जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे जम्मू आणि काश्मीरमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. काश्मीरमध्ये पर्यटनासाठी आलेले पर्यटक तेथून उपलब्ध असलेल्या मार्गाने निघण्याच्या प्रयत्नात आहेत. अनेक पर्यटकांनी भविष्यातील आपल्या प्रवासाचे नियोजन मागे घेतले आहे. या दहशतवादी हल्ल्यामध्ये जीव गमावणाऱ्या २६ जणांमध्ये बहुतेक पर्यटक होते. त्यामुळे याचा परिणाम अमरनाथ यात्रेवर होऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पवित्र अमरनाथ तीर्थयात्रेची नोंदणी प्रक्रिया या महिन्याच्या सुरुवातीला सुरू झाली आहे. या वर्षी ही यात्रा ३ जुलै ते ९ ऑगस्ट दरम्यान सुरू होणार आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा अमरनाथ यात्रेवर परिणाम होईल का? त्याविषयी जाणून घेऊयात.
दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये भीतीचे वातावरण
पहलगामपासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या बैसरन व्हॅलीमध्ये मंगळवारी दुपारी चार दहशतवाद्यांनी पर्यटकांची हत्या केली. या दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाच्या एका तरुण अधिकाऱ्यासह किमान २६ जणांचा मृत्यू झाला आणि १० जण जखमी झाले. जखमीनवर अनंतनाग येथील प्रशासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. भारत सरकारने बंदी घातलेल्या लष्कर-ए-तैयबा (एलईटी) दहशतवादी संघटनेचा भाग असलेल्या द रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) ने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. प्राप्त वृत्तानुसार, दहशतवाद्यांनी धर्माच्या आधारावर केवळ पुरुष पर्यटकांना लक्ष्य केले. या हल्ल्यानंतर जगभरातून शोक व्यक्त केला जात आहे. सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये अनेक पर्यटकांनी आपला अनुभव सांगितल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.

गुजरातमधील अहमदाबाद येथील पर्यटक अमन शर्मा यांनी ‘हिंदुस्तान टाईम्स (एचटी)’शी बोलताना सांगितले, “आम्ही येथे श्री माता वैष्णोदेवी मंदिराचे दर्शन घेण्यासाठी आलो आहोत पण दुर्दैवी पर्यटकांवर अशा हल्ल्यांमुळे भीतीचे वातावरण निर्माण होते.” ते पुढे म्हणाले, त्यांनी सोशल मीडियावर पीडितांचे त्रासदायक व्हिडिओ पाहिले आहेत. श्री माता वैष्णोदेवी मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही पहलगामला भेट देण्याची योजना आखली होती, असेही त्यांनी सांगितले. हल्ल्यानंतर आता आम्ही आमच्या योजना बदलल्या आहेत आणि अहमदाबादला परतणार आहोत,” असे ते म्हणाले.
केंद्र सरकारने कलम ३७० रद्द केल्यानंतर पहलगाममध्ये पर्यटकांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला जात आहे. २०१८ पासून जम्मू आणि काश्मीरमध्ये पर्यटन वाढत आहे. कोविड काळात काही प्रमाणात त्यात घट पाहायला मिळाली होती. परंतु, त्यानंतर मोठ्या प्रमाणात पर्यटनात वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. बर्फाच्छादित पर्वतांनी वेढलेले बैसरन व्हॅली हे जम्मू-काश्मीरमधील लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. “लाखोंच्या संख्येने वाढलेल्या पर्यटनामुळेच हा हल्ला करण्यात आला आहे. यामुळे काही स्थानिक काश्मिरी नगरिकांनाही त्याची शिक्षा भोगावी लागेल,” असे काश्मीरमधील भाष्यकार जफर चौधरी यांनी ‘टाईम्स ऑफ इंडिया (टीओआय)’ला सांगितले
हल्ल्याचा अमरनाथ यात्रेवर परिणाम होईल का?
जुलैमध्ये अमरनाथ यात्रा सुरू होणार आहे. भगवान शंकराला समर्पित असलेले जम्मू-काश्मीरमधील अमरनाथ मंदिर हिंदूंसाठी सर्वांत पवित्र तीर्थस्थळांपैकी एक आहे. दरवर्षी लाखोंच्या संख्येत यात्रेकरू या तीर्थस्थळाला भेट देतात. या यात्रेवर दहशतवाद्यांचे सावट असल्याने सैन्य दलाच्या कडक सुरक्षेत या यात्रेचे आयोजन केले जाते. मात्र, या हल्ल्यानंतर दहशतवादी हल्ल्याची भीती वाढली आहे. काश्मीरमध्ये अमरनाथ यात्रेचे दोन मार्ग आहेत. त्यापैकी एक मार्ग पहलगाम येथून जातो.
पहलगाममध्ये अमरनाथ यात्रेकरूंसाठी बेस कॅम्प तयार केले जातात. तेथे निवास, वैद्यकीय मदत आणि ट्रेकसाठी वाहतूक यासारख्या सुविधा उपलब्ध असतात. ऑल जम्मू हॉटेल्स अँड लॉज असोसिएशनचे अध्यक्ष इंद्रजीत खजुरिया यांनी ‘हिंदुस्तान टाईम्स’ला सांगितले की दहशतवादी हल्ल्याचा अमरनाथ यात्रेवर परिणाम होऊ शकतो. ते पुढे म्हणाले, “अमरनाथ यात्रेची घोषणा झाल्यानंतर ही घटना घडली आहे. या काळात आमचा व्यवसाय होतो. परंतु, हा हल्ला पर्यटन उद्योगाला धोका निर्माण करू शकतो. अशा वातावरणात, यात्रेसाठी कोण येईल. एका हल्ल्यामुळे संपूर्ण तीर्थयात्रेवर परिणाम होऊ शकतो. ही परिस्थिती पूर्ववत होण्यासाठी अनेक महीने लागतील,” असेही ते म्हणाले.
इंद्रजीत खजुरिया यांनी सांगितले, हा हल्ला जाणीवपूर्वक करण्यात आला आहे. पर्यटन उद्योगाला हानी पोहोचवण्यासाठी पवित्र तीर्थयात्रेपूर्वी त्यांनी हा हल्ला केला. मी केंद्राला आवाहन करतो की अमरनाथ यात्रेचे व्यवस्थापन सैन्याकडे सोपवण्यात यावे, त्यामुळे लोकांमधील भीती कमी होईल, असे ते म्हणाले. या दहशतवादी हल्ल्यानंतर अमरनाथ यात्रेची सुरक्षितता आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात निर्देश मागणारी जनहित याचिका (पीआयएल) दाखल करण्यात आली आहे.
यापूर्वीही दहशतवाद्यांनी अमरनाथ यात्रेला लक्ष्य केले आहे. २००० मध्ये अमरनाथ बेस कॅम्पवर झालेल्या हल्ल्यात ३० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता, तर ६० जण जखमी झाले होते. २००१ मध्येही शेषनाग येथे अमरनाथ यात्रेकरूंवर अशाच प्रकारचा हल्ला झाला होता, त्यात १३ जणांचा मृत्यू झाला. २००२ मध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा अमरनाथ यात्रेला लक्ष्य केले होते, त्यात ११ यात्रेकरू ठार झाले. दहशतवाद्यांनी २०१७ मध्ये अमरनाथ यात्रेवरून परतणाऱ्या आठ यात्रेकरूंची गोळ्या घालून हत्या केली.