बुधवारी हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये ‘पुष्पा २ : द रुल’च्या स्क्रीनिंगदरम्यान चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला आणि तिचे मूल गंभीर जखमी झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. प्रीमियर शोसाठी ‘पुष्पा २’ स्टार थिएटरमध्ये आल्यानंतर हा गोंधळ उडाला. आता हैदराबाद पोलिसांनी अभिनेता अल्लू अर्जुन आणि त्याच्या सुरक्षा पथकावर गुन्हा दाखल केला आहे. अल्लू अर्जुनची एक झलक पाहण्यासाठी कार्यक्रमस्थळाबाहेर मोठ्या प्रमाणात चाहते जमल्याने ही चेंगराचेंगरी झाली. त्या दिवशी नक्की काय घडले? अभिनेता अल्लू अर्जुनवर गुन्हा दाखल करण्याचे कारण काय? त्याविषयी जाणून घेऊ.
अल्लू अर्जुनवर काय आरोप?
मृत महिलेच्या कुटुंबीयांनी चिक्कडपल्ली पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केल्यानंतर चेंगराचेंगरीच्या या दुर्घटनेप्रकरणी अल्लू अर्जुनविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता (BNS) कायद्याच्या कलम १०५ आणि ११८(१) ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. मध्यवर्ती विभागाचे पोलीस उपायुक्त अक्षांश यादव यांनी एका निवेदनात म्हटले आहे, “थिएटर व्यवस्थापनाने गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी सुरक्षेसंदर्भात कोणतीही अतिरिक्त तरतूद केली नव्हती. थिएटर व्यवस्थापनाला कलाकारांच्या आगमनाची माहिती असूनही त्यांच्या टीमसाठी वेगळा प्रवेश किंवा बाहेर पडण्याची व्यवस्था नव्हती.” पोलिसांच्या म्हणण्यानुसार, अल्लू अर्जुन थिएटरमध्ये आल्यानंतर परिस्थिती आणखीनच बिघडली. अनेक जण त्याच्यामागे जाण्याचा प्रयत्न करू लागले; ज्यामुळे गोंधळ झाला. “त्याच्या वैयक्तिक सुरक्षा पथकाने लोकांना ढकलण्यास सुरुवात केली; ज्यामुळे परिस्थिती आणखी बिघडली. कारण- थिएटरमध्ये आधीच मोठा जमाव होता,” असे निवेदनात म्हटले आहे.
हेही वाचा : नवजात बालके ‘वेअरवॉल्फ सिंड्रोम’ने ग्रस्त; काय आहे हा दुर्मीळ आजार?
पोलीस उपायुक्त यादव म्हणाले की, अभिनेत्याच्या सुरक्षा पथकातील सदस्यांची ओळख पटवण्यावर तपास केंद्रित असेल. ते पुढे म्हणाले की, आदल्या दिवशी सुरक्षा दलात कोण उपस्थित होते आणि लोकांना कोणी धक्का दिला; ज्यामुळे ही परिस्थिती उद्भवली हे जाणून घेण्याचा प्रयत्न तपासात केला जाईल. “आम्ही त्या ठिकाणी उपस्थित होतो आणि पोलिसांच्या बाजूने कोणतीही चूक झालेली नाही. यासंबंधीचा तपास सुरू आहे,” असे ते म्हणाले. हैदराबादचे पोलिस आयुक्त सी. व्ही. आनंद यांनी एका निवेदनात म्हटले आहे, “चित्रपटगृहाच्या आत गोंधळलेल्या परिस्थितीसाठी जबाबदार असलेल्या सर्व व्यक्तींवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल,” असे वृत्त ‘एनडीटीव्ही’ने दिले आहे.
चेंगराचेंगरी कशामुळे झाली?
