पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जिम्नॅस्टिक्स प्रकारात अमेरिकेच्या महिला संघाने सुवर्णपदक मिळवले. अमेरिकेसाठी ऑलिम्पिक सुवर्णपदक ही अभिमानाची गोष्ट असली तरी नवलाईची बाब नाही. मग सिमोन बाइल्सच्या नेतृत्वात महिला संघाने मिळवलेल्या जिम्नॅस्टिक्स सुवर्णचे इतके अप्रुप का आहे?
सिमोन बाइल्सची कारकीर्द
सिमोन बाइल्स ही अमेरिकेची जिमनॅस्ट आहे. जिम्नॅस्टिक्समध्ये तिने प्रावीण्य मिळवले आहे. या क्रीडाप्रकारात तिने बुधवारी आणखी एक पदक मिळवण्यापूर्वी आठ ऑलिम्पिक पदके आणि ३० जागतिक पदके मिळवली आहेत. आठ ऑलिम्पिक पदकांमध्ये पाच सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्य पदके आहेत. तर जागतिक चॅम्पियनशीप स्पर्धांमधील ३० पदकांमध्ये तब्बल २३ सुवर्ण, चार रौप्य आणि दोन कांस्य पदकांचा समावेश आहे. सिमोन २०१३मध्ये प्रसिद्धीझोतात आली. त्यावर्षी, वयाच्या अवघ्या १६व्या वर्षी तिने दोन विश्व चॅम्पियनशीप सुवर्णपदके पटकावली. त्यामध्ये ऑल-अराउंड पुरस्काराचाही समावेश होता. पुढील वर्षी विश्वस्पर्धेमध्ये चार आणि २०१५मध्ये अन्य स्पर्धांमध्ये आणि चार सुवर्णपदके जिंकली. बाइल्स पहिल्यांदा २०१६च्या रियो ऑलिम्पिक स्पर्धेत उतरली तेव्हा ती आधीच जागतिक विजेती झाली होती. स्पर्धेतील सुपरस्टार खेळाडूंमध्ये तिची गणना होत होती. रियो ऑलिम्पिकमध्ये तिने ऑल-अराउंड, टीम, व्हॉल्ट अँड फ्लोअर या प्रकारांमध्ये सुवर्ण तर बिममध्ये कांस्य पदक जिंकले होते.
हेही वाचा : विश्लेषण: दोन सागरी ड्रोन नि एक क्षेपणास्त्र… युक्रेनने बलाढ्य रशियन नौदलास कसे आणले जेरीस?
टोक्यो ऑलिम्पिकमध्ये काय झाले होते?
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेची तयारी सुरू असताना दिलेल्या मुलाखतींमध्ये सिमोनने विस्ताराने टोक्योचे अनुभव कथन केले होते. तिने सांगितले की, ‘ट्विस्टीज’मुळे तिचे मानसिक स्वास्थ्य हरवले होते. आपण चांगली कामगिरी करू शकणार नाही अशी तिला सतत शंका वाटत होती. तिला आपल्या शरीराची आणि मनाचीही काळजी वाटत होती. अखेर तिने अनेक स्पर्धा प्रकारांमधून माघार घेतली. अमेरिकेच्या संघाला त्यावेळी रौप्य पदकावर समाधान मानावे लागले होते. टोक्योनंतर सिमोनने आपले पूर्ण लक्ष मानसिक आरोग्यवर केंद्रित केले. एखाद्या दिवशी सकाळी उठून आपल्याला नेहमी सवय असलेली कार चालवताच येत नाही असे कळते तेव्हा काय वाटेल, तसे मला तेव्हा वाटत होते अशा शब्दांमध्ये तिने आपल्या व्यथा व्यक्त केल्या होत्या.
ट्विस्टीज म्हणजे काय?
