाद शहरात असताना भारतीय मान्सूनच्या अनुभवाविषयी त्यांनी रीतसर वर्णन केलेले आहे. प्रारंभीच्या वर्णनात पावसाळा व त्याविषयीचा आनंद याविषयी ते वर्णन करतात. परंतु, उर्वरित प्रकरणांमध्ये टॉड पावसाळ्यात प्रवास करताना येणाऱ्या आव्हानांवर भाष्य करतात. पावसाळ्यात घोड्यावरून प्रवास करणे कसे कठीण आहे, रसदीचा तुटवडा कशा प्रकारे पडतो, पावसाळ्यातील वादळाची भीषणता यांसारख्या समस्यांवर ते भाष्य करतात. किंबहुना पावसाच्या भीषणतेचे वर्णन करताना ते लिहितात, या काळात आदल्या संध्याकाळी बांधलेला बांध तुटून जातो; तर तुमच्या बेड खाली पाण्याचे लहान प्रवाह अचानक वाहू लागतात… एकूणच टॉड यांच्यासाठी भारतीय, खास करून पश्चिम भारतातील पाऊस नक्कीच मनमोहक नव्हता !
आणखी वाचा : विश्लेषण : गद्दार कोण? मानसिंग ते जयचंद भारतीय गद्दारांचा सापेक्ष इतिहास !
जीन बॅप्टिस्ट टॅव्हर्नियर
जीन टॅव्हर्नियर हा फ्रेंच व्यापारी व प्रवासी होता, याने पूर्वेकडे अनेकवेळा प्रवास केला त्यात भारताची समावेश होता. त्याने लिहिलेल्या ‘द ट्रॅव्हल्स इन इंडिया’ या पुस्तकात भारतातील पावसाचा अनेक वेळा उल्लेख केला आहे. या काळात प्रवास करताना कोणत्या प्रकारची खबरदारी घ्यावी याविषयी तो सविस्तर नमूद करतो. तो म्हणतो, भारतातील पाऊस हा भयावह आहे. तो तुफान पडतो आणि पुरासारखा वाहातो. त्यामुळे वर्षाचे सगळे महिने युरोपाप्रमाणे समुद्रातून प्रवास करणे शक्य नाही. किंबहुना भारतात नोव्हेंबरपासून ते मार्च या काळात समुद्र प्रवास केला जातो. होर्मूझ वरून सुरतला जायचे असल्यास याच काळात प्रवास करावा लागतो. भारतातील तुफान बरसणाऱ्या पावसात दोन ते तीन तासातच लहान तळी ओसंडून वाहू लागतात. टॅव्हर्नियर याने लाहोर- दिल्लीचा उल्लेख केला आहे. त्याने नमूद केल्याप्रमाणे या पावसाच्या माऱ्याने उंच घरांनाही तडे जातात, इतके या पावसाचे रूप रौद्र असते.
फ्रँकोइस बर्नियर- फ्रेंच वैद्य आणि प्रवासी
१७ व्या शतकात सम्राट शाहजहानच्या कारकिर्दीत फ्रेंच वैद्य आणि प्रवासी, बर्नियर याने मुघल दरबाराला भेट दिली होती. “ट्रॅव्हल्स इन द मुघल एम्पायर एडी १६५६- १६६८” या त्याच्या पुस्तकात मुघलकालीन सामाजिक-राजकीय परिस्थितीचे तो तपशीलवार वर्णन करतो, ज्यात शाहजहानच्या मृत्यूनंतर झालेल्या उत्तराधिकाराच्या स्पर्धेचाही समावेश आहे. राजकीय घटनांव्यतिरिक्त, बर्नियरने तत्कालीन भारतीय भौगोलिक तसेच वातावरणीय स्थितीविषयी लिहिले आहे. त्याने नमूद केल्या प्रमाणे पाऊस तीन महिने मुसळधार असतो.
अलेक्झांडर फ्रेटर
अलेक्झांडर फ्रेटर याने १९९० साली लिहिलेल्या “चेजिंग द मान्सून : अ मॉडर्न पिलग्रिमेज थ्रू इंडिया ” या पुस्तकात आपल्या वडिलांच्या व त्याच्या लहानपणीच्या स्मृतीतील भारतीय पावसाचे वर्णन त्याने केले आहे. फ्रेटरसाठी, भारतातील मान्सून ही एक आदर्श रोमँटिक घटना आहे, त्याच्या मतानुसार हा एक गरीब देश असला तरी पाऊस ही या देशाच्या आकर्षणाची किल्ली आहे.