America vs China Trade War : अमेरिकेकडे असलेल्या अण्वस्त्रांची नेहमीच चर्चा होत असते. अणुबॉम्बमुळे होणाऱ्या विध्वंसाची जगभरातील देशांना भीती वाटत आली आहे. त्यातच आता अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या एका निर्णयामुळे संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेची धूळधाण होण्याची शक्यता आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक देशांवर अतिरिक्त आयात शुल्कांचं अस्त्र डागलं आहे. एकीकडे या आयात शुल्कावरून काही देशांनी मौन बाळगलं असताना दुसरीकडे चीनने मात्र अमेरिकेला जशास तसं उत्तर दिलं आहे. जेवढं आयात शुल्क अमेरिकेने चिनी वस्तूंवर लादलं, तेवढंच आयात शुल्क चीननं अमेरिकन वस्तूंवर लादलं आहे. जगातील पहिल्या दोन क्रमांकांच्या अर्थव्यवस्था असलेले हे दोन्ही देश एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. दरम्यान, चीनने अमेरिकेबरोबरच्या टॅरिफ युद्धातून माघार का घेतली नाही? याबाबत जाणून घेऊ…

चीन-अमेरिका टॅरिफ युद्ध कसे सुरू झाले?

चीन हा जगातील सर्वात मोठा वस्तुनिर्माता देश म्हणून ओळखला जातो. लहान मुलांच्या खेळण्यांपासून ते आयटी क्षेत्रापर्यंतच्या सर्वच वस्तू चीनमध्ये तयार होतात. दुसरीकडे अमेरिकेची बाजारपेठ ही सर्वात मोठी मानली जाते, त्यामुळे चिनी वस्तूंवरील किमती दुपटीने वाढवणे अमेरिकेसाठी सोपी बाब नाही; तर चीनलाही अमेरिकेसारखी सर्वात मोठी बाजारपेठ गमावणे परवडणारे नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिल्यांदा राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतरही अमेरिकेत आयात होणाऱ्या चिनी वस्तूंवर मोठ्या प्रमाणात आयात शुल्क लादलं होतं. त्यावेळी चीनने संयमाची भूमिका घेत अमेरिकेला प्रत्युत्तर दिलं नव्हतं.

चीनचे अमेरिकेला जशास तसं उत्तर

डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी जगभरातील अनेक देशांवर अतिरिक्त आयात शुल्क लादण्याचा निर्णय घेतला. त्यांनी चिनी वस्तूंवर तब्बल १४५ टक्क्यांपर्यंत आयातशुल्क लादण्याची घोषणा केली. यावेळी मात्र चीनचा संयम सुटला आणि शुक्रवारी बीजिंगने अमेरिकेवर जोरदार हल्लाबोल केला. ट्रम्प यांच्या धोरणाची खिल्ली उडवत चीनने देशात आयात होणाऱ्या अमेरिकन वस्तूंवरील कर १२५ टक्क्यांपर्यंत वाढवले. सीएनएनच्या वृत्तानुसार, अमेरिकेने या आठवड्यात प्रथम चिनी वस्तूंवर ५४ टक्के शुल्क लादण्याचा निर्णय घेतला होता, नंतर त्यात दोन टप्प्यात १४५ टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली.

आणखी वाचा : डॉक्टरांच्या एका चुकीमुळे महिलेने दिला अनोळखी व्यक्तीच्या बाळाला जन्म; आता कायदेशीर पेच कोणता?

ट्रम्प यांनी चीनला मुदत का दिली नाही?

चीनने सुरुवातीला अमेरिकेवर ३४ टक्के आयात शुल्क लादण्याची घोषणा केली होती. पण. अमेरिकेने चिनी वस्तूंवरील कर १४५ टक्क्यांपर्यंत वाढवल्याने चीननेही अमेरिकेवर ८४ टक्के टॅरिफची घोषणा केली. विशेष बाब म्हणजे, ट्रम्प यांनी आपल्या धोरणाबाबत इतर देशांना ९० दिवसांचा दिलासा दिला, मात्र चीनबाबत त्यांनी कोणतेही धोरण बदलले नाही. अमेरिकेने स्वत:हून आम्हाला आव्हान दिल्यानंतर आम्हीही आता मागे हटणार नाही, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान यांनी ‘द टेलिग्राफ’शी बोलताना सांगितले.

