What is the official language of USA : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देशाची अधिकृत भाषा इंग्रजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंदर्भातील कार्यकारी आदेशावर ट्रम्प लवकरच स्वाक्षरी करणार आहेत. या आदेशामुळे अमेरिकेला त्यांच्या २५० वर्षांच्या इतिहासात प्रथमच अधिकृत भाषा मिळणार आहे. व्हाईट हाऊसच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी (२८ फेब्रुवारी) या संदर्भातील माहिती दिली आहे. दरम्यान, इंग्रजी भाषेला यापूर्वी अमेरिकेच्या अधिकृत भाषेचा दर्जा का मिळाला नाही? यामागची नेमकी कारणं कोणती? याबाबत जाणून घेऊ.
अमेरिकेत कोणतीही अधिकृत राष्ट्रभाषा नाही.
अमेरिकेत राष्ट्रीय पातळीवर अजूनही कोणतीही अधिकृत भाषा नाही. परंतु, काही राज्यांनी इंग्रजीला त्यांची अधिकृत भाषा म्हणून घोषित केलं आहे. इतर राज्यांकडूनही इंग्रजीला देशात अधिकृत भाषेचा दर्जा मिळावा, अशी मागणी केली जात आहे. हीच बाब लक्षात घेता, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इंग्रजीला देशाची अधिकृत भाषा म्हणून घोषित करण्याचं जाहीर केलं आहे. ज्यामुळे अमेरिकेला इतिहासात प्रथमच संघराज्यीय मान्यताप्राप्त राष्ट्रीय भाषा मिळणार आहे. “ट्रम्प यांच्या आदेशामुळे २००० मध्ये तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी स्वाक्षरी केलेले धोरण रद्द होईल, ज्यामध्ये संघीय संस्था, तसेच सरकारच्या निधीतून चालणाऱ्या आणि इंग्रजीचा वापर करत नसलेल्या संस्थांनी भाषेचं सहकार्य करण्याबाबतची तरतूद होती,” असं ‘वॉशिंग्टन पोस्ट’नं आपल्या वृत्तात म्हटलं आहे.
आणखी वाचा : University of Jihad : पाकिस्तानमधील मदरशाला ‘जिहाद विद्यापीठ’ असं नाव का पडलं?
नवीन पत्रकानुसार, सरकारकडून निधी मिळणाऱ्या सरकारी संस्था व संघटनांना इंग्रजीव्यतिरिक्त इतर भाषेत कागदपत्रे व सेवा देणे सुरू ठेवायचे किंवा नाही, याची निवड करता येणार आहे. इंग्रजीला राष्ट्रभाषा म्हणून मंजुरी मिळाल्यास देशातील एकात्मतेसोबत सरकारी कामकाजातील कार्यक्षमता वाढेल, असं पत्रकात म्हटलं आहे. राष्ट्राध्यक्षांचा हा आदेश अमेरिकेतील लोकांना नवीन संधीचे दरवाजे उघडणारी राष्ट्रीय भाषा स्वीकारण्यास प्रोत्साहित करणारा आहे. नागरी सहभाग वाढण्यासाठी इंग्रजी भाषेची मदत होईल, असं व्हाइट हाउसने स्पष्ट केलं आहे.
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या निर्णयावर प्रतिक्रिया
अमेरिकेची अधिकृत भाषा इंग्रजी म्हणून घोषित करण्याच्या ट्रम्प यांच्या निर्णयावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. रूढीवादी राजकीय कार्यकर्ते चार्ली किर्क यांनी सोशल मीडियावर पोस्ट करीत राष्ट्राध्यक्षांच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. “स्थलांतराच्या काळात इंग्रजी भाषेला अमेरिकेची राष्ट्रभाषा म्हणून ओळख मिळणं हा राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश आहे”, असं चार्ली यांनी म्हटलं आहे. दुसरीकडे स्थलांतरसमर्थक गट आणि डेमोक्रॅटिक पार्टीच्या नेत्यांनी व्हाइट हाऊसच्या आदेशावर संताप व्यक्त केला आहे. राष्ट्राध्यक्षांचा हा निर्णय अमेरिकेतील इतर भाषा बोलणाऱ्या लाखो नागरिकांसाठी नुकसानकारक ठरेल, असं अमेरिकाज व्हॉइसच्या कार्यकारी संचालक व्हेनेसा कार्डेनास यांनी एपीला पाठविलेल्या ईमेलमध्ये म्हटलं आहे.
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या संयुक्त भाषणाला मंगळवारी स्पॅनिश भाषेत उत्तर देणारे डेमोक्रॅटिक प्रतिनिधी एड्रियानो एस्पेलॅट म्हणाले, “या आदेशामुळे देशाची जागतिक स्पर्धात्मकता कमी होऊ शकते. आम्हाला कार्यकारी कार्यवाहीचे तपशील पाहायचे आहेत. जर यामागचा उद्देश देशातील तरुणांची इतर भाषांमध्ये प्रवीणता मिळविण्याची क्षमता रोखणं हा असेल, तर ती आश्चर्यकारक बाब आहे.”
दुसरीकडे, ‘United We Dream’ या तरुणांच्या नेतृत्वाखालील गटानं असं निदर्शनास आणून दिलं की, अमेरिकेच्या इतिहासात कधीही अधिकृत भाषा निश्चित केली गेलेली नाही. ‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या वृत्तानुसार, ‘United We Dream’ गटाच्या प्रमुख अॅनाबेल मेंडोझा म्हणाल्या, “राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याकडून स्थलांतरितांना आणि वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या समुदायांना वारंवार लक्ष्य केलं जात आहे. आम्ही हे कदापि सहन करणार नाही.”