या घटनेत जीव गमावलेली महिला रेवती, पती भास्कर आणि त्यांची दोन मुले, असे चौघे चित्रपटाच्या प्रीमियरकरिता गेले होते. हे कुटुंब चित्रपटगृहामधून बाहेर पडत असताना चेंगराचेंगरी झाली. एक लाखाहून अधिक चाहते कार्यक्रमस्थळी जमल्याने गोंधळ उडाला. अल्लू अर्जुनच्या सुरक्षा पथकाने कथितरीत्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी आक्रमक भूमिका घेतल्याने तणाव वाढला; ज्यामुळे लोक खाली पडले आणि चेंगराचेंगरी झाली. पुढे अभिनेत्याच्या पथकाने गर्दीच्या व्यवस्थापनाचे प्रस्थापित प्रोटोकॉल्स तोडून गर्दीने खचाखच भरलेल्या भागातून प्रवेश केला, असे ‘न्यूज १८’च्या वृत्तात म्हटले आहे. पोलिसांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “यामध्ये रेवती नावाची महिला आणि तिच्या मुलाला गुदमरल्यासारखे झाले. पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना गर्दीमधून बाहेर काढले.
मुलाला सीपीआर देण्यात आला आणि त्यांना तातडीने जवळच्या दुर्गाबाई देशमुख रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान त्यांच्यातील रेवती या महिलेचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आणि मुलाला चांगल्या उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला देण्यात आला. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, अल्लू अर्जुनच्या आगमनाची बातमी पसरल्यानंतर गोंधळ उडाला. चाहत्यांनी अभिनेत्याजवळ जाण्यासाठी गर्दी केल्याने मोठा जमाव जमला आणि त्यामुळे गोंधळ उडाला. आधीच घटनास्थळी असलेल्या पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला. मात्र, परिस्थिती चिघळली आणि रेवती व तिचा मुलगा या गोंधळात खाली पडले. विशेष म्हणजे अधिकाऱ्यांनी परिसर ‘सील’ केला, चित्रपटगृहाच्या गेटला कुलूप लावले आणि गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिक कुमक बोलावण्यात आली. अल्लू अर्जुन काही वेळातच घटनास्थळावरून बाहेर पडताना दिसला.
मृत महिलेच्या पतीची प्रतिक्रिया
मीडियाशी बोलताना मृत रेवतीचे पती भास्कर यांनी सांगितले की, डॉक्टरांनी त्यांच्या मुलाच्या प्रकृतीचे मूल्यांकन करण्यासाठी ४८ तास प्रतीक्षा करण्याचा सल्ला दिला आहे. गोंधळाच्या परिस्थितीचे वर्णन करताना भास्कर म्हणाले की, चित्रपटगृहात चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली. गर्दीत त्यांची पत्नी आणि मुलगा पुढे ढकलला गेला, तर ते त्यांच्या मुलीबरोबर मागे राहिले.
पत्नी व मुलाला शोधण्यात त्यांना अपयश आले आणि त्यामुळे त्यांनी मुलीला जवळच्या नातेवाइकाच्या घरी सोडले. मग ते शोध घेण्यासाठी ते पुन्हा चित्रपटगृहात परतले, असे भास्कर म्हणाले. त्यांना नंतर त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाल्याचे आणि मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे कळले. भास्कर यांच्यावर वर्षभरापूर्वी यकृत प्रत्यारोपण करण्यात आले. त्याबाबत भास्कर भावूकपणे म्हणाले, “माझ्या आयुष्यासाठी मी माझ्या पत्नीचा ऋणी आहे. तिने मला धैर्य आणि आधार दिला.”
हेही वाचा : सुखबीर बादल यांना सुवर्ण मंदिरात शौचालय आणि भांडी साफ करण्याचे आदेश; कारण काय?
‘पुष्पा २ : द रुल’ची निर्मिती करणारी कंपनी ‘Mythri Movie Makers’ने या दुर्घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. एका निवेदनात कंपनीने, “काल रात्रीच्या स्क्रीनिंगदरम्यान झालेल्या दुःखद घटनेमुळे आम्ही अत्यंत दुःखी झालो आहोत. आमचे विचार आणि प्रार्थना हा वाईट प्रसंग ओढवलेल्या कुटुंबासोबत आणि वैद्यकीय उपचार घेत असलेल्या लहान मुलाबरोबर आहेत. आम्ही या कठीण काळात त्यांच्या पाठीशी उभे राहण्यास आणि शक्य ते सर्व सहकार्य देण्यास वचनबद्ध आहोत,” असे म्हटले आहे.