Amarnath temple history: यावर्षीच्या (२०२५) अमरनाथ यात्रेसाठी नोंदणीला सुरुवात झाली आहे. श्री अमरनाथजी श्राइन बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार यावर्षी ही यात्रा ३ जुलै ते ९ ऑगस्टदरम्यान पार पडणार आहे आणि भक्तगण ऑनलाईन नोंदणी करू शकतात. जम्मू आणि काश्मीरमध्ये असलेले अमरनाथ मंदिर हे हिंदू धर्मातील एक अतिशय पवित्र तीर्थक्षेत्र मानले जाते. हे मंदिर भगवान शिवाला समर्पित असून येथे बर्फातून तयार होणाऱ्या लिंगरूपात शिवाची पूजा केली जाते. हे शिव लिंग अमरनाथ पर्वतावर समुद्रसपाटीपासून ३८८८ मीटर उंचीवर असलेल्या एका गुहेत स्थित आहे आणि वर्षभरातील बहुतांश काळ ते बर्फाने आच्छादलेले छादलेले असते. त्यामुळे ही यात्रा दरवर्षी फक्त एकदाच आयोजित केली जाते. काश्मीरमधील दहशतवादाच्या पार्श्वभूमीवर, ही यात्रा कडक सुरक्षा व्यवस्थेमध्ये पार पडते. अमरनाथ तीर्थक्षेत्राचा इतिहास नेमका काय आहे आणि या स्थळासंदर्भात नेमके पौराणिक संदर्भ काय सांगतात, याचा घेतलेला हा आढावा.
अमरनाथ मंदिराची दंतकथा
हिंदू पुराणानुसार अमरनाथ हे नाव पडण्यामागे एक महत्त्वाची पौराणिक कथा आहे. असे मानले जाते की, भगवान शिव यांनी अमरत्वाचं गुपित पार्वती देवीला याच गुहेत सांगितलं होतं. अमरत्वाची ही कथा इथे सांगितली गेल्यामुळे या गुहेस अमरनाथ असं नाव प्राप्त झालं. या ठिकाणाशी अमरेश आणि अमरेश्वर ही नावंही जोडलेली आहेत. असं मानलं जातं की ही ‘अमर कथा’ साऱ्यांना ऐकू येऊ नये म्हणून शिव आणि पार्वती या दूरवरच्या दुर्गम गुहेकडे गेले होते. प्रवासादरम्यान भगवान शिवांनी नंदीला पहलगाम येथे सोडून दिले. चंदनवारी येथे त्यांनी त्यांच्या जटांमध्ये वास करणाऱ्या चंद्राला मुक्त केलं. शेषनागाला सरोवराच्या काठावर सोडलं. याच ठिकाणी आजच्या अमरनाथ यात्रेचे थांबे असतात. परंतु, सर्व खबरदारी घेऊनही दोन कबुतरांनी ही कथा ऐकली आणि ते अमर झाले, अशी समजूत आहे. आजही अमरनाथ गुहेत कबुतर दिसणं शुभ मानलं जातं. अमरनाथमधील शिवलिंग स्वयंभू मानलं जातं. म्हणजेच या शिवलिंगाची स्थापना कोणत्याही मर्त्य मानवाने केलेली नाही.
