काही वर्षांपूर्वी म्हणजे १९९४मध्ये अमेरिकेत फुटबॉल विश्वचषकाचे आयोजन करण्यात आले होते. त्या स्पर्धेच्या आयोजनाचे एक उद्दिष्ट अमेरिकेमध्ये फुटबॉल (ज्यास तेथे सॉकर असे संबोधले जाते) या खेळाची लोकप्रियता वाढावी हे होते. जे अर्थातच सफल होऊ शकलेले नाही. विश्वचषकामुळे अमेरिकेची फुटबॉलमध्ये काहीशी पत वाढली, पण हा खेळ तेथे लोकप्रिय वगैरे अजिबातच झालेला नाही. आता जागतिक दर्शकसंख्येमध्ये पहिल्या पाचात असलेल्या क्रिकेटची विश्वचषक स्पर्धा तेथे होत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून अमेरिकेत क्रिकेट कितपत लोकप्रिय होऊ शकेल, अशी चर्चा सुरू झालीय. प्राधान्याने दक्षिण आशियाई स्थलांतरित आणि काही प्रमाणात ब्रिटिश-ऑस्ट्रेलियन स्थलांतरितांच्या प्रभावावर आणि उत्साहावर ते अवलंबून राहील.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमेरिका आंतरराष्ट्रीय क्रिकेटची जन्मभूमी?

अनेकांना ठाऊक नाही, पण हे सत्य आहे. ब्रिटिशांनी क्रिकेटचा खेळ जसा भारतात आणला, तसाच तो अमेरिकेत आणि कॅनडातही नेला. गंमत म्हणजे, ब्रिटिशांच्याही आधी पहिला अनधिकृत आंतरराष्ट्रीय सामना खेळला गेला, तो अमेरिका आणि कॅनडा या वसाहतींच्या देशात. १८४४मध्ये न्यूयॉर्क येथे ५ हजार प्रेक्षकांच्या साक्षीने अमेरिका आणि कॅनडा या संघांदरम्यान क्रिकेट सामना झाला. त्यावेळी त्या सामन्यावर घसघशीत बेटिंगही झाले होते! अशा प्रकारे क्रिकेट हा अमेरिकी भूमीवर खेळला गेलेला पहिला आधुनिक क्रीडा प्रकार ठरला. शिवाय आंतरराष्ट्रीय क्रिकेट म्हणून आपण आज जे ओळखतो, त्याची पहिली नोंद अमेरिकेतच झाली. अमेरिकेत विशेषतः न्यूयॉर्कमधील मॅनहॅटन भागांतील अनेक इमारती या क्रिकेटच्या मैदानांवर उभ्या राहिल्याची नोंद आढळते. अमेरिकेत अनेक क्रिकेट क्लब होते आणि डझनभर एकट्या न्यूयॉर्कमध्ये होते. न्यूयॉर्कमध्ये त्या काळी म्हणजे १९व्या शतकाच्या मध्यावर तीन क्रिकेट मैदाने होती. अमेरिकेच्या महान संस्थापक नेत्यांपैकी एक आणि त्या देशाचे पहिले अध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन हे स्वतः उत्साही क्रिकेटपटू होते. 

हेही वाचा >>> आचारसंहितेच्या काळात ध्यानधारणा करुन मोदींनी आचारसंहितेचे उल्लंघन केलंय का?

मग अमेरिकेतील क्रिकेट कशामुळे संपले?

याचे नेमके कारण क्रीडा विश्लेषक आणि अमेरिकेच्या इतिहासकारांना सांगता येत नाही. पण अमेरिकेतील अंतर्गत यादवीमुळे हे घडले असावे, याविषयी बहुतेकांमध्ये मतैक्य आहे. अनेक तरुण जे क्रिकेट खेळत होते, ते ‘युनियन वि. कन्फेडरसी’ म्हणजेच अमेरिकी अंतर्गत युद्धाकडे खेचले गेले. अनेक जण मरण पावले, कित्येक जायबंदी झाले. क्रिकेटचा ऱ्हास तेथून सुरू झाला. त्याचवेळी बेसबॉलचा उदय होऊ लागला होता. क्रिकेट त्यावेळी बऱ्यापैकी लांबणारा खेळ होता, बेसबॉल तुलनेने अधिक सुटसुटीत होता. लोकप्रिय होण्यासाठी त्याचे नियमही बदलण्यात आले. उदाहरणार्थ, बॅटचे पाते एका सपाट करण्याऐवजी दंडाकार बनवण्यात आले. बेसबॉलला विशेषतः लढाईवर गेलेल्या सैनिकांनी चटकन जवळ केले. या खेळात क्रिकेटसारखी खेळपट्टी किंवा विशिष्ट साधनांची आवश्यकता नव्हती. मुख्य म्हणजे हा खेळ अमेरिकेत जन्माला आलेला अस्सल अमेरिकन खेळ म्हणून त्या काळी ओळखला जाऊ लागला आणि क्रिकेटची पीछेहाट सुरू झाली. याउलट तत्कालीन ब्रिटिश आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघटनांनी आणि सरकारांनी अमेरिकेतील क्रिकेटकडे काहीसे हेटाळणीनेच पाहिले आणि हा खेळ अमेरिकनांच्या मनातून आणखी उतरत गेला. ब्रिटिश वसाहतींचा खेळ अशी त्याची हेटाळणी आता अमेरिकन करू लागले.     

