पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी नवी दिल्लीतील सुंदर नर्सरी येथे ‘जहान-ए-खुसरो २०२५’ या भव्य सूफी संगीत महोत्सवाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी वार्षिक संगीत महोत्सवाचे वर्णन ‘हिंदुस्तानच्या मातीचा सुगंध’ असे केले. त्याचबरोबर १३ व्या शतकातील सूफी कवी-संगीतकार अमीर खुसरो यांचंही पंतप्रधानांनी तोंडभरून कौतुक केलं. खुसरो यांना ‘तुति-ए-हिंद’ (भारताचा तोता) ही उपाधी मिळाली होती. त्यांनी हिंदी आणि फारसी या दोन्ही भाषांमध्ये कविता लिहिल्या आहेत. भारतीय शास्त्रीय संगीत, सूफी कव्वाली आणि पर्शियन साहित्यात खुसरो यांनी अमूल्य योगदान दिलं आहे. हिंदी भाषेच्या विकासात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमीर खुसरो यांच्या लिखाणातून त्यांच्या स्वत:च्या जीवनातील अनेक पैलूंची माहिती मिळते, ज्यात आत्मचरित्रात्मक तपशील समाविष्ट आहेत. खुसरो यांच्या जीवनातील अनेक गोष्टी अद्याप अज्ञात किंवा कथांमध्ये गुंफलेल्या आहेत, ज्यामुळे त्यांच्या जीवनाची खरी माहिती शोधणे आव्हानात्मक ठरते. चंगेज खानच्या आक्रमणांचा प्रतिकार करण्यासाठी अमीर खुसरो यांचे वडील १३ व्या शतकाच्या सुरुवातीला मध्य आशियातून भारतात आले होते. भारतात येऊन ते सुलतान इल्तुतमिश यांच्या सेवेत हजर झाले.

आणखी वाचा : Crying Disease : रडता-रडता होतोय अनेकांचा मृत्यू, नेमका काय आहे हा थैमान घालणारा आजार?

१२५३ साली खुसरो यांचा जन्म

एका भारतीय मुस्लीम महिलेबरोबर विवाह केल्यानंतर १२५३ साली खुसरो दाम्पत्याला पहिले मूल झाले. या बाळाचे नाव अबुल हसन यामीन उद-दीन खुसरो असे ठेवण्यात आले. अमीर खुसरो यांना त्यांच्या दोन्ही बाजूंच्या पूर्वजांचा अभिमान होता. त्यांचे जीवन दोन्ही संस्कृतींचे एकत्रीकरण दर्शविते, असं पॉल ई. लोसेन्स्की आणि सुनील शर्मा यांनी आपल्या ‘इन द बाजार ऑफ लव्ह’ (२०११) या पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हटलं आहे. खुसरो यांनी अनेकदा स्वतःला ‘भारतीय तुर्क’ असे संबोधलं, ज्यामुळे त्यांच्या दोन्ही सांस्कृतिक वारशाचा अभिमान दिसून येतो.

खुसरो यांच्या जन्मस्थानाबद्दल सांशकता

खुसरो यांच्या जन्मस्थानाबद्दल विविध मत-मतांतरे आहेत. सध्याच्या उत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्यातील पाटियाली येथे त्यांचा जन्म झाला असे मानले जाते. मात्र, त्यांनी स्वतः आपल्या जन्मस्थानाचा उल्लेख कधीही केलेला नाही, त्यामुळे ते दिल्लीच्या जवळ कुठेतरी जन्मलेले असावेत, अशी शक्यता आहे. त्यांच्या जीवनातील या अस्पष्टतेमुळे त्यांच्यावरील संशोधन आणि चर्चा सुरू आहेत. अमीर खुसरो यांनी वयाच्या २० व्या वर्षी व्यावसायिक कवी म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली. त्यांच्या मृत्यूपर्यंत ते कवी म्हणून कार्यरत राहिले. सुरुवातीच्या काळात खुसरो यांनी राजे आणि सरदारांच्या दरबारात सेवा केली. नंतर ते दिल्ली येथील सुलतानाच्या दरबारात कवी म्हणून स्थायिक झाले.

अनेक शक्तिशाली शासकांच्या दरबारात काम

“मध्ययुगीन इस्लामिक संस्कृतीत स्तुतीकाव्य हे शासकांच्या सांस्कृतिक आणि राजकीय अधिकृततेची स्थापना तसेच प्रसार करण्याचे प्रमुख माध्यम होते, असं लोसेन्स्की आणि शर्मा यांनी आपल्या पुस्तकात म्हटलं आहे. दरबारातील कवी त्यांच्या आश्रयदात्यांकडून सतत मिळणाऱ्या पाठिंब्यावर अवलंबून होते. त्यांना नेहमीच मोठ्या स्पर्धेचा सामना करावा लागत होता. अमीर खुसरो यांनी पाच दशके किमान पाच सुलतान – मुइज्जुद्दीन कैकाबाद, जलालुद्दीन खिलजी, अलाउद्दीन खिलजी, कुतुबुद्दीन मुबारक शाह आणि गियासुद्दीन तुघलक – आणि इतर अनेक शक्तिशाली शासकांच्या सेवेत काम केलं. या दीर्घकालीन दरबारी सेवेमुळे त्यांच्या काव्याची गुणवत्ता आणि लोकप्रियता स्पष्ट होते.

निजामुद्दीन औलिया यांचे खुसरो शिष्य

सुलतान जलालुद्दीन खिलजीने अमीर खुसरो यांना ‘अमीर’ ही पदवी बहाल केली. इतिहासकार झियाउद्दीन बरानी हे आपल्या ‘तारिख-ए फिरोजशाही’ या पुस्तकात लिहितात, जलालुद्दीनकडून खुसरोंना खूप आदर मिळायचा. त्याच्या दरबारात खुसरो यांनी कुराणचे रक्षक म्हणून काम केले होते. अमीर खुसरो हे प्रसिद्ध सूफी संत निजामुद्दीन औलिया यांचे अत्यंत प्रिय शिष्य होते. मोहम्मद वाहिद मिर्झा त्यांच्या ‘द लाइफ अँड वर्क्स ऑफ अमीर खुसरो’ या पुस्तकात लिहितात, “निजामुद्दीन यांनी त्यांच्या मृत्यूपूर्वी खुसरो यांना त्यांच्याबरोबर दफन करण्याची इच्छा व्यक्त केली होती. ते म्हणाले होते की, “खुसरो माझ्या गुपित्यांचा रक्षक आहे आणि त्याच्याशिवाय मी स्वर्गात पाऊल ठेवणार नाही. जर हे कायदेशीर असते तर तसे करण्याचे निर्देश मी दिले असते.”

राजा आणि संत यांची खुसरोंवर निष्ठा

लेखक सैफुल्लाह सैफी यांनी आपल्या Sufi Poet Amir Khusrau: A Link between the Court and the Khanqah’ असं म्हटलंय की, “शाही दरबारात तसेच सूफी गुरुंकडूनही खुसरो यांना खूप सन्मान मिळायचा. राजा आणि संत दोघांनीही खुसरोंच्या निष्ठेवर कधीही शंका घेतली नाही, दोन्ही विरुद्ध छावण्यांकडून त्यांच्याकडे सन्मान आणि आदराने पाहिलं जात होतं. १३२५ मध्ये निजामुद्दीन यांचे निधन झाल्यानंतर खुसरो यांनी त्यांच्यासाठी उच्चारलेले शब्द आजही अनेकांचे मन भारावून सोडतात. ते म्हणाले होते की, “सुंदरता पलंगावर झोपली आहे, तिचे केस तिच्या चेहऱ्यावर पसरलेले आहेत. चला खुसरो, आपण घरी जाऊया, इथे रात्र झाली आहे.”

हेही वाचा : Anti Nepotism Law : राजकारणातील घराणेशाही संपुष्टात येणार? या देशाने कायदा केला मंजूर

खुसरो यांचा शाश्वत वारसा

खुसरो यांच्या निधनाच्या ७०० वर्षांनंतरही त्यांच्या कवितेतील काव्यात्मक सौंदर्य, परखड शब्दांची निवड आणि विविध विषयांचा शोध आजही अनेकांना मंत्रमुग्ध करतो. एकीकडे ते राजे आणि राजकुमारांची स्तुती करत होते, तर दुसरीकडे कोडी, गाणी, शब्दांचे खेळ, मुलांसाठी घरगुती गाणी, गृहिणी, प्रेमात पडलेल्या तरुणी आणि थकलेल्या वृद्ध पुरुषांसाठी रचनाही करत असत. त्यांच्या काव्यात फारसी, तुर्की आणि स्थानिक प्रभावांचे मिश्रण दिसून येते, ज्यामुळे ते हिंदू-मुस्लीम सांस्कृतिक एकतेचे प्रतीक झाले. या मिश्रणामुळेच ‘गंगा-जमुनी तहजीब’ (सांस्कृतिक एकता) च्या प्रसारात खुसरो यांचे योगदान महत्त्वाचे मानले जाते.

अमीर खुसरो यांनी त्यांच्या ‘नूह सिफिर’ या काव्यग्रंथात हिंदू धर्माची खूप प्रशंसा केली आहे. तसेच त्यांनी ब्राह्मणांच्या तात्त्विक विचारांचे कौतुकदेखील केले आहे. “रुमीने जगाला जे प्रकट केले आहे, त्यापेक्षा भारतातील ब्राह्मणांकडे तात्विक विचारांचा खजिना खूप मोठा आहे. ब्राह्मणांकडून कोणीही शिकण्याचा प्रयत्न केला नाही, त्यामुळे त्यांच्या शिकवणी जगासमोर प्रकट झाल्या नाहीत”, असं खुसरो यांनी म्हटलं होतं.

खुसरो हे ‘कव्वालीचे जनक’

दरम्यान, खुसरो यांच्या गझल आणि कव्वाली आजही सूफी दरगाहांमध्ये आणि बॉलीवूड संगीतांमध्ये गायल्या जातात. त्यांच्या लोकप्रिय रचनांमध्ये ‘छाप तिलक’, ‘जिहाल-ए-मस्कीन’ आणि ‘सकल बन फुल रही सरसों’ यांचा समावेश होतो. खुसरो यांना ‘कव्वालीचे जनक’ असं म्हटलं जातं. आधुनिक भारतीय शास्त्रीय संगीताच्या विकासात खुसरो यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांना डझनभर राग तयार करण्याचे, अलंकृत खयाल संगीत तयार करण्याचे, सतार आणि तबल्याचा शोध लावण्याचे श्रेय दिले जाते. काही संशोधकांच्या मते, हे दावे सिद्ध करणे कठीण आहे.