अमरनाथ मंदिराचा इतिहास
अमरनाथ गुहेच्या ठिकाणी एक तीर्थस्थळ शतकानुशतके अस्तित्वात असल्याचे संदर्भ सापडतात. १२ व्या शतकात लिहिण्यात आलेल्या कल्हणाच्या राजतरंगिणी या काश्मीरच्या इतिहासग्रंथात अमरनाथचा उल्लेख किमान दोन वेळा आलेला आहे. या ग्रंथाच्या सातव्या पुस्तकातील श्लोक १८३ आणि १८५ मध्ये राजा अनंत (१०२८ ते १०६३) यांची पत्नी राणी सूर्यमतीबद्दल संदर्भ आहे. “राणी सूर्यमतीने आपल्या भावाच्या (सिल्लनाच्या) आणि पतीच्या (राजा अनंत) नावाने विजयेश आणि अमरेश या ठिकाणी अनुक्रमे दोन मठ बांधले… अमरेश्वर येथे तिने त्रिशूल, बाणलिंग इत्यादींसाठी अन्नदाने दिली व अग्रहारही प्रदान केले.” (संदर्भ: आर. एस. पंडित)
बाबा बर्फानी
पहिल्या पुस्तकातील श्लोक क्रमांक २६७ मध्ये नाग सुष्रुवस यांच्याविषयी लिहिताना म्हटले आहे की, “दुधाच्या सागरासारखा चमकणारे एक सरोवर त्याने एका दूरच्या पर्वतावर बांधले (शेषनाग सरोवर असावे). या सरोवराला अमरनाथ यात्रेच्या मार्गावर आजही लोक भेट देतात.” अमरनाथ गुहेतील लिंग एक स्टॅलेग्माइट आहे. म्हणजे गुहेच्या छपरावरून पाणी ठिबकत ठिबकत जमिनीवर साचल्यामुळे तयार होणारी नैसर्गिक रचना. येथे छतावरून पडणारे पाणी थंडीमुळे गोठते आणि बर्फाचे शिवलिंग निर्माण होते. म्हणून भगवान अमरनाथ यांना बाबा बर्फानी असेही म्हटले जाते. हे बर्फाचे शिवलिंग ऋतूप्रमाणे बदलते. असं मानलं जातं की, चंद्राच्या कलांप्रमाणे शिवलिंगाची वाढ आणि घट होते. “अमरनाथचं मंदिर हिंदूंच्या विशेषतः काश्मिरी पंडितांच्या मनात एक विशेष स्थान राखून आहे. या ठिकाणाचं महत्त्व अमरेश्वर महात्म्य या प्राचीन ग्रंथात वर्णिलं आहे. आज शासन यात्रेचं आयोजन करतं. परंतु, पूर्वी यात्रेकरू केवळ भक्तीच्या जोरावर ही खडतर यात्रा पूर्ण करत असत. असं मानलं जातं की, ही यात्रा अध्यात्मिक पुण्य फळ देते आणि पापांचे परिणाम दूर करते,” असं काश्मीरमधील इतिहासकार उत्कल कौल यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं. परंतु, असा एक काळ होता ज्यावेळी ही यात्रा बंद झाली होती आणि गुहा नाहीशी झाली होती.
गुहा कशी सापडली?
या संदर्भात एक प्रसिद्ध कथा आहे. या कथेत म्हटल्याप्रमाणे १८५० च्या दशकात एका मुस्लिम मेंढपाळाने म्हणजेच बुटा मलिकने या गुहेचा परत शोध लावला. या कथेनुसार एका संताने बुटा मलिकला कोळशाने भरलेली एक पिशवी दिली. घरी परतल्यावर मलिकने पाहिलं की, ती पिशवी कोळशाऐवजी सोन्याने भरलेली आहे. आनंदित होऊन तो त्या संताचे आभार मानण्यासाठी परत गेला. परंतु, तिथे संत नव्हतेच, आणि त्याऐवजी त्या जागी पवित्र गुहा आणि त्यामध्ये शिवलिंग होतं. कौल म्हणाले, “गुहा कधीच नाहीशी झाली नव्हती. मात्र, मुस्लिम राजवटीत या ठिकाणी यात्रा करणे खूप कमी झाले होते. काश्मीरमध्ये गुलाब सिंग यांनी डोग्रा राजवट स्थापन झाल्यावर या गुहेचा शोध परत लागला.”
आजही हजारो भाविक अमरनाथच्या मार्गावर खडतर प्रवास करत या दिव्य गुहेपर्यंत पोहोचतात, जिथे निसर्ग आणि श्रद्धा यांचा विलक्षण संगम पाहायला मिळतो. हजारो वर्षांपासून पौराणिक कथांचा, इतिहासाचा आणि भक्तीचा ठेवा जपणारी ही यात्रा म्हणजे भक्तांच्या श्रद्धेचा शिखरबिंदू आहे. २०२५ ची यात्रा नव्याने नोंदणीसह सुरू होत असली, तरी या यात्रेचा आत्मा मात्र कालातीत आहे.
© IE Online Media Services (P) Ltd