Invasive Animals in America : यूएस फिश अँड वाइल्डलाइफ संस्था (FWS) अमेरिकन लोकांना काही आक्रमक प्रजातींचे मांस खाण्यासाठी प्रोत्साहित करत आहे, ज्यामध्ये महाकाय उंदीर, जंगली डुक्करांसह इतर प्राण्यांचाही समावेश आहे. एका फेसबुक पोस्टमध्ये संस्थेनं लोकांना न्यूट्रियाची शिकार करण्याचे आणि त्याला शिजवून खाण्याचे आवाहन केले आहे. न्यूट्रिया हा एका मोठ्या उंदरासारखा दिसणारा प्राणी आहे. ज्याला ओरेगॉनमध्ये आक्रमक प्रजातीचा प्राणी म्हणून ओळखले जाते. हा प्राणी दिसला की त्याची शिकार करावी, असं संस्थेनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, वाइल्डलाइफ संस्था अमेरिकन लोकांना उंदीर आणि डुक्कर खाण्याचे आवाहन का करत आहे, यामागचे नेमके कारण काय हे सविस्तर जाणून घेऊ. “जंगलातील आक्रमक प्रजाती स्थानिक वन्यजीवांना मागे टाकतात. त्यांचा अधिवास नष्ट करतात आणि परिसंस्थांनाही हानी पोहोचवतात. त्यांच्याबद्दल तक्रार करण्याऐवजी त्यांची शिकार करून शिजवून खावे”, असे आवाहन संस्थेने केले आहे.

आक्रमक प्रजाती म्हणजे काय?

राष्ट्रीय महासागरीय आणि वातावरणीय प्रशासन (NOAA) नुसार, आक्रमक प्रजाती म्हणजे, असा जीव जो पर्यावरणीय संतुलनात व्यत्यय आणतो. या प्रजातींकडून अशा भागाचे नुकसान केले जाते, जिथे त्या नैसर्गिकरित्या आढळून येत नाहीत. नैसर्गिक परिसंस्थांना या प्रजातीकडून धोका निर्माण केला जातो. ज्यामुळे त्या संसाधनांवर अवलंबून असलेल्या मानवी क्रियाकलापांवरही परिणाम होतो. आक्रमक प्रजाती वनस्पती आणि प्राण्यांना नामशेष करून जैवविविधतेला हानी पोहोचवतात. इतर प्राण्यांचा अधिवास बदलल्याने पर्यावरणावर दीर्घकालीन परिणाम होण्याचा धोका निर्माण होतो.

यूएस फिश आणि वाइल्डलाइफ सर्व्हिसने आक्रमक प्रजातींची शिकार करून त्यांना शिजवून खावे, असा सल्ला नागरिकांना दिला आहे. त्यामागचे कारण म्हणजे गेल्या काही वर्षांपासून अमेरिकेत आक्रमक प्रजातींच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यांच्या संख्येवर नियंत्रण मिळवता यावं म्हणून वाइल्डलाइफ सर्व्हिसने या मार्गाचा वापर केला आहे. या प्रजाती परिसंस्थेला विस्कळीत करतात आणि त्यांना खाणे हा स्थानिक वन्यजीवांचे संरक्षण करण्याचा एक मार्ग आहे, असे संस्थेने म्हटले आहे. आक्रमक प्रजातींवर नियंत्रण मिळविण्यासाठी त्यांचा नायनाट करणे गरजेचं आहे असंही ते म्हणाले. दरम्यान, संस्थेच्या यादीत नेमक्या कोणत्या प्रजाती आहेत ते पाहूयात.

आक्रमक प्रजातींमध्ये कोणकोणते प्राणी?

न्यूट्रिया (Nutria) हा एक मोठा उंदरासारखा प्राणी आहे, जो प्रामुख्याने दक्षिण अमेरिकेत आढळतो, पण आता तो जगभरातील इतर ठिकाणी विशेषत: अमेरिका, युरोप आणि आशियामध्येदेखील आढळतो. न्यूट्रियाला ओरेगॉनसारख्या राज्यांमध्ये एक आक्रमक प्रजाती म्हणून ओळखलं जातं. कारण या प्राण्याकडून स्थानिक पर्यावरणाला हानी होण्याची शक्यता आहे. दलदलीच्या आणि जलस्रोतांमध्ये न्यूट्रियाची संख्या मोठ्या प्रमाणात आढळून येते. त्याच्या खाण्याच्या आणि वावरण्याच्या पद्धतीमुळे स्थानिक वनस्पती आणि प्राणी विलुप्त होऊ शकतात. दक्षिण अमेरिकेतील ही मूळ प्रजाती अमेरिकेच्या आखाती किनाऱ्यावर (पूर्वी मेक्सिकोचे आखात) तसेच अटलांटिक किनाऱ्यावर आणि पॅसिफिक वायव्येकडे आक्रमक होत चालली आहे.

ज्यांना न्यूट्रिया हा प्राणी खाण्याची आवड आहे, त्यांनी गम्बो रेसिपी वापरून पाहावी, असा सल्ला संस्थेने दिला आहे. न्यूट्रियाचे मांस पातळ, सौम्य आणि सशाच्या मांसासारखे चविष्ट आहे, असंही संस्थेनं म्हटलं आहे. लुईझियाना वन्यजीव आणि मत्स्यव्यवसाय विभागाच्या अंदाजानुसार, “न्यूट्रियाने राज्यातील १,०२,५८५ एकर जमिनीचे नुकसान केले आहे. हे उंदीर दररोज त्यांच्या शरीराच्या वजनाच्या एक चतुर्थांश वनस्पती खाऊ शकतात. त्यांच्या आकारापेक्षा ते दहापट क्षेत्र नष्ट करतात.”

