लोकसभा निवडणुकीत प्रामुख्याने उद्धव ठाकरे, शरद पवार, अखिलेश यादव, चंद्राबाबू नायडू, ममता बॅनर्जी तसेच नितीशकुमार यांनी आपल्या पक्षाला यश मिळवून दिले. आपल्या राज्यांमध्ये जनाधार असल्याचे त्यांनी दाखवून दिले. यांतील नितीश आणि चंद्राबाबू हे भाजपबरोबर होते आणि त्यांच्यामुळे भाजपचा मानहानिकारक पराभव टळला. पक्ष फोडला जाऊनही शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी खंबीरपणे पुनर्बांधणी केली आणि महाराष्ट्रात यश मिळवले. तर राहुल गांधी, ममता बॅनर्जी आणि अखिलेश यादव यांनी मोदीविरोधाला लक्षणीय यशाची जोड दिली.
राहुल यांचा आक्रमक प्रचार
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी महिलांना अर्थिक मदतीची योजना जाहीरनाम्यात आणली ती प्रचारात प्रभावी ठरली. याखेरीज भाजपने चारशे जागा जिंकल्या तर घटना बदलली जाईल हा प्रचार देशभर केला. त्याचा मोठा परिणाम झाल्याचे निकालातून दिसत आहे. राहुल यांनी प्रचारात सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले. हिंदी भाषिक पट्ट्यात राहुल यांचा प्रचार प्रभावी ठरला. दोन्ही जागांवरून राहुल विजयी झाले. संसदेत महत्त्वाचे पद घेऊन सरकारला जेरीस कसे आणतात, यावर काँग्रेसचे पुढील चित्र अवलंबून असेल.
हेही वाचा… निवडणुकीचा ‘निकाल’ लागला; पुढे काय?
अनुभवाच्या जोरावर शरद पवारांचा धक्का
मुरब्बी राजकारणी असलेले ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी विदर्भात पक्षाला खाते उघडून दिले. शिवाय मराठवाड्यातही जनाधार वाढवला. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा प्रभाव निर्माण केला. पक्ष फुटणे, बारामतीमध्ये घरातूनच आव्हान मिळणे या गोष्टींची सहानुभूती पवारांना निवडणुकीत मिळाली. या वयातही शरद पवार यांनी जिद्दीने प्रचार केला. कोठेही आक्रमक भाषा न वापरता भाजपविरोधातील प्रचाराची धुरा राज्यात समर्थपणे सांभाळली. त्याचबरोबर महाविकास आघाडीची मोटही बांधली. लोकसभेला कमी जागा घेत पवारांनी आघाडी धर्माला प्राधान्य दिले. राज्यातील लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहता शरद पवार यांचे महत्त्व आणि वलय कायम असल्याचे सिद्ध झाले.
शिवसैनिक आजही उद्धव यांच्या पाठीशी
राष्ट्रवादी काँग्रेसपूर्वी शिवसेना फुटली. मात्र उद्धव ठाकरे यांनी डगमगून न जाता पद्धतशीरपणे निवडणूकीची आखणी केली. योग्य उमेदवार दिले त्याचा फायदा निवडणुकीत दिसला. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईवर उद्धव ठाकरे यांचे प्राबल्य दिसले. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेचा आवाज घुमणार अशी चिन्हे आहेत. ठाकरे यांनी राज्यभर प्रचार करत भाजपवर टीकास्त्र सोडले. राज्याच्या सर्वच विभागात उद्धव ठाकरे यांनी यश मिळवले. शिवसैनिक उद्धव यांच्याच पाठीशी असल्याचे या निकालातून दिसले. त्यामुळे विरोधकांच्या इंडिया आघाडीत उद्धव यांचेही राष्ट्रीय पातळीवर महत्त्व वाढणार आहे.
हेही वाचा… उत्तर प्रदेशात मोदी-योगींना अनपेक्षित धक्का कसा बसला?
अखिलेश यांच्या रणनीतीला यश
उत्तर प्रदेशमध्ये ज्याचा विजय होतो त्याच्याकडे केंद्रातली सत्ता असते. सर्वच मतदानोत्तर चाचण्यांनी उत्तर प्रदेशात भाजपला किमान ६० जागा दाखविल्या होत्या. मात्र अखिलेश यादव यांनी काँग्रेसशी आघाडी करत उत्तम जातीय समीकरणे साधत भाजपला शह दिला. मुलायमसिंह यादव यांच्या निधनानंतर अखिलेश यांच्याकडे पक्षाची धुरा आली. मात्र पूर्वीच्या केवळ यादव-मुस्लीम (एमवाय) या समीकरणांवर अवलंबून न राहता सर्वसमावेश असे जागावाटप करत, सरकार विरोधात जोरदार प्रचार केला. त्यामुळे उत्तर प्रदेशात भाजपला ८० पैकी