Ambedkar Jayanti 2025: भारतरत्नन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून शिकण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. हाताशी काही नसताना आणि फारसे कोणाचे पाठबळ नसताना केवळ कष्टाने त्यांनी आपले स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. या त्यांच्या प्रवासात ज्या तीन विभूती त्यांच्यासाठी प्रेरणादायी ठरल्या त्यांना गुरु मानून बाबासाहेबांनी मार्गक्रमण केले. त्यांच्या या तीन गुरूंविषयी त्यांनी माझी आत्मकथा या पुस्तकात नोंद केली आहे.
पहिले गुरू गौतम बुद्ध
बाबासाहेब म्हणतात, “मी या स्थितीत आलो याचे कारण माझ्यात उपजत काहीतरी होते, असे कोणी समजू नये. प्रयत्नाने व कष्टाने मी वर चढलो. मी तीन फक्कड गुरू केले. माझ्या जीवनात त्यांनी क्रांती घडवून आणली. माझ्या उन्नतीला जे कारणीभूत झाले, त्यापैकी माझा पहिला सर्वश्रेष्ठ गुरू गौतम बुद्ध. दादा केळुसकर नावाचे माझ्या वडिलांचे विद्याव्यासंगी स्नेही होते. त्यांनी बुद्धाचे चरित्र लिहिले होते. मला एका प्रसंगी त्यांनी ते बक्षीस दिले. ते पुस्तक वाचल्यावर मला अगदी वेगळाच अनुभव आला. उच्च-नीचतेला त्या धर्मात स्थान नाही. रामायण, महाभारत, ज्ञानेश्वरी या ग्रंथांवरचा माझा विश्वास उडाला. मी बौद्धधर्माचा उपासक बनलो. जगामध्ये बौद्धधर्मासारखा धर्म नाही आणि भारताला जगावयाचे असेल तर त्या धर्माचा भारताने स्वीकार करावा असे मला आजही वाटते.”

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

बुद्ध पहिले गुरू

दादा केळुसकर म्हणजे कृष्णाजी अर्जुन केळुसकर. केळुस या वेंगुर्ल्यातील गावी जन्मलेले कृष्णराव अर्जुन केळुसकर हे मराठीतील आद्य शिवचरित्रकार आहेत असे मानले जाते. त्यांनी आध्यात्मिक ज्ञानरत्नावली (१८९४), गौतम बुद्ध यांचे चरित्र, तुकाराम महाराजांचे चरित्र, छत्रपती शिवाजी महाराज (१९०७), फ्रान्सचा जुना इतिहास, सेनेका व एपिक्टेटस यांची बोधवचने इत्यादी साहित्य निर्मिती केली. केळुसकरांनी स्वतः लिहिलेले बुद्धचरित्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मॅट्रीक परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या कौतुक समारंभात भेट म्हणून दिले होते.

दुसरे गुरू कबीर

बाबासाहेबांचे दुसरे गुरू कबीरसाहेब होते. बाबासाहेब लिहितात, “त्यांच्या ठिकाणी भेदभाव नव्हता . गांधींना मी नुसते गांधी न म्हणता ‘महात्मा गांधी’ म्हणावे, अशी मला आग्रहाची पत्रे आली व येतात, पण त्या बाबतीत कोणाचे म्हणणे मी जुमानलेले नाही.” यासाठी डॉ. बाबासाहेब आंबडेकर ‘मानस होना कठीण है । तो साधू कैसा होत।।’ या कबीरांच्याच उक्तीचा दाखला देतात.

तिसरे गुरू महात्मा फुले

बाबासाहेबांचे तिसरे गुरू महात्मा ज्योतिबा फुले. डॉ. आंबेडकर लिहितात, महात्मा ज्योतिबा फुले यांचे मला मार्गदर्शन झाले. या तीन गुरूच्या शिकवणुकीने माझे जीवन बनले आहे.