‘चीन तसूभर मागे हटणार नाही’

अमेरिकेने चीनवर लादलेले अतिरिक्त आयात शुल्क हे आंतरराष्ट्रीय आर्थिक व व्यापार नियमांचं उल्लंघन आहे. ते केवळ एकतर्फी गुंडगिरी आणि जबरदस्तीचे कृत्य आहे,” असे चीनच्या अर्थ मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले. ट्रम्प हे असेच करत राहिले तर चीनही तसूभर मागे हटणार नाही, असेही बीजिंगने ठामपणे सांगितले. “अमेरिकेने आणखी जास्त शुल्क लादणे सुरू ठेवले तर त्याचे कोणतेही आर्थिक महत्त्व राहणार नाही. जगाच्या आर्थिक इतिहासात ‘विनोद’ म्हणून त्याकडे पाहिले जाईल”, असे चीनच्या सीमाशुल्क आयोगाने म्हटले आहे. अमेरिकेच्या दडपशाहीला एकत्रितपणे प्रतिकार करण्याचे आवाहन चीनने युरोपिय संघटनेला केले.

चीनच्या अध्यक्षांचा अमेरिकेला इशारा

डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन वगळता युरोपिय संघटना, भारत आणि इतर अनेक देशांवर लादलेला कर मागे घेतला असला तरी अमेरिकेच्या दडपशाहीविरोधात चीन आणि युरोपिय संघटनेने एकत्र येण्याची गरज असल्याचे चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी शुक्रवारी सांगितले. चीन आणि २७ सदस्यीय गटाने आर्थिक जागतिकीकरण आणि आंतरराष्ट्रीय व्यापार वातावरणाचे रक्षण करण्यासाठी एकत्र काम केले पाहिजे आणि एकतर्फी दडपशाहीचा संयुक्तपणे प्रतिकार केला पाहिजे, असे ते म्हणाले. व्यापारयुद्धात कोणीही विजेता ठरणार नाही. मात्र, जगाविरुद्ध जाण्याच्या निर्णयामुळे स्वत: जगापासून तुटले जाल, असा इशाराही जिनपिंग यांनी अमेरिकेला दिला. अमेरिका चीनच्या हितसंबंधांना मोठ्या प्रमाणात कमकुवत करत राहिली तर बीजिंग कठोर प्रतिकारात्मक उपाययोजना करेल आणि शेवटपर्यंत लढेल, असंही ते म्हणाले.

चीन माघार का घेत नाहीये?

अमेरिकेबरोबरच्या टॅरिफ युद्धातून चीनने माघार न घेण्याची अनेक कारणं आहेत. यातील पहिले कारण म्हणजे, अमेरिका चिनी वस्तूंवर जास्त अवलंबून आहे. द गार्डियनच्या मते, चीनमध्ये तयार होणाऱ्या अनेक वस्तू, जसे स्मार्टफोन, संगणक, खेळण्यांची अमेरिकेला आवश्यकता असते. रोझेनब्लॅट सिक्युरिटीजच्या विश्लेषकांनी असा अंदाज लावलाय की, ट्रम्प यांच्या धोरणामुळे अमेरिकेतील सर्वात स्वस्त आयफोनची किंमत ७९९ डॉलर्सवरून एक हजार १४२ डॉलरपर्यंत वाढेल. या आर्थिक अडचणींसाठी ट्रम्प चीनला दोषी ठरवू शकत नाहीत, असं मुख्य अर्थशास्त्रज्ञ डायना चोयलेवा यांनी ‘द गार्डियन’ला सांगितले.

चीनचा कॉन्फिडन्स कशामुळे वाढला?