इंग्रजी अमेरिकेची अधिकृत भाषा का नाही?
अमेरिकेच्या स्थापनेपासून आजपर्यंत सुमारे २५० वर्षांच्या कालावधीत, देशानं कधीही अधिकृत राष्ट्रीय भाषा स्वीकारलेली नाही. इतिहासकारांच्या मते, स्थापनेच्या काळात देशातील बहुतेक लोक इंग्रजी बोलत होते. मात्र, संविधान तयार करताना संस्थापकांना इंग्रजीला अधिकृत भाषा म्हणून घोषित करण्याची आवश्यकता वाटली नाही. तसेच, इतर भाषा बोलणाऱ्या नागरिकांना वेगळेपणा वाटू नये, यासाठी इंग्रजीला अधिकृत भाषेचा दर्जा देण्याचं टाळण्यात आलं. अमेरिकेच्या पर्ड्यू विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. वेन राइट यांनी २०१८ मध्ये ‘सीएनएन’ला सांगितलं होतं की, संस्थापकांना अशी भाषा घोषित करण्याची आवश्यकता वाटली नाही.
अमेरिकेत एकूण किती भाषा बोलल्या जातात?
डॉ. वेन राइट म्हणाले, “इंग्रजी ही त्या काळातील संयुक्त राज्यांतील प्रमुख भाषा होती, त्यामुळे तिचं संरक्षण करण्याची खरोखरच आवश्यकता नव्हती. स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या देशातील इतर नागरिक दुखावले जाऊ नयेत याची काळजी संस्थापकांनी घेतली होती. संयुक्त राज्यांच्या स्थापनेपूर्वीही इतर भाषा बोलणारे अनेक लोक अमेरिकेत येऊन स्थायिक झाले होते.” अमेरिकन जनगणना ब्यूरोनुसार, देशाच्या ३४ कोटी लोकसंख्येपैकी सुमारे ६.८ कोटी लोक इंग्रजीव्यतिरिक्त इतर भाषा बोलतात, ज्यामध्ये १६० हून अधिक इतर भाषांचा समावेश आहे.
ब्यूरोच्या आकडेवारीनुसार, अमेरिकेत ३५० हून अधिक भाषा बोलल्या जातात. देशात इंग्रजीव्यतिरिक्त स्पॅनिश, चिनी, टागालोग, व्हिएतनामी व अरबी या सर्वांत जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषा आहेत. इंग्रजीला अधिकृत भाषा म्हणून समर्थन देणाऱ्या प्रोइंग्लिश या गटाच्या मते, अमेरिकेतील ३० हून अधिक राज्यांनी आधीच इंग्रजीला त्यांची अधिकृत भाषा म्हणून स्वीकारले आहे.
हेही वाचा : Chandra Shekhar Azad : ब्रिटिशांना जेरीस आणणाऱ्या उमद्या क्रांतिकाराची गोष्ट
इंग्रजीला अधिकृत भाषेचा दर्जा देण्यासाठी ट्रम्प यांचे प्रयत्न
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इंग्रजीला अमेरिकेची अधिकृत भाषा म्हणून स्वीकारण्याचे प्रयत्न अनेक वर्षांपासून सुरू केले आहेत. २०२१ मध्ये अमेरिकन अध्यक्ष म्हणून आपल्या पहिल्या कार्यकाळात ट्रम्प यांनी इंग्रजीला अधिकृत भाषा म्हणून घोषित करण्याचा प्रयत्न केला होता; मात्र तो अयशस्वी ठरला. २०१५ मध्ये ट्रम्प यांनी त्यांचे राजकीय विरोधक व फ्लोरिडाचे माजी गव्हर्नर जेब बुश यांची प्रचारादरम्यान स्पॅनिश बोलल्याबद्दल खिल्ली उडवली होती. “अमेरिकेत इंग्रजी बोलून बुश यांनी खरोखरच एक आदर्श निर्माण केला पाहिजे,” असं ट्रम्प यांनी निवडणूक प्रचारात म्हटलं होतं.
“अमेरिका असा देश आहे जिथे आपण स्पॅनिश नाही, तर इंग्रजी बोलतो,” असं ट्रम्प यांनी प्रचारात ठामपणे सांगितलं होतं. गेल्या वर्षीच्या निवडणूक प्रचारादरम्यानही ट्रम्प यांनी अमेरिकेत परदेशी भाषा बोलणाऱ्या स्थलांतरितांबद्दल चिंता व्यक्त केली होती. “आपल्या देशात अनेक जण वेगवेगळ्या भाषा बोलतात, ज्या सर्वसामान्यांना समजत नाहीत. आपण त्या कधीही ऐकल्या नाहीत आणि ही खूप भयानक गोष्ट आहे”, असं ट्रम्प म्हणाले होते. २० जानेवारी दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर ट्रम्प यांनी अमेरिकेत बेकायदा राहणाऱ्या लोकांना हद्दपार करणं सुरू केलं.
‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या मते, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा आदेश हा इंग्रजी बोलणाऱ्या लोकांसाठी सर्वांत मोठा विजय आहे. त्यांनी द्विभाषिक शिक्षण पद्धती आणि स्थलांतरितांना अमेरिकेतून हद्दपार करण्यासाठी सरकारला समर्थन दिले आहे. या आदेशामुळे इंग्रजी बोलता येत नसलेल्या नागरिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यांना नागरी सहभाग घेणे, मतदान करणे, तसेच महत्त्वाच्या आरोग्यसेवा आणि शैक्षणिक संसाधने मिळवणे कठीण होईल, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.