अमोल परांजपे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यघटनेच्या किचकट खाचाखोचा माहिती असलेली, अत्यंत क्लिष्ट पद्धतीने कायद्याचा कीस पाडणारी एखादी व्यक्ती क्वचितच प्रसिद्धीच्या झोतात येते. अमेरिकेतील ज्येष्ठ विधिज्ञ केनेथ स्टार यांच्या नशिबात हा योग होता. अत्यंत गाजलेले ‘मोनिका ल्युइन्स्की प्रकरण’ जगासमोर आणल्यामुळे ते नावाप्रमाणेच ‘स्टार’ झाले. शस्त्रक्रियेनंतर निर्माण झालेल्या समस्यांमुळे केनेथ स्टार यांचे नुकतेच निधन झाले. अमेरिकेच्या एक नव्हे, तर दोन राष्ट्राध्यक्षांशी वकील या नात्याने त्यांचा संबंध आला. पण ते जगभरात प्रसिद्ध झाले ते बिल क्लिंटन यांची त्यांनी मोनिका ल्युइन्स्की प्रकरणात केलेल्या सखोल आणि वादग्रस्त उलटतपासणीमुळे…

व्हाईटवॉटर आणि मोनिका ल्युइन्स्की प्रकरण काय आहे?

१९९२च्या अध्यक्षीय निवडणूक प्रचारावेळी, अर्कान्सास राज्याचे गव्हर्नर असताना बिल क्लिंटन आणि हिलरी यांनी व्हाईटवॉटर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमध्ये गुंतवणूक केली. यामध्ये मोठी अनियमितता आढळून आल्यानंतर विधिज्ञ केनेथ स्टार यांची तीन न्यायाधीशांच्या पीठाने विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक केली. या प्रकरणाची चौकशी करताना १९९५-९६साली घडलेले एक ‘प्रकरण’ समोर आले. हेच ते मोनिका ल्युइन्स्की प्रकरण… त्या काळात व्हाईट हाऊसमध्ये प्रशिक्षणार्थी असलेल्या मोनिकाचे क्लिंटन यांच्याशी लैंगिक संबंध असल्याचे उजेडात आले. आधी क्लिंटन यांनी याचा इन्कार केला. मात्र त्यानंतर ‘लैंगिक संबंध’ याची व्याख्या नीट समजून घेतल्यानंतर त्यांनी ते मान्य केले. स्टार यांनी उजेडात आणलेल्या या प्रकरणामुळे क्लिंटन यांच्यावर पुढे महाभियोग चालवण्यात आला. अर्थात यामुळे त्यांच्यावर टीकाही झाली.

विशेष सरकारी वकील की ‘राजकीय हल्लेखोर’?

स्टार हे रिपब्लिकन पक्षाच्या विचारांचे होते. त्यामुळे त्यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या क्लिंटन यांची चौकटीच्या बाहेर जाऊन चौकशी केल्याचा आरोप करण्यात आला. मुळात आर्थिक गुंतवणुकीच्या प्रकरणाची चौकशी स्टार यांनी अनैतिक लैंगिक संबंधांवर नेली. यासाठी त्यांनी मोनिका आणि पेंटागॉनमधील (अमेरिकेचे संरक्षण मंत्रालय) तिची सहकारी लिंडा ट्रीप यांच्या फोनवरील संभाषणाचा आधार घेतला. आपण हे प्रकरण कसे उजेडात आणले, हे सांगणारे ‘द स्टार रिपोर्ट’ हे पुस्तकही त्यांनी लिहिले. त्यामुळे राजकीय आकसातून हे प्रकरण हाताळल्याचा आरोप त्यांच्यावर झाला. स्टार यांच्यावर टीका करणारे ‘अँड द हॉर्स ही रोड ऑन’ हे जेम्स कारविल यांचे पुस्तक, एरिक झकार यांचे ‘स्टार इज ऑन ब्रॉडवे’ हे नाटकही आले.

विश्लेषण : सोशल मीडिया एन्फ्लुअन्सर्ससाठी केंद्र सरकारचे कठोर नियम; ५० लाखांपर्यंत दंडाची तरतूद, जाणून घ्या नेमकं प्रकरण

बेलो विद्यापीठात नेमके काय घडले?

टेक्सासमधील बेलो विद्यापीठाने फेब्रुवारी २०१०मध्ये स्टार यांची अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याचे जाहीर केले. विशेष म्हणजे २००५पासून रिक्त असलेल्या कुलगुरू पदावर २०१३ साली त्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. २००९ ते २०१६ या काळात विद्यापीठात (प्रामुख्याने विद्यार्थिनींबाबत) घडलेल्या लैंगिक अत्याचारांच्या तक्रारींची योग्य दखल घेतली न गेल्याचे उजेडात आले. विद्यापीठाच्या संचालक मंडळाने याची चौकशी सुरू केली. पेपर हॅमिल्टन या वकिली संस्थेने आपला अहवाल सादर केल्यानंतर स्टार यांना अध्यक्षपदावरून हटवण्यात आले. ते विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून कायम राहतील, असेही जाहीर करण्यात आले होते. मात्र त्यानंतर चार-पाच दिवसांमध्येच स्टार यांनी कुलगुरूपदाचा राजीनामा दिला. आपल्या विवेकबुद्धीला स्मरून हे पाऊल उचलल्याचे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले.

ट्रम्प यांच्या बचावामध्ये सहभाग काय?

माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर २०२०मध्ये चाललेल्य महाभियोगामध्ये स्टार त्यांच्या बाजूने उभे राहिले. या सुनावणीत त्यांनी केलेली अनेक विधाने वादात अडकली. १९९८ साली क्लिंटन यांना राष्ट्राध्यक्षपदावरून हटवण्यासाठी त्यांनीच बाजू मांडली होती. ट्रम्प यांच्या बाजूने प्रतिनिधिगृहात बोलताना तेव्हाच्या आपल्याच अनेक विधानांना त्यांनी छेद दिला. त्यावेळी क्लिंटन यांच्यावर महाभियोग चालवणे ही आपली चूक होती, हेदेखील त्यांनी मान्य करून टाकले. २०२१मध्ये ट्रम्प यांच्यावर दुसरा महाभियोग चालला. त्यावेळीही स्टार यांनी महाभियोग भयंकर आणि घटनाबाह्य असल्याची टिप्पणी केली.

स्टार यांचे वैयक्तिक आयुष्य कसे होते?

टेक्सासच्या व्हर्नन इथे २१ जुलै १९४६ साली त्यांचा जन्म झाला. केनेथ विंस्टन स्टार हे त्यांचे पूर्ण नाव. घरात धार्मिक वातावरण असलेले स्टार हे १९९५पर्यंत डेमोक्रॅटिक पक्षाशी संबंधित होते. मात्र त्यानंतर त्यांची विचारसरणी बदलली आणि ते रिपब्लिकन पक्षात सहभागी झाले. आपल्या कारकीर्दीत त्यांनी अनेक महत्त्वाची प्रकरणे हाताळली. १९९८ साली टाईम नियतकालिकाच्या मुखपृष्ठावर (अर्थात क्लिंटन यांच्या जोडीने) झळकण्याचा मान त्यांना मिळाला. स्टार यांच्या निधनामुळे अमेरिकेच्या राजकीय इतिहासातील एक प्रकरण संपले आहे. मात्र त्यांच्यामुळे आयुष्य बदलून गेलेल्या अनेकांच्या स्मरणात ते कायमच राहतील.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: American lawyer and judge kenneth starr expert on constitution print exp pmw
Show comments