Sarah Boardman Donald Trump Painting : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या कडक शैलीमुळे सर्वांनाच परिचित आहेत. रविवारी (तारीख २३ मार्च) त्यांची ही शैली पुन्हा एकदा दिसून आली. अमेरिकेतील कोलोरॅडोच्या स्टेट कॅपिटलमध्ये ट्रम्प यांचे पेंटिंग लावण्यात आले होते. या पेंटिंगकडे पाहून राष्ट्राध्यक्षांना राग अनावर झाला. त्यांनी हे चित्र रेखाटणाऱ्या कलाकार सारा बोर्डमन यांना खडेबोल सुनावले. इतकेच नाही तर सदरील पेंटिंग कार्यालयातून ताबडतोब काढून टाकण्यात यावे, असे आदेशही ट्रम्प यांनी दिले. दरम्यान, या पेटिंगमध्ये नेमकं काय होतं? ते नेमकं कोणी रेखाटलं होतं? यावरून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना राग अनावर का झाला? याबाबत जाणून घेऊ…

सारा बोर्डमन कोण आहेत?

सारा बोर्डमन एक ब्रिटीश वंशाच्या चित्रकार असून सध्या त्या अमेरिकेतील कोलोरॅडोमध्ये वास्तव्यास आहेत. २०१९ मध्ये सारा यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे चित्र रेखाटले होते. त्यानंतर ते कोलोरॅडोच्या स्टेट कॅपिटलमध्ये लावण्यात आले. सारा यांनी १९८५ साली जर्मनीमधून पेंटिंग काढण्याच्या कलेचं शिक्षण घेतलं आहे. त्यांनी तेराव्या ते एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंतच्या जुन्या मास्टर चित्रकारांनी वापरलेल्या तंत्रांचा अभ्यास केलेला आहे. जे बहुतेकदा शास्त्रीय परंपरा, वास्तववाद आणि चित्रकलेतील गुंतागुंतीच्या तपशिलांवर लक्ष केंद्रित करत असत. सारा यांच्या आत्मचरित्रात दिलेल्या माहितीनुसार, त्या मुख्यत: ऐतिहासिक आणि राजकीय व्यक्तिमत्त्वांची चित्र काढतात. त्यांचा पेंटिंगमध्ये वास्तववाद आणि विविध तंत्रांचा संगम असतो. सारा ह्या एखाद्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व, चारित्र्य आणि राहणीमान याचा अंदाज बांधून चित्र रेखाटण्याचा प्रयत्न करतात.

माजी राष्ट्राध्यक्षांची चित्रेही रेखाटली

राजकीय व्यक्तींचं ऐतिहासिक चित्र रेखाटण्याची कला सारा यांच्या अंगी आहे. आतापर्यंत त्यांनी अमेरिकेच्या पाच माजी राष्ट्राध्यक्षांचे चित्र रेखाटलं आहे. त्यामध्ये बराक ओबामा यांच्या चित्राचाही समावेश आहे. या चित्राचं स्वत: ट्रम्प यांनी ‘अद्भुत’ असं म्हणत कौतुक केलं आहे. डेन्व्हर स्टेटने आयोजित केलेली देशव्यापी चित्रकला स्पर्धा ‘कॉल फॉर आर्टिस्ट्स’ जिंकल्यानंतर सारा यांना पहिल्यांदा कोलोरॅडोच्या स्टेट कॅपिटलसाठी बराक ओबामा यांचे चित्र रेखाटण्याचे काम दिले होते. न्यूजवीकच्या वृत्तानुसार, २००३ मध्ये लॉरेन्स विल्यम्स यांच्या निधनानंतर त्यांना ही संधी देण्यात आली, ज्यांनी मागील सर्व ४३ राष्ट्रपतींचे चित्र रेखाटले होते.

आणखी वाचा : America Visa : डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्यानंतर किती भारतीयांना अमेरिकेचा व्हिसा मिळाला?

ट्रम्प यांनी स्वत:च्या पेंटिंगवर टीका का केली?

कोलोरॅडो येथील कलाकार सारा बोर्डमन यांनी काढलेल्या या पेंटिंगमध्ये डोनाल्ड ट्रम्प हे गडद रंगाचा सूट आणि लाल टाय घातलेले दिसून येतात. रविवारी ट्रम्प यांनी जेव्हा हे पेंटिंग बघितले, तेव्हा त्यांनी यावर संताप व्यक्त केला. ट्रूथ या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केलेल्या पोस्टमध्ये ट्रम्प म्हणाले, “कोणालाही स्वतःचा विद्रूप केलेला फोटो किंवा पेंटिंग आवडत नाही. कोलोरॅडो कॅपिटलमध्ये लावण्यात आलेले हे पेंटिंग जाणूनबुजून विद्रूप करण्यात आलेले आहे. यापूर्वी कदाचित मी असे पेंटिंग कधीही पाहिलेले नाही. सदरील पेंटिंग तातडीने कार्यालयातून हटवण्यात यावे, असे आदेश मी पोलिसांना दिले आहेत.”