दुसरीकडे चीनला अमेरिकेकडून सोयाबीन, जीवाश्म इंधन आणि जेट इंजिन यांसारखे औद्योगिक आणि उत्पादन साहित्य मिळते. चीन या संघर्षासाठी पूर्णपणे तयार असल्याचे दिसून येते. द गार्डियनच्या मते, २०१८ पासून चीनने इतर राष्ट्रांसोबत व्यापार वाढवला आहे. २०१८ ते २०२० दरम्यान चीनने ब्राझीलच्या सोयाबीनची आयात ४५ टक्क्यांहून अधिक वाढवली आहे. याच कालावधीत अमेरिकेच्या निर्यातीत ३८ टक्क्यांनी घट झाली आहे. अमेरिकेच्या कृषी मालासाठी चीन हा सर्वात मोठा बाजार असला तरी तो पूर्वीइतका मोठा नाही. २०२४ मध्ये अमेरिकेने चीनला २९.२५ अब्ज डॉलर्सची कृषी उत्पादने पाठवली होती. २०२२ मध्ये हा आकडा ४२.८ अब्ज डॉलर्स होता.

हेही वाचा : औरंगजेबाचा वंशज असल्याचे सांगून ताजमहालावर दावा; कोण आहेत याकूब तुसी?

‘अमेरिकेला उत्तर देण्यासाठी चीन तयार’

अमेरिकेच्या आक्रमकतेला शरण जाऊ नये म्हणून चीन कदाचित वेदना सहन करण्यास तयार असेल, असे वॉशिंग्टन डीसीतील पीटरसन इन्स्टिट्यूटमधील अमेरिका-चीन व्यापारतज्ज्ञ मेरी लवली यांनी बीबीसीला सांगितले. चिनी सरकारी माध्यमे आधीच शी यांच्या पाठीमागे ठामपणे उभी आहेत, असेही त्या म्हणाल्या. “अमेरिकेच्या आयात शुल्काला जशास तसेच उत्तर देण्यासाठी आम्ही तयार आहोत. आमच्याकडे त्यासंदर्भातील रणनीती आहे. आम्ही आठ वर्षांपासून अमेरिकेसोबत व्यापार युद्धात सहभागी आहोत, या संघर्षांमध्ये समृद्ध अनुभव जमा केला आहे,” असे पीपल्स डेलीमधील एका लेखात म्हटले आहे.

अमेरिका-चीन टॅरिफ युद्धाबाबत तज्ज्ञ काय म्हणतात?

अमेरिका-चीन टॅरिफ युद्धाबाबत तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, बीजिंग हार मानण्याच्या मनस्थितीत नाही. “चीन एकतर्फीपणे शुल्क मागे घेईल आणि ते रद्द करेल असा विचार करणे चूक ठरेल,” असे ‘द कॉन्फरन्स बोर्ड’ या थिंक टँकमधील चायना सेंटरचे वरिष्ठ सल्लागार अल्फ्रेडो मोंटुफर-हेलू यांनी बीबीसीला सांगितले. जगातील दोन सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमधील विलगीकरण सुरू झाले आहे, असेही ते म्हणाले. “ट्रम्प यांच्या या धोरणामुळे केवळ चीनच कमकुवत होणार नाही, तर अमेरिकेची आर्थिक परिस्थितीही गंभीर होईल. आपण आता अशा टप्प्यावर पोहोचलो आहोत, जिथून दीर्घकालीन आर्थिक वेदना संभवतात,” असं निरीक्षण द कॉन्फरन्स बोर्डच्या चायना सेंटरमधील तज्ज्ञांनी नोंदवलं आहे.

अमेरिका-चीन संबंध आणखी ताणणार?

आयात शुल्काच्या अमेरिका-चीन संबंधांवर होणाऱ्या परिणामाबद्दल, एशिया सोसायटी पॉलिसी इन्स्टिट्यूटच्या उपाध्यक्ष वेंडी कटलर यांनी बीबीसीला सांगितले, “दोन्ही देशांमध्ये कित्येक वर्षांपासून संबंध आधीच ताणलेले आहेत, त्यात सुधारणा होण्याआधीच परिस्थिती आणखी बिघडत चालली आहे. अमेरिका या संदर्भात चर्चा करण्यासाठी चीनला राजी करू शकेल, याबद्दल माझ्या मनात शंका आहे. कारण चीन चर्चेसाठी जरी तयार झाला, तरी ते अमेरिकन लोकांसाठी खूप ‘कठीण’ ठरणार आहे.” दरम्यान, चीन आणि अमेरिका या दोन्ही देशांमध्ये सुरू असलेले टॅरिफ युद्ध नेमकं कोणत्या वळणावर येऊन थांबणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.