ग्रीन इगुआना (Green Iguana)

संस्थेने आक्रमक प्रजातींच्या यादीत नमूद केलेली आणखी एक प्रजाती म्हणजे ग्रीन इगुआना. हिरव्या रंगाचा हा प्राणी साधारणत: पाच-सहा फूट लांब आणि पाच-सहा किलो वजनाचा असतो. ग्रीन इगुआना हा प्रामुख्याने मध्य आणि दक्षिण अमेरिकेत आढळतो. उष्णकटिबंधीय प्रदेशात जलाशय, नदीकिनारे आणि दलदलीच्या प्रदेशात या प्राण्याची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. आक्रमक प्रजाती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्रीन इगुआनाची प्रजनन क्षमता मोठी आहे. स्थानिक वनस्पती आणि लहान प्राणी नष्ट करण्याचे काम या प्रजाती करतात, त्यामुळेच त्यांच्यावर नियंत्रण मिळवणे आवश्यक असल्याचं अमेरिकन संस्थेनं म्हटलं आहे. ग्रीन इगुआनाच्या मांसाची चव चिकनसारखी असल्याचं सांगितलं जातं.

उत्तरी स्नेकहेड मासा

या यादीत समाविष्ट असलेला आणखी एक आक्रमक प्राणी म्हणजे उत्तरी स्नेकहेड मासा, ज्याला वैज्ञानिकदृष्ट्या चन्ना आर्गस म्हणूनही ओळखले जाते. यूएस फिश आणि वाइल्डलाइफ सर्व्हिसच्या मते, या माशांची श्वास घेण्याची क्षमता मोठी असते. त्यामुळेच ते पाणी नसलेल्या भागातही बरेच दिवस जिवंत राहू शकतात. माशांची ही प्रजाती प्रामुख्याने पूर्व आशियामध्ये आढळते. मात्र, आता त्यांची मध्य-अटलांटिक आणि आग्नेय अमेरिकेच्या जलमार्गांमध्ये राहणारी आक्रमक प्रजाती म्हणून ओळख झाली आहे. अन्न आणि अधिवासासाठी स्पर्धा करून स्नेकहेड मासे स्थानिक प्रजातींसाठी धोका निर्माण करतात. अमेरिकेच्या भूगर्भीय सर्वेक्षणाने चिंता व्यक्त केली की, हे मासे स्थानिक प्रजातींचा नायनाट करून पर्यावरणाला हानी पोहोचवतात. तसेच ते शिकारी माशांचीही शिकार करून त्यांना खाऊन टाकतात.

आक्रमक कार्प मासे

आक्रमक कार्प (Invasive Carp) म्हणजे कार्प माशांच्या त्या प्रजाती, ज्यांनी स्थानिक जलस्रोतांमध्ये आक्रमक पद्धतीने प्रवेश केला आहे. माशांच्या या प्रजातीमुळे पर्यावरणावर नकारात्मक प्रभाव पडत आहे. या माशांमध्ये बिगहेड कार्प, सिल्व्हर कार्प, ब्लॅक कार्प आणि ग्रास कार्प यांचा समावेश आहे. यूएस फिश आणि वाइल्डलाइफ सर्व्हिसच्या मते, पूर्व आशियातील मूळचे हे मासे आता मध्य-पश्चिम आणि आग्नेय भागातील अनेक नद्या आणि तलावांमध्ये पसरलेले आहेत. पाण्यात उंच उडी मारणारे हे मासे अमेरिकेच्या जलमार्गांना अडवत आहेत आणि स्थानिक प्रजातींना धोक्यात आणत आहेत, असे संस्थेने म्हटले आहे. माशांच्या या प्रजाती नष्ट करणे गरजेचे असून ते खाण्यासाठी चविष्ट असतात, असा दावाही संस्थेने केला आहे.

रानडुक्कर

आक्रमक प्राण्यांच्या यादीत शेवटचे नाव जंगली डुकराचे आहे, ज्याला रानडुक्कर म्हणूनही ओळखले जाते. यूएस फिश आणि वाइल्डलाइफ सर्व्हिसच्या म्हणण्यानुसार, मूळचे युरोप आणि आशियातील हे प्राणी आग्नेय अमेरिका, टेक्सास, कॅलिफोर्निया आणि इतर भागांत आक्रमक झाले आहेत. “ते केवळ आक्रमक नाहीत, तर पर्यावरणावरील संकट आहेत”, असा इशाराही संस्थेने दिला आहे. “ही डुक्कर देशभरातील शेती, जंगले आणि पाणथळ जागा उद्ध्वस्त करीत आहेत, त्यांच्या मार्गातील येणाऱ्या सर्व पिकांना ते मुळापासून उखडून फेकत आहेत. या डुकरांमुळे शेतीपिकांचं मोठं नुकसान होत असल्याने त्यांच्या संख्येवर नियंत्रण मिळवणं आवश्यक आहे. रानडुकरांचे मांस खाण्यासाठी खूपच चविष्ट असते, असा दावाही संस्थेने केला आहे.