‘पेंटिंगबाबत माझ्याकडे अनेकांच्या तक्रारी’

पुढे बोलताना ट्रम्प म्हणाले, “त्याच कलाकाराने (सारा बोर्डमन) माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचेही चित्र रेखाटले आहे, जे खूपच सुंदर आहे. परंतु, त्यांनी माझे काढलेले चित्र खरोखरच वाईट आहे. जसजसे त्यांचे वय वाढत आहे, तसतसे त्यांच्या अंगी असलेलं कौशल्यही कमी होत आहे. काहीही झाले तरी मला हे चित्र कार्यालयात ठेवलेले आवडणार नाही. ते तातडीने काढून टाकण्यात यावे, असे आदेश मी दिलेले आहेत. कोलोरॅडोमधील अनेक लोकांनादेखील हे चित्र आवडलेलं नाही. त्यांनी याबाबत माझ्याकडे फोन करून तक्रारी केल्या आहेत”, असंही ट्रम्प यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, या चित्रावरून ट्रम्प यांनी कोलोरॅडोचे डेमोक्रॅटिक गव्हर्नर जेरेड पोलिस यांनाही चांगलेच खडेबोल सुनावले आहेत.

ट्रम्प यांच्या टीकेनंतर सारा बोर्डमन काय म्हणाल्या?

डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या चित्रावरून संताप व्यक्त केल्यानंतर सारा बोर्डमन यांनी यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, २०१८ मध्ये त्यांनी हे चित्र रेखाटताना ट्रम्प यांचे वर्णन गंभीर, विचारशील, संघर्षमय व्यक्ती असं केलं होतं. बोर्डमन यांनी कॅपिटल बिल्डिंग सल्लागार समितीकडे ट्रम्प यांची दोन वेगवेगळी चित्रे सादर केली होती. यातील दुसऱ्या चित्रामध्ये ट्रम्प यांचा हसरा चेहरा दाखवण्यात आला होता. मात्र, समितीने ट्रम्प यांच्या गंभीर आणि विचारशील चित्रालाच प्राधान्य देण्याचं ठरवलं.

ट्रम्प यांचं चित्र रेखाटताना सारा काय म्हणाल्या होत्या

२०१९ मध्ये कोलोरॅडो पोल्सच्या एका पत्रकाराने सारा बोर्डमन यांना विचारलं होतं की, ट्रम्प यांचे चित्र रेखाटल्यानंतर तुमचा त्यांच्याकडे (डोनाल्ड ट्रम्प) बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे का? यावर उत्तर देताना सारा म्हणाल्या, “अजिबात नाही, जेव्हा मी चित्र रंगवायला सुरुवात करते, तेव्हा माझा त्या व्यक्तीकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन रहात नाही. माझ्या प्रशिक्षणानुसार एखाद्या व्यक्तीचे चित्र रेखाटताना त्या व्यक्तीविषयी आपल्या भावना स्टुडिओच्या बाहेरच ठेवायला हव्या.”

हेही वाचा : अनैतिक संबंध, घरगुती वाद आणि मुलाचे अपहरण; पत्नीवर आरोप करणारे उद्योजक प्रसन्ना कोण आहेत?

डोनाल्ड ट्रम्प यांच्याविषयी आदर : सारा बोर्डमन

दरम्यान, ट्रम्प यांचे चित्र प्रदर्शित झाल्यानंतर त्यावर आक्षेप घेणाऱ्यांना तुम्ही काय उत्तर देणार, असा प्रश्नही सारा यांना त्यावेळी विचारण्यात आला. त्यावर बोलताना, मी प्रत्येकाच्या मनाचा आदर करते. आतापर्यंत मी अमेरिकेच्या पाच राष्ट्राध्यक्षांची चित्रे रेखाटलेली आणि रंगवलेली आहेत. ती कोलोरॅडो कॅपिटलच्या गॅलरीमध्ये लावण्यात आलेली आहेत. पेंटिंग ही एक अशी कला आहे, ज्याकडे प्रत्येकाचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो. अमेरिकेच्या प्रत्येक राष्ट्राध्यक्षांविषयी माझ्या मनात नेहमीच आदर राहिलेला आहे. बराक ओबामा यांचे चित्र जसं अमेरिकन नागरिकांना आवडलं आहे, तसंच ट्रम्प यांचेही चित्र आवडेल, असं उत्तर सारा बोर्डमन यांनी दिलं होतं.

ट्रम्प यांच्या या निर्णयाचं अमेरिकेत कौतुक

अमेरिकेच्या राष्ट्राध्यपदाची शपथ घेतल्यानंतर ट्रम्प कोणत्या ना कोणत्या कारणावरून सातत्याने चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी एका १३ वर्षीय मुलाची अमेरिकेच्या गुप्तहेर सेवा एजंटपदी नियुक्ती केली होती. डीजे डॅनियल्स असे या मुलाचे नाव आहे. तो अमेरिकेतील सर्वात तरुण गुप्तहेर एजंट झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार लहानपणापासूनच डीजेला पोलिस अधिकारी होण्याची आवड होती. त्यासाठी त्याने अभ्यासाला सुरुवातही केली. मात्र, २०१८ मध्ये त्याला दुर्मीळ कर्करोगाची लागण झाली. डीजे हा पुढील पाच महिनेही जगू शकणार नाही, असं डॉक्टरांनी त्याच्या आई-वडिलांना सांगितलं. डोनाल्ड ट्रप यांना जेव्हा या प्रकरणाची माहिती मिळाली, तेव्हा त्यांनी डॅनियल कुटुंबीयांशी फोनवरून संवाद साधला. इतकंच नाही तर त्यांनी डीजेच्या स्वप्नाबद्दलही जाणून घेतलं. ५ फेब्रुवारीला अमेरिकन संसदेच्या (काँग्रेस) संयुक्त अधिवेशनाला संबोधित करताना ट्रम्प यांनी डीजे डॅनियल्सची अमेरिकेच्या गुप्तहेर सेवा एजंटपदी नियुक्ती केली.