सध्या पॅलेस्टाइनमधील हमास या दहशतवादी संघटना आणि इस्रायल यांच्यातील युद्धाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. इस्रायलने हमास संघटनेला समूळ नष्ट करण्याचा निश्चय केला असून, हा देश गाझा पट्टीत तोफगोळे आणि बॉम्बगोळ्यांचा वर्षाव करीत आहे. या हल्ल्यात आतापर्यंत १२ हजारपेक्षा अधिक पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. एकीकडे हे युद्ध सुरू असताना दुसरीकडे अमेरिकेने खातमा केलेल्या ओसामा बिन लादेन या कुख्यात दहशतवाद्याची पुन्हा एकदा चर्चा होत आहे. त्याने २१ वर्षांपूर्वी अमेरिकेला लिहिलेले पत्र समाजमाध्यमांवर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. लादेनच्या या पत्रात नेमके काय आहे? इस्रायल-हमास यांच्यातील युद्धादरम्यान या पत्राचा उल्लेख का केला जात आहे? यावर अमेरिकेने काय भूमिका घेतली आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इस्रायलमध्ये नेमके काय चाललेय?

हमास या संघटनेने ७ ऑक्टोबर रोजी इस्रायल देशावर हल्ला केला होता. या हल्ल्यात इस्रायलचे साधारण एक हजार नागरिक मृत्युमुखी पडले होते. या हल्ल्यानंतर इस्रायलनेही आक्रमक पवित्रा धारण केला असून, ७ ऑक्टोबरपासून इस्रायलकडून गाझा पट्टीत हल्ले केले जात आहेत. हमास या संघटनेला समूळ नष्ट करण्यासाठी हे हल्ले केले जात असून, त्यात आतापर्यंत १२ हजारपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. इस्रायली सैन्याकडून गाझा पट्टी ताब्यात घेण्याचाही प्रयत्न केला जातोय. इस्रायलच्या हल्ल्यात आतापर्यंत अनेक महिला आणि छोट्या मुलांचाही मृत्यू झाला आहे. याच कारणामुळे या देशावर जगभरातून टीका केली जात आहे. अमेरिकेने मात्र इस्रायलला पाठिंबा दिला आहे.

२१ वर्षांपूर्वी लिहिले होते पत्र

इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू असताना आता ओसामा बिन लादेनने अमेरिकेला उद्देशून लिहिलेले २१ वर्षांपूर्वीचे एक पत्र सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. लादेनच्या अल कायदा या दहशतवादी संघटनेने २००१ साली अमेरिकेवर हल्ला केला होता. या हल्ल्यात साधारण तीन हजार लोकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्याच्या एका वर्षानंतर लादेनने हे पत्र लिहिले होते. या पत्रात लादेनने इस्रायल देशाच्या निर्मितीमागे अमेरिका असल्याचा आरोप केला होता. तसेच पॅलेस्टिनी नागरिकांवर अत्याचार होत आहेत, असेही लादेन या पत्रात म्हणाला होता. याच कारणामुळे लादेनचे हे पत्र सध्या व्हायरल होत आहे.

अमेरिकेतील विश्लेषक, राजकीय नेत्यांची टिकटॉकवर टीका

काही दिवसांपासून टिकटॉक (भारतात टिकटॉकवर बंदी आहे) या शॉर्ट्स व्हिडीओ मंचावर अनेक वापरकर्त्यांनी अमेरिकेच्या धोरणावर टीका करताना लादेनच्या या पत्राचा आधार घेतला आहे. मात्र, लादेनच्या या पत्राचा आधार सर्वप्रथम कोणी घेतला? हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. लादेनचे हे पत्र मोठ्या प्रमाणात शेअर होत असल्यामुळे अमेरिकेतील अनेक विश्लेषक आणि राजकीय नेत्यांनी टिकटॉकवर टीका केली आहे. तसेच दहशतवादी अजेंडा घेऊन टिकटॉक वापरकर्त्यांना कट्टरपंथी बनवले जात आहे. टिकटॉक अॅप अमेरिकी तरुणांचे लक्ष वेधून घेण्यासाठी खोटा प्रचार करीत आहे, असा आरोपही या विश्लेषक व राजकीय नेत्यांनी केला आहे.

