फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपची मातृकंपनी ‘मेटा’ने आपल्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी केल्यानंतर आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याआधी ट्विटर या मायक्रोब्लॉगिंग साईटचे मालक एलॉन मस्क यांनीदेखील ट्विटरमधील अनेक कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. या पार्श्वभूमीवर जगप्रसिद्ध असलेल्या या कंपन्यांकडून कर्मचारीकपात का केली जात आहे? असा प्रश्न विचारला जात आहे. मात्र फक्त मेटा आणि ट्विटर या दोन कंपन्यांनीच आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलेले नाही. जगातील अनेक नावाजलेल्याा कंपन्यांनी कर्मचारीकपातीचा निर्णय घेतलेला आहे किंवा तसा विचार या कंपन्यांकडून केला जात आहे. जाणून घेऊया जगातील कोणकोणत्या कंपन्यांनी कर्मचारी कपातीचा निर्णय घेतलेला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मेटा कंपनीत मोठी कर्मचारीकपात

फेसबुक, इन्स्टाग्राम तसेच व्हॉट्सअॅप या माध्यमांची मातृकंपनी मेटाने कर्मचारीकपातीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयांतर्गत कंपनीतील एकूण कर्मचाऱ्यांपैकी १३ टक्के किंवा ११ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले जाणार असे जाहीर केले होते. महसुलामध्ये मोठी घट झाल्यामुळे मेटाने हा निर्णय घेतलेला आहे.

सिटीग्रुप (Citigroup)

सिटीग्रुप या बँकिंग क्षेत्रातील कंपनीनेदेखील मोठी कर्मचारीकपात केली आहे. याबाबबतचे वृत्त ‘ब्लूमर्गने’ दिले आहे.

मॉर्गन स्टॅनली (Morgan Stanley)

मॉर्गन स्टॅनली ही फायनान्स क्षेत्रातील कंपनी आगामी काही आठवड्यांमध्ये कर्मचारी कपात करण्याची शक्यता आहे. रॉयटर्सने ३ नोव्हेंबर रोजी याबाबतचे वृत्त दिले आहे.

इंटेल

इंटेल या कंपनीतही आगामी काळात मोठी कर्मचारीकपात होण्याची शक्यता आहे. खर्च कमी करण्याासाठी हा निर्णय घेतला जाऊ शकतो, असे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पॅट ग्लेसिंजर यांनी सांगितले आहे. या कंपनीला २०२३ या वर्षात आपला खर्च ३ अब्ज डॉलर्सने कमी करायचा आहे. इंटेलमध्ये लवकरच कर्मचारी कपात होणार असली तरी किती कर्मचाऱ्यांना कामावरून काढले जाईल, याबाबत ग्लेसिंजर यांनी निश्चित माहिती दिलेली नाही.

मायक्रोसॉफ्ट

मायक्रोसॉफ्ट ही जगातील बलाढ्य टेक कंपनीदेखील वेगवेगळ्या विभागातील साधारण १ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे.

जॉन्सन अँड जॉन्सन

आरोग्य आणि औषधनिर्माण क्षेत्रातील जॉन्सन अँड जॉन्सन ही कंपनी आगामी काळात काही कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढू शकते. या कंपनीतील उच्चपदस्थ अधिकारी जेसेफ वोक यांनी तसे संकेत दिले आहेत.

ट्विटर

ट्विटर या मायक्रोब्लॉगिंग कंपनीला एलॉन मस्क यांनी खरेदी केल्यानंतर या कंपनीत मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना कमी करण्यात आले आहे. या कंपनीत कम्यूनिकेशन तसेच अभियांत्रिकी विभागातील कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आले आहे.

लिफ्ट (Lyft)

ट्रान्सपोर्ट क्षेत्रातील लिफ्ट या कंपनीने १३ टक्के किंवा ६८३ कर्मचाऱ्यांना कामावरून काढले जाणार असल्याचे सांगितले आहे. या आधी या कंपनीने ६० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले होते. तसेच सप्टेंबर महिन्यापासून या कंपनीमध्ये नव्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली नाही.

बियॉन्ड मिट (Beyond Meat)

खाद्यक्षेत्रातील कंपनी बियॉन्ड मिट ही कंपनी या वर्षी २०० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याच्या विचारात आहे. या कर्मचारीकपातीमुळे कंपनीचे ३९ दशलक्ष डॉलर्स वाचणार आहेत.

स्ट्राईप इंक

डिजिटल व्यवहार क्षेत्रातील कंपनी स्ट्राईप इंक ही कंपनी १४ टक्क्यांनी कर्मचारीकपात करण्याच्या तयारी आहे. या कर्मचारीकपातीनंतर स्ट्रईप इंक कंपनीत एकूण ७ हजार कर्मचारी शिल्लक राहतील.

ओपनडोर टेक्नॉलॉजीज (Opendoor Technologies)

मालमत्ता खरेदी-विक्री क्षेत्रातील ओपनडोर टेक्नॉलॉजीज ही कंपनीदेखील ५५० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार आहे. याआधी या कंपनीने आतापर्यंत ८३० कर्मचाऱ्यांना घरी बसवलेले आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: America facebook meta and twitter different companies trying to layoffs prd
Show comments