Blood Shortage In US संपूर्ण जगभरातच यंदा तापमानाने उच्चांक गाठला. जगाच्या अनेक भागांत तीव्र उष्णतेची लाट पाहायला मिळाली. अमेरिकेतही उष्णतेने यंदा विक्रम मोडला. अमेरिकेत अनेक दिवस उष्णतेची लाट होती. त्यामुळे लाखो लोकांनी घरातून बाहेर निघणेही टाळले. परंतु, या उष्णतेच्या लाटेचा एक असामान्य दुष्परिणामदेखील झाला. उष्णतेमुळे देशात रक्ताची भीषण टंचाई निर्माण झाली. परंतु, या रक्ताच्या टंचाईसाठी उष्णता कारणीभूत असल्याचे का सांगितले जात आहे? याविषयी सविस्तर समजून घेऊ आणि अमेरिकेतील एकूण परिस्थितीचा आढावा घेऊ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमेरिकेत रक्तटंचाईचे संकट

‘सीएनबीसी’नुसार १ जुलैपासून अमेरिकेतील रक्ताचा राष्ट्रीय पुरवठा २५ टक्क्यांहून अधिक घसरला आहे. ‘रेडक्रॉस’ या गटाने म्हटले आहे की, अति तापमानामुळे संपूर्ण अमेरिकेतील सुमारे १०० रक्तपेढ्यांवर याचा परिणाम झाला आहे. ‘एबीसी’नुसार हा गट अमेरिकेत सुमारे ४० टक्के रक्ताचा साठा प्रदान करतो. केवळ तीन टक्के पात्र लोक म्हणजे सुमारे सात दशलक्ष अमेरिकन दरवर्षी रक्तदान करतात; परंतु उष्ण हवामानामुळे रक्तदात्यांची संख्या कमालीची घसरली. त्यामुळे आयोजकांना रक्तदान कार्यक्रम पूर्णपणे रद्द करणे भाग पडले. ‘द हिल’ या वृत्तवाहिनीच्या म्हणण्यानुसार, अतिउष्णतेमुळे लोकांनी घरी राहण्याचा पर्याय निवडला. सामान्यतः प्रवास किंवा इतर कामांमुळे उन्हाळ्यात रक्तदानाचे प्रमाण कमी होते. परंतु, अतिउष्णतेमुळे ही परिस्थिती आणखीनच बिकट झाली आहे.

हेही वाचा : विकास प्रकल्पांसाठी केलं जाणारं वृक्ष प्रत्यारोपण का फसतं?

उष्णतेमुळे जुलैमध्ये सुमारे १९ हजार रक्तदात्यांनी रक्तदान ने केल्याचा संस्थेचा अंदाज आहे; परंतु रुग्णालयातील मागणी कमी न झाल्यामुळे तुटवडा निर्माण झाला आहे. दात्यांकडून मिळालेले रक्त शस्त्रक्रिया, बाळंतपण, गर्भधारणेतील अडचणी, अपघातग्रस्त रुग्ण, कर्करोगग्रस्त, रक्तविकारांशी लढा देणारे लोक आणि इतर वैद्यकीय उपचारांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. ‘रेडक्रॉस’ने म्हटले आहे की, त्यांना विशेषत: ओ रक्तगटाच्या रक्तदात्यांची गरज आहे. कारण- ओ पॉझिटिव्ह हा सर्वांत सामान्य रक्तगट आहे; तर ओ निगेटिव्ह गटाचे रक्त कुणालाही दिले जाऊ शकते.

रेड क्रॉस मिशिगन क्षेत्राचे वैद्यकीय संचालक डॉ. बॅरी सिगफ्राइड यांनी ‘सीएनबीसी’ला सांगितले की, अपघात आणि इतर जखमी झालेल्या लोकांसाठी ओ रक्तगट महत्त्वाचा आहे. “रुग्णांच्या सेवेवर परिणाम होण्यापासून रोखण्यासाठी सर्व रक्तगटांचे देणगीदार रुग्णालयात येऊन रक्तदान करू शकतात आणि रुग्णांना मदत करू शकतात,” असे त्यांनी सांगितले. ऑगस्टचा कार्यकाळात परिस्थिती आणखीनच बिघडते. कारण- या काळात अमेरिकेत चक्रीवादळ, पुराचा धोका वाढतो; ज्यामुळे वीजपुरवठा खंडित होतो. हेदेखील एक कारण आहे की, येणार्‍या काळात रक्तदात्यांच्या संख्येत आणखी घट होऊ शकते आणि परिस्थिती बिघडू शकते.