बाबासाहेबांची तीन उपास्य दैवते

याविषयी बाबासाहेब लिहितात, “तीन गुरूप्रमाणे माझी तीन उपास्य दैवतेही आहेत. माझे पहिले उपास्य दैवत विद्या, विद्येशिवाय काही होऊ शकत नाही. या देशात प्रचंड बहसंख्येने समाज विद्याहीन आहे. ब्राह्मण बुद्धाला शूद्र मानीत. पण बौद्धधर्मात जातपात नाही आणि विद्या शिकण्यास कोणालाही मनाई नाही. अन्नाप्रमाणेच माणसाला ज्ञानाची जरूरी आहे. ब्राह्मणांनी इतरांना विद्या शिकण्यास मनाई केली. शिकणाऱ्यांच्या जिभा कापल्या. याचा परिणाम म्हणून आजही या देशात ९० टक्के लोक अशिक्षित आहेत. ब्रम्हदेशात बौद्धधर्म आहे. तेथे ९० टक्के लोक सुशिक्षित आहेत. हिंदुधर्म व बौद्धधर्मातील हे अंतर आहे.” खरा प्रेमी ज्या उत्कटतेने आपल्या प्रेयसीवर प्रेम करतो त्या उत्कटतेने माझे पुस्तकावर प्रेम आहे. शत्रूलाही कबूल करणे भाग पडेल असे ज्ञान तुम्ही संपादिले पाहिजे. तुम्ही माझ्या दिल्लीच्या निवासस्थानी आलात तर तेथे तुम्हाला माझा वीस हजार निवडक पुस्तकांचा संग्रह दिसेल. मी विनयपूर्वक विचारतो, अशी संपत्ती दुसऱ्या कुणाजवळ आहे? दाखवा! माझे दुसरे उपास्य दैवत विनयशीलता हे आहे. पण हे खरे की, मी नेहमीच विनयशील असतो असे नाही, मात्र विनय म्हणजे लीनता, लाचारी नव्हे. मी लीनता त्याज्य समजतो. माणसाने स्वाभिमानाने जगले पाहिजे असे मला वाटते. समाजकार्याचे ध्येय मी डोळ्यांपुढे ठेवले. पण चरितार्थासाठी कोणावर अवलंबून राहण्याची कल्पना मला कधीच सहन झाली नाही. समाजकार्यासाठी मी नोकरीत अडकलो नाही. परळला १०x१० च्या खोलीत मी कैक वर्षे काढली. कण्याची भाकरी आणि कण्याचा भात खाल्ला, पण मी कधी कोणाकडून स्वत:साठी थैली घेतली नाही. या देशात आलेल्या सर्व व्हाईसरॉयशी आणि गव्हर्नरांशी माझा स्नेहसंबंध होता. पण मी माझ्याकरिता त्यांच्याकडे कधी कसलीही याचना केली नाही. दुसऱ्यांना मदत होईल अशा गोष्टी मी त्यांच्याकडून करून घेतल्या. मी कधी कोणाचे नुकसान केल्याचा अगर कोणाच्या बाबतीत अपकृत्य केल्याचा तुम्हाला एकही दाखला मिळणार नाही. मला सुप्रिम कोर्टाचा न्यायाधीश होता आले असते. पण त्यात अडकून समाजकार्याच्या दृष्टीने काय होण्यासारखे आहे, असा मी विचार केला. मी माझ्या बुद्धीप्रमाणे चाललो. परमेश्वराला काय वाटेल याचा मी कधी विचार केलेला नाही. परमेश्वराला न मानणारा मी माणूस आहे. म्हणून शीलसंवर्धन हे मी माझे तिसरे उपास्य दैवत समजतो.”

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ भारतासाठीच नव्हे, तर संपूर्ण जगासाठी संघर्ष, समतेचा आग्रह आणि विचारस्वातंत्र्याचे प्रतीक आहेत. त्यांचे जीवन म्हणजे अंधश्रद्धा, भेदभाव आणि अन्यायाविरुद्धचा एक सशक्त संघर्ष आहे. त्यांच्या जीवनप्रवासात ज्यांनी त्यांना वैचारिक आधार, दिशा आणि सामाजिक भान दिलं, अशा तीन थोर विभूतींना .. गौतम बुद्ध, संत कबीर आणि महात्मा फुले .. बाबासाहेबांनी केवळ गुरू मानले नाही, तर त्यांच्या शिकवणीला आपल्या आयुष्याचा पाया बनवला. विद्या, विनयशीलता आणि शीलसंवर्धन ही तीन उपास्य दैवते मानून बाबासाहेबांनी एक समर्पित, निःस्वार्थ आणि राष्ट्रहिताच्या ध्यासाने प्रेरित आयुष्य जगलं. त्यांनी नोकरीच्या सुरक्षित चौकटीत स्वतःला बंदिस्त न करता समाजासाठी झटणं अधिक महत्त्वाचं मानलं.

आज, जेव्हा आपण बाबासाहेबांबद्दल बोलतो, तेव्हा त्यांच्या कायदेतज्ज्ञ, घटनेचे शिल्पकार वा समाजसुधारक म्हणून गौरव करतो. पण त्यामागे असलेलं तीन गुरूंचं चिंतन आणि तीन दैवतांचं आत्मज्ञान आपल्याला विसरून चालणार नाही. त्यांच्या विचारांचा खरा आदर करायचा असेल, तर प्रत्येकाने त्यांच्याप्रमाणे विद्या प्राप्त करावी, विनय अंगी बाणवावा आणि शील जपावं हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ambedkar jayanti 2025 the three gurus who shaped dr babasaheb ambedkars life svs