बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्टने तिला अटेन्शन डेफिसिट डिसऑर्डर (एडीडी) असल्याचे उघड केले आहे. ॲल्युअर मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत तिने सांगितले की, ती मेकअपच्या खुर्चीवर ४५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ घालवू शकत नाही. “खूप लवकर गोष्टी करायला मला आवडतात. मला एडीडी आहे आणि त्यामुळे मला कामात जास्त वेळ गुंतू नये, असे वाटते. जे काही घडतंय ते लवकरात लवकर संपावं असं मला वाटतं, असे तिने पुढे सांगितले. जिगरा या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनकरिता आली असता, तिने ही मुलाखत दिली. ती म्हणाली, २०२२ मध्ये तिचे लग्न अभिनेता रणबीर कपूरबरोबर झाले, तेव्हाही तिने दोन तास मेकअप खुर्चीवर बसण्यास नकार दिला होता. “माझ्या लग्नाच्या दिवशी माझा मेकअप आर्टिस्ट पुनीत सैनी होता. त्याने मला मेकअपकरिता दोन तास मागितले, मात्र मी नकार दिला,” असे आलिया म्हणाली. आलिया भट्टला असणारा एडीएचडी आजार काय आहे? हा आजार किती सामान्य आहे? त्याविषयी जाणून घेऊ.

अटेंशन डेफिसिट हायपर एक्टिव्हिटी डिसऑर्डरची चर्चा

अटेंशन डेफिसिट हायपर एक्टिव्हिटी डिसऑर्डर (एडीएचडी) हा एक न्यूरोडेव्हलपमेंटल डिसऑर्डर आहे. जे या आजाराने ग्रासलेले असतात त्यांच्यामध्ये अतिक्रियाशीलता आणि आवेगपूर्ण वागणूक अशा अनेक प्रकारच्या समस्या दिसून येतात. एडीएचडी असलेले लोक एखाद्या विशिष्ट कार्यावर लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. हेल्थलाइनच्या लेखानुसार, ज्यांना एडीएचडी आहे, त्यांना त्यांच्या समकक्षांपेक्षा एखाद्या विशिष्ट गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी प्रचंड त्रास होतो आणि ऊर्जा पातळीतही बदल जाणवतो. ‘एडीएचडी’च्या सामान्य लक्षणांमध्ये लक्ष केंद्रित करण्यात अडचण येणे, विसरणे, सहज विचलित होणे, लोक बोलत असताना मध्येच त्यांना अडवणे आणि एकाठिकाणी शांत बसू न शकणे यांसारखी लक्षणे दिसून येतात. सामान्यत: लहान मुलांमध्ये ही समस्या दिसून येते. एडीएचडीचे तीन प्रकार असतात, लक्ष न लागणे, अतिक्रियाशीलता आणि दोन्ही लक्षणं.

अभिनेता रणबीर कपूरबरोबर लग्न झाले असताना तिने याच आजारामुळे मेकअपकरिता जास्त वेळ बसण्यास नकार दिला होता. (छायाचित्र-लोकसत्ता संग्रहीत)

हेही वाचा : पॅरासिटामॉलसह नेहमीच्या वापरातील ५० हून अधिक औषधं गुणवत्ता चाचणीत नापास; कारण काय? औषधांची गुणवत्ता कशी तपासतात?

एडीडी म्हणजे काय?

अटेन्शन डेफिसिट डिसऑर्डर (एडीडी) हा शब्द एडीएचडी या प्रकाराचे वर्णन करण्यासाठी वापरला जातो. ज्यांना लक्ष केंद्रित करण्यास त्रास होतो, परंतु ते अतिक्रियाशील नाहीत, अशांसाठी एडीडी या शब्दाचा वापर पूर्वी केला जायचा. मात्र, आता एडीडीला इनअटेंण्टिव्ह एडीएचडी म्हणून ओळखले जाते. इनअटेंण्टिव्ह एडीएचडी असणार्‍यांना लक्ष केंद्रित करण्यात, कामे पूर्ण करण्यात आणि सूचनांचे पालन करण्यात अडचण येते. हेल्थलाइनने दिलेल्या अहवालानुसार तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, दुर्लक्ष होत असलेल्या अनेक मुलांना हा आजार असल्याचे निदान होत नाही, कारण शाळेमध्ये ही मुलं नीट वागतात.

इनअटेंण्टिव्ह एडीएचडीची लक्षणे

इनअटेंण्टिव्ह एडीएचडी हा आजार ज्यांना असतो, त्यांना एखाद्याने दिलेली सूचना पाळण्यास, विशिष्ट गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यास अडचणी येतात. ही लोक साधी कामे विसरतात, वैयक्तिक वस्तू हरवतात आणि त्यांचं एखाद्या गोष्टीत लक्षही फार कमी लागते. लोकांच्या वयाप्रमाणे या आजाराची लक्षणे बदलतात.

एडीएचडीचे इतर प्रकार

जे लोक अतिक्रियाशील असतात ते इतर लोक बोलत असताना त्यांच्यात व्यत्यय आणतात आणि फार वेळ शांत बसू शकत नाहीत. या अतिक्रियाशीलतेमुळे अपघात होऊ शकतो किंवा दुखापतही होऊ शकते. युनायटेड स्टेट्स सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) नुसार, लहान मुले सतत उड्या मारू शकतात किंवा सतत धावू शकतात. एडीएचडीचा एकत्रित प्रकार असणाऱ्या लोकांमध्ये अविवेकी आणि अतिक्रियाशील अशी दोन्ही लक्षणे दिसतात. एडीएचडी असलेले मूल एखादी गोष्ट लगेच विसरते, बोलके असते आणि त्याला शांत बसण्यास त्रास होतो. “प्रौढांमध्ये, सामान्यत: अतिक्रियाशीलता फार कमी दिसून येते,” असे मिनेसोटा मेडिकल स्कूल युनिव्हर्सिटीच्या मानसोपचारतज्ज्ञ डॉ. लिडिया झाइलोस्का यांनी न्यूयॉर्क टाइम्सला सांगितले. आजार असलेल्या प्रौढांमध्ये एकाग्रतेचा अभाव असतो. मनोचिकित्सा, टॉक थेरपी, औषधोपचार किंवा दोन्हींद्वारे एडीएचडीचा उपचार केला जातो.

हेही वाचा : परम रुद्र सुपर कॉम्प्युटर्स काय आहेत? भारताने विकसित केलेले हे संगणक का आहेत खास?

एडीएचडी आजार किती सामान्य?

एडीएचडी हा एक सामान्य मानसिक आजार आहे. वर्ल्ड फेडरेशन ऑफ एडीएचडीच्या मते, सुमारे सहा टक्के मुले आणि २.५ टक्के प्रौढ या स्थितीत असल्याचे मानले जाते. पूर्वी, तज्ज्ञांना वाटत होते की, एडीएचडी हा आजार मुलांमध्ये होतो आणि पौगंडावस्थेनंतर संपतो. परंतु, १९९० च्या दशकातील अनेक अभ्यासांतून असे दिसून आले आहे की, ते तारुण्यापर्यंत चालू राहते. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, एडीएचडी असलेल्या किमान ६० टक्के मुलांमध्ये प्रौढांप्रमाणेच लक्षणे दिसून येतील.