“आम्ही सध्या ज्या धोक्याला सामोरे जात आहोत, ते म्हणजे डेबी नावाचे वादळ. डेबी या वादळाचा प्रभाव फ्लोरिडा ते कॅरोलिनासपर्यंत पसरला आहे. या वादळामुळे रक्त संकलन करण्यात अडथळा निर्माण होत आहे, असे कनेक्टिकट आणि रोड आयलंडच्या अमेरिकन रेडक्रॉसचे प्रादेशिक कार्यकारी रिचर्ड ब्रॅनिगन यांनी ‘एनबीसी कनेक्टिकट’ला सांगितले. २० वर्षांत रेडक्रॉसला या वर्षी सर्वांत कमी लोकांनी रक्तदान केले आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

तज्ज्ञ काय म्हणतात?

तज्ज्ञांनी या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. “ज्या रुग्णांना रक्ताची सर्वांत जास्त गरज आहे, अशा रुग्णांवर उपचार करताना माझी भीती आणखी वाढते. विशेषत: नव्याने जन्मलेले बाळ किंवा आई यांच्याविषयी. कारण- त्यांना रक्ताची गरज असल्यास, त्यांच्यासाठी रक्त उपलब्ध नसल्याची मी कल्पनाही करू शकत नाही,” असे डेट्रॉईटच्या हॉस्पिटलमधील लेबर आणि डिलिव्हरी युनिटमध्ये नोंदणीकृत परिचारिका मेलिसा डेस्ट्रॉस यांनी ‘रेडक्रॉस’च्या वृत्त प्रकाशनात सांगितले. “मी प्रसूतीनंतरच्या रक्तस्रावाच्या परिस्थितीत, सात लिटरपेक्षा जास्त रक्त गेल्याचे आणि प्रसूतीनंतर स्त्रियांना मोठ्या प्रमाणात रक्ताची आवश्यकता असल्याचे पाहिले आहे,” असे त्या म्हणाल्या.

रेडक्रॉसचे विभागीय मुख्य वैद्यकीय अधिकारी बाईया लास्की यांनी एका प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे, “गरज असलेल्या रुग्णांवर वेळेवर उपचार करण्यासाठी ओ रक्तगट उपलब्ध असणे आवश्यक आहे.” ते पुढे म्हणाले, “खरं तर, मोठ्या प्रमाणात रक्त कमी झालेल्या रुग्णासाठी, जसे की कार अपघातातील एखादी व्यक्ती किंवा आईला प्रसूतिपश्चात रक्तस्राव होत असेल, सामान्यतः ओ गटातील रक्त चढवले जाते.” “संपूर्ण देशभरात रक्ताची तातडीची गरज आहे. आमच्याकडे जुलैमध्ये अलीकडेच घट झाली आहे. उन्हाळ्यातील परिस्थिती नेहमीच अवघड असते,” असे कनेक्टिकटच्या रेडक्रॉसच्या बोर्ड सदस्या चेरिल एंगेल्स यांनी ‘एनबीसी कनेक्टिकट’ला सांगितले. आमच्याकडे सध्या रक्तपुरवठा खूपच कमी आहे, असेही त्या म्हणाल्या.

हेही वाचा : ‘या’ देशात गुन्हेगारांची संख्या शून्यावर; तुरुंगातील कर्मचार्‍यांवर बेरोजगारीचे संकट; काय आहे कारण?

रेडक्रॉसद्वारे देणगीदारांना प्रोत्साहन

‘UPI.com’नुसार, अमेरिकेतील रेडक्रॉसने ३१ ऑगस्टपूर्वी रक्त देणाऱ्यांना २० डॉलरचे अॅमेझॉन व्हॉऊचर भेट म्हणून देऊ केले आहे. “रक्ताची निर्मिती किंवा साठा करता येत नाही आणि रक्त केवळ स्वयंसेवक दात्यांच्या कृपेनेच उपलब्ध करून दिले जाऊ शकते,” असे रेडक्रॉसने ‘एबीसी’ला सांगितले आहे.