‘द गार्डियन’ने ते पत्र हटवले

‘द गार्डियन’ या ब्रिटिश दैनिकाने लादेनने लिहिलेल्या २००२ सालच्या पत्राचा अनुवाद करून प्रदर्शित केले होते. मात्र, या दैनिकाने आपल्या वृत्त-संकेतस्थळावरून या पत्रातील मजकूर आता हटवला आहे. हे पत्र हटवताना ‘पूर्ण संदर्भ न देताच या पत्रातील मजकूर समाजमाध्यमांवर व्हायरल केला जात आहे. याच कारणामुळे आम्ही ते वृत्त काढून टाकले असून, संबंधित लेखाची लिंक मूळ संदर्भ असलेल्या लेखाकडे डायरेक्ट केलेली आहे,’ असे स्पष्टीकरण ‘द गार्डियन’ने दिले आहे.

लादेनच्या पत्रात नेमके काय आहे?

अल कायदा या दहशतवादी संघटनेने अमेरिकेवर २००१ साली केलेल्या दहशतवादी हल्ल्याचे समर्थन लादेनने या पत्राच्या माध्यमातून केले होते. अमेरिका इस्रायल देशाला पाठिंबा देतो, त्याचा सूड घेण्याची गरज होती, असेही लादेन या पत्रात म्हणाला होता. “ब्रिटिशांनी पॅलेस्टाइन हा प्रदेश तुमच्या (अमेरिका) मदतीने ज्यू लोकांच्या ताब्यात दिला. ज्यू लोकांनी या प्रदेशावर ५० वर्षांपेक्षा अधिक काळापासून ताबा मिळवलेला आहे. या वर्षात दडपशाही, अत्याचार, गुन्हे, खून, विनाश, विध्वंस करण्यात आला. इस्रायल देशाची निर्मिती हा सर्वांत मोठ्या गुन्ह्यांपैकी एक गुन्हा आहे. या गुन्ह्याचे नेतृत्व तुम्ही (अमेरिका) केलेले आहे. अर्थातच अमेरिका हा देश इस्रायलला पाठिंबा देतो हे सिद्ध करण्याची गरज नाही,” असे लादेनने या पत्रात म्हटले होते.

“पॅलेस्टाइन, काश्मीर, लेबनॉनमधील मुस्लिमांवर अत्याचार करण्यास पाठिंबा दिला जातो”

अमेरिका सरकारकडून पॅलेस्टाइन, सोमालिया, चेचेन, काश्मीर, लेबनॉन आदी प्रदेशांतील मुस्लिमांवर अत्याचार करण्यास पाठिंबा दिला जातो. इराकसारख्या प्रदेशावर अमेरिकेच्या पाठिंब्यानेच आर्थिक निर्बंध लादले जात आहेत. त्यामुळे इराकसारख्या देशात लोक उपाशी आहेत, असा आरोपही लादेनने आपल्या पत्रात केला होता. विशेष म्हणजे याचा बदला घ्यावा लागला, असे म्हणत लादेनने अमेरिकेवरील हल्ल्याचे समर्थन केले होते.

“… म्हणून अमेरिकन निर्दोष नाहीत”

“अमेरिकेतील लोक कर देतात. याच कराच्या पैशांच्या मदतीने अफगाणिस्तानात आमच्यावर बॉम्बहल्ले करण्यासाठी विमाने तयार करण्यात आली. पॅलेस्टाइनमध्ये आमची घरे नष्ट करण्यासाठी रणगाडे तयार करण्यात आले. याच पैशांच्या मदतीने आखातात आमच्या प्रदेशावर ताबा मिळवणाऱ्या सैन्याला मदत पुरवली गेली. याच कारणामुळे अमेरिकन आणि ज्यू लोकांकडून आमच्यावर केल्या जात असलेल्या अत्याचारांत अमेरिक नागरिक निर्दोष नाहीत,” असे लादेन आपल्या पत्रात म्हणाला होता.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amid israel hamas war osama bin laden 21 year old letter to america goes viral know detail information prd