क्लिव्हलँड क्लिनिकने ट्विस्टीजची व्याख्या पुढीलप्रमाणे केली आहे : “ट्विस्टीज म्हणजे एक प्रकारचा धोकादायक मानसिक अडथळा. त्यामध्ये जिम्नॅस्ट हवेत असताना तिचे शरीर आणि मन यामधील दुवा काही क्षण नाहीसा होतो.” क्लिव्हलँड क्लिनिकचे क्रीडा मानसोपचारतज्ज्ञ मॅथ्यू सॅको सांगतात की, मेंदू आणि शरीरामध्ये कार्यक्षम संवाद होईनासा होतो. अशा वेळी जिम्नॅस्टला आपण अवकाशात तरंगत असल्याचा भास होतो, प्रत्यक्षात त्यांचे शरीर काही क्षणच हवेत असते. या प्रकाराला ट्विस्टीज म्हणतात आणि त्याचे निरनिराळे स्तर असू शकतात. कधीकधी खेळ संपला की ते झटकून टाकणे जिम्नॅस्टला शक्य होते. तर कधी ते जोमाने उसळते आणि काही दिवस, काही आठवडे, अगदी काही महिन्यांपर्यंत टिकून राहते. त्याच्या जोडीला असणाऱ्या चिंतेमुळे ही समस्या अधिक गुंतागुंतीची होते.
ट्विस्टीजचे कारण
शंका, तणाव, परिपूर्णतेचा ध्यास – विशेषतः सर्वोच्च पातळीची स्पर्धा असताना – यापैकी सर्व बाबी थोड्या प्रमाणात किंवा कोणतीही बाब कारणीभूत असू शकते असे सॅको सांगतात. जिम्नॅस्टिक्ससह डायव्हिंग, मार्शल आर्ट्स, विविध प्रकारच्या उड्या या क्रीडाप्रकारांमध्येही खेळाडूंना ट्विस्टीजचा अनुभव येऊ शकतो. जिम्नॅशियममध्ये खेळाडूला हवेत असताना पुन्हा सुरक्षितपणे जमिनीवर येण्यासाठी त्याविषयी समज, जाण असणे आवश्यक असते.
ट्विस्टीजवर मात करता येते का, कशी?
ट्विस्टीजवर मात करण्याचे अनेक भिन्न उपाय आहेत. जिम्नॅस्टिक्सच्या सर्वात मूलभूत तंत्र आणि कौशल्याकडे परत जाणे हा सर्वात योग्य उपाय असल्याचे सॅको सुचवतात. किंवा, ॲथलीटना ज्या कौशल्यावर संपूर्ण विश्वास आहे त्यावर लक्ष केंद्रित करावे. हवेतून जमिनीवर आल्यावर सुरक्षित राहण्यासाठी फोम पिटचा वापर करण्याचाही सल्ला दिला जातो. त्यामुळे जखमी होण्याची भीती न वाटता काही चिंता दूर करता येतात. त्याशिवाय तणाव कमी करण्यासाठी रिलॅक्सेशन तंत्र, श्वसनाचे तंत्र, रुटिनमध्ये बदल, काही वेळ जिम्नॅस्टिक्सला विश्रांती देणे, मानसिक आरोग्यासाठी व्यावसायिक मदत घेणे यासारख्या साधनांचाही वापर करता येतो. ट्विस्टीजवर मात करण्यासाठी काही वेळ लागतोच असे जिम्नॅस्ट सांगतात.
हेही वाचा : विश्लेषण: ‘निर्वासितांचा ऑलिम्पिक संघ’ ही संकल्पना काय आहे?
ट्विस्टीजनंतर सिमोनमधील बदल
मागील वर्षी सिमोनने सांगितले की, आता माझी यशाची व्याख्या बदलली आहे. पूर्वी मी ज्या गोष्टींना यश मानत होते, तसे आता राहिलेले नाही. आता केवळ स्पर्धेत भाग घेणे, डोके ताळ्यावर ठेवून खेळणे, त्याचा आनंद लुटणे आणि जे परिणामांची चिंता न करणे यालाच मी यश मानते. कदाचित यामुळेच तिने बुधवारी सहजपणे २४वे सुवर्णपदक पटकावले. यापूर्वी ॲथलीट शॅनॉन मिलरने १९९२च्या बार्सिलोना आणि १९९६च्या अटलांटा ऑलिम्पिक स्पर्धेत मिळून ८ पदके मिळवली आहेत. तो आकडा सिमोनने पार केला आहे. मात्र, आता पदकाचा रंग किंवा त्याची संख्या याचा मला फार फरक पडत नाही असे तिचे म्हणणे आहे.
nima.patil@expressindia.com