भारताच्या चांद्रयान-३ मोहिमेकडे संपूर्ण जगाचे लक्ष आहे. नुकतेच चांद्रयान-३ मोहिमेतील लँडर मॉड्युल मुख्य अंतराळयानापासून (प्रोपल्शन मॉड्युल) वेगळे झाले आहे. आता लँडर मॉड्युलचा चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यासाठीचा प्रवास सुरू झाला आहे. नियोजित तारखेनुसार येत्या २३ ऑगस्ट रोजी लँडर चंद्रावर उतरणार आहे. दरम्यान, भारताच्या चांद्रयान-३ मोहिमेसोबतच आता रशियाच्या लुना-२५ या अंतराळयानाचीही तेवढीच चर्चा होत आहे. हे यानदेखील याच महिन्यात चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. ही दोन्ही याने सध्या चंद्राच्या कक्षेत फिरत आहेत. याच पार्श्वभूमीवर या दोन्ही यानांमध्ये काय फरक आहे? लँडरला २३ ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरता न आल्यास, पुढच्या एका महिन्यासाठी चंद्राच्या कक्षेत का फिरत राहावे लागणार आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ या ….

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दोन दिवसांच्या फरकाने उतरणार दोन याने

रशियाचे लुना-२५ आणि भारताचे चांद्रयान-३ ही दोन्ही याने सध्या चंद्राच्या कक्षेत फिरत आहेत. विशेष म्हणजे अवघ्या दोन दिवसांच्या फरकाने ही दोन्ही याने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरच उतरणार आहेत. लुना-२५ हे २१ ऑगस्ट; तर भारताचे चांद्रयान-३ हे २३ ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ आतापर्यंत एकही अंतराळयान उतरू शकलेले नाही. मात्र, लुना-२५ आणि चांद्रायान-३ ही दोन्ही याने याच दक्षिण ध्रुवावर उतरण्याचा प्रयत्न करतील.

चीनचा दोन वेळा चंद्रावर उतरण्याचा पराक्रम

तत्कालीन सोविएत युनियन १९७६ साली लुना-२४ हे अंतराळ यान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवण्यात यशस्वी ठरले होते. त्यानंतर फक्त चीन देश ही कामगिरी करू शकलेला आहे. चँगई-३ व चँगई-४ अशी दोन याने चीनने अनुक्रमे २०१३ व २०१४ या साली चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवली होती. त्यानंतर आता भारत आणि रशिया चांद्रयान-३ आणि लुना-२५ या मोहिमांच्या माध्यमातून चंद्रावर उतरण्याचा प्रयत्न करीत आहेत.

रशियाचे लुना-२५ यान अत्यंत शक्तिशाली

रशियाचे लुना-२५ हे यान अत्यंत शक्तिशाली प्रक्षेपकावर स्वार होऊन चंद्राकडे मार्गक्रमण करीत होते. याच कारणामुळे १० ऑगस्ट रोजी प्रक्षेपण झाल्यानंतर फक्त सहा दिवसांत हे यान थेट चंद्राच्या कक्षेत प्रवेश करते झाले. तर, दुसरीकडे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेकडे (इस्रो) रशियाप्रमाणे अद्याप शक्तिशाली रॉकेट नसल्याने चांद्रयान-३ हे १४ जुलै रोजी प्रक्षेपित झाल्यानंतर २३ दिवस प्रवास करून चंद्राच्या कक्षेत पोहोचले होते. आपली ऊर्जा आणि पैसे वाचवण्यासाठी चांद्रयान-३ ने गोल गोल फेऱ्या मारून चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला.

चंद्रावर उतरण्यासाठी २३ ऑगस्ट हाच दिवस का निवडला?

रशियाचे लुना-२५ हे यान भारताच्या चांद्रयान-३ यानाच्या तुलनेत चंद्राच्या पृष्ठभागावर अगोदर उतरणार असले तरी त्याचा विशेष फायदा होणार नाही. कारण- चंद्रावरील दिवस आणि रात्र यांचा ताळमेळ लावूनच चंद्राच्या पृष्ठभागावर कधी उतरावे हे ठरवावे लागते. हा ताळमेळ लावण्याची काही विशेष कारणे आहेत. भारताचे चांद्रायान-३ हे २३ ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. याच दिवशी चंद्रावर दिवसाला सुरुवात होते. चंद्रावरील एक दिवस हा पृथ्वीच्या १४ दिवसांच्या बरोबर आहे. म्हणजेच पृथ्वीवर जेव्हा १४ दिवस होतील, तेव्हा चंद्रावर एक दिवस होतो. जेव्हा दिवस होतो, तेव्हा चंद्रावर सूर्यप्रकाश असतो. चांद्रयान-३ या अंतराळयानावर असलेल्या उपकरणांची काम करण्याची क्षमता ही फक्त चंद्रावरील एका दिवसाची आहे. कारण- चांद्रयान-३ वरील सर्व उपकरणे ही सौरऊर्जेवर चालणारी आहेत. चंद्रावर एक दिवसापेक्षा जास्त काम करायचे असेल, तर सूर्यप्रकाशाच्या मदतीने त्या उपकरणांना ऊर्जा निर्माण करावी लागते. सूर्याकडून ऊर्जा घेऊन ही उपकरणे पुन्हा काम करू लागतात. दुसरीकडे रात्र झाल्यानंतर चंद्रावरील तापमानात प्रचंड घट होते. रात्र झाल्यानंतर तेथील हवामान साधारण उणे १०० अंश सेल्सिअसपर्यंत घटते. चांद्रयान-३ अंतराळयानावरील उपकरणे एवढ्या उणे तापमानात कार्यक्षम राहत नाहीत. उणे तापमानामुळे ही उपकरणे गोठण्याचीही शक्यता आहे.

… तर चांद्रयानाला पाहावी लागणार महिनाभर वाट

उपकरणांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी, तसेच जास्तीत जास्त काम करण्यासाठी चंद्रावर दिवस सुरू असतानाच उतरणे योग्य आहे. याच कारणामुळे चांद्रयान-३ ला चंद्रावर उतरवण्यासाठी २३ ऑगस्ट या दिवसाची निवड करण्यात आली आहे. काही कारणांस्तव चांद्रयान-३ चंद्राच्या पृष्ठभागावर उतरू न शकल्यास भारतीय अंतराळ संशोधन संस्था पुढच्या दिवशी म्हणजेच २४ ऑगस्ट रोजी हाच प्रयत्न पुन्हा करील. मात्र, २४ ऑगस्ट रोजीदेखील चंद्राच्या पृष्ठभागावर न उतरू शकल्यास चांद्रयान पुढचे २९ दिवस पुन्हा दिवस होण्याची वाट पाहील. म्हणजेच चांद्रयान पृथ्वीवरील २९ दिवस चंद्राभोवती फिरत राहील.

लुना-२५ यानावर पॉवर जनरेटर्स

दुसरीकडे रशियाच्या लुना-२५ या यानाला अशा प्रकारचा कोणताही अडथळा नाही. कारण- या यानावरील सर्व उपकरणं ही सौरऊर्जेवर चालणारी तर आहेतच; शिवाय या उपकरणांत पॉवर जनरेटर्स आहेत. हे जनरेटर चंद्रावर रात्र असल्यास ऊर्जा निर्माण करतात. याच ऊर्जेच्या मदतीने ही उपकरणे काम करीत राहतात. या जनरेटर्सचे आयुर्मान हे एक वर् आहे. लुना-२५ हे अंतराळयान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवण्यासाठी रशियाला चंद्रावरील दिवस आणि रात्र अशा कशाचाही विचार करावा लागलेला नाही.

चांद्रयान-३, लुना-२५ यांच्यात किती अंतर असणार?

चांद्रयान-३ आणि लुना-२५ ही दोन अंतराळयाने दोन दिवसांच्या फरकाने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहेत. मात्र, या दोन्ही यानांचे उतरण्याचे नेमके ठिकाण सारखे नाही. चांद्रयान-३ चे उतरण्याचे ठिकाण हे ८६ अंश दक्षिण अक्षांश आहे; तर लुना-२५ हे दक्षिणेच्या ७० अंशावर उतरणार आहे. ही दोन्ही याने एकमेकांपासून खूप दूर असतील. आतापर्यंतची याने चंद्रावरील विषृवत्तीय प्रदेशात उतरलेली आहेत. या दोन्ही यानांमध्ये प्रत्यक्ष शेकडो किलोमीटरचे अंतर असणार आहे.

ध्रुवीय प्रदेशात संशोधनाचे वाढणार प्रमाण

दरम्यान, चंद्राच्या ध्रुवीय प्रदेशात संशोधन करण्यासाठी भविष्यात अनेक देश आपली अंतराळयाने या भागात उतरवू शकतात. त्यामुळे आगामी काळात या प्रदेशात संशोधन करणाऱ्या यानांची संख्या वाढू शकते. या भागात गोठलेल्या स्वरूपात म्हणजेच बर्फाच्या रूपात पाणी आढळण्याची शक्यता व्यक्त केली जाते.