क्रिकेट पुन्हा कधी, कुणामुळे सुरू झाले?

अमेरिकी भूमीवर म्हणजे फिलाडेल्फियात २८ जून १९१३ रोजी शेवटचा प्रथम श्रेणी क्रिकेट सामना खेळला गेला. फिलाडेल्फियात न्यूयॉर्कपेक्षाही अधिक संख्येने क्रिकेटप्रेमी राहात. तेथे क्रिकेट लोकप्रियही होते. पण पहिल्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर तेथील क्रिकेटही अस्ताला गेले. पुढे जवळपास ९० वर्षे अमेरिकी भूमीवर गंभीर स्वरूपाचे क्रिकेट खेळलेच गेले नाही. पुढे १९६५मध्ये तत्कालीन इम्पीरियल क्रिकेट कॉन्फरन्सचे नाव इंटरनॅशनल क्रिकेट कॉन्फरन्स असे बदलण्यात आले. क्रिकेटचे जागतिक परिचालन करणारी ही तत्कालीन संघटना. ब्रिटिश राष्ट्रकुलाबाहेरील देशांना सहयोगी सदस्य म्हणून सामावून घेण्याचा निर्णय त्यावेळी झाला, अमेरिका या सुरुवातीच्या सहयोगी देशांमध्ये होता. परंतु अमेरिकेने क्रिकेट विश्वात थोडीफार चमक एकविसाव्या शतकातच दाखवण्यास सुरुवात केली. आयसीसीच्या निधीमुळे आणि स्थलांतरितांच्या वाढत्या संख्येमुळे व उत्पन्नामुळे  अमेरिकेत क्रिकेटचा प्रसार झाला आणि आता तर अमेरिकेच्या सर्व ५० राज्यांमध्ये क्रिकेट खेळले जाते. 

सिलिकॉन व्हॅलीतील डॉलर्स…

अमेरिकेत आता क्रिकेट आर्थिकदृष्ट्या सक्षम बनले आहे. ते केवळ हौशी स्थलांतरितांपुरते मर्यादित राहिलेले नाही. तसेच केवळ आयसीसीच्या निधीवरही ते अवलंबून नाही. अमेरिकेत व्यावसायिक क्रिकेटच्या नाड्या सिलिकॉन व्हॅलीतील यशस्वी मंडळींच्या हाती आल्या आहेत. या मंडळींनी २०२१मध्ये मायनर लीग क्रिकेट स्पर्धा सुरू केली. २०२३मध्ये तिचे नामकरण अधिक अमेरिकन वाटावे असे म्हणजे मेजर लीग क्रिकेट (एमएलसी) असे झाले. मुंबई इंडियन्स, कोलकाता नाइट रायडर्स, चेन्नई सुपरकिंग्ज अशा आयपीएलमधील फ्रँचायझींचे संघ यात खेळतात, त्याचबरोबर मायक्रोसॉफ्टचे सत्या नडेला तसेच टेक्नॉलॉजी आणि व्हेंचर कॅपिटल क्षेत्रातील अनेक भारतीय वंशाचे तज्ज्ञ आणि उद्योजक इतर काही संघांचे मालक आहेत. अजून ही लीग पूर्ण भरात सुरू झाली असे म्हणता येत नाही. पण या सगळ्याच मंडळींनी कोट्यवधींची गुंतवणूक केली असून, अल्पावधीत ते किमान इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियातील फ्रँचायझी आधारित टी-२० लीगना मागे सोडतील असे बोलले जाते.   

अमेरिकेत क्रिकेट लोकप्रिय होईल?

ते आताच सांगणे अवघड आहे. याचे कारण अमेरिकेतील चार सर्वाधिक लोकप्रिय खेळ म्हणजे बास्केटबॉल, बेसबॉल, अमेरिकन फुटबॉल किंवा रग्बी आणि आइस हॉकी हे तेथे वर्षानुवर्षे खेळले जातात. त्याचबरोबर, या खेळांसाठी आवश्यक गुणवत्ता कॉलेजांमधून हेरली जाते. कॉलेज पातळीवरच तेथे व्यावसायिक खेळाडू घडवले जातात. पुढे त्यांच्या व्यावसायिक लीग अत्यंत सुसूत्रपणे चालवल्या जातात. या दोन्ही आघाड्यांवर क्रिकेटला अमेरिकेत अजून बरीच मजल मारायची आहे. १ जूनपासून सुरू होणाऱ्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेमुळे त्या दिशेने फार तर एखादे पाऊल टाकले जाईल. पण अमेरिकेने यापूर्वी वर्ल्डकपचे यजमान बनूनही फुटबॉलला फार प्रेमाने स्वीकारलेले नाही. टेनिस, अॅथलेटिक्स, जलतरण यांसारख्या खेळांना तेथे व्यावसायिक पातळीवर चार अमेरिकी खेळांप्रमाणे स्थान मिळू शकलेले नाही. तेव्हा क्रिकेटची वाटचाल किती खडतर आहे, याची झलक यातून मिळते. 

siddharth.khandekar@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: America played first international cricket match before 180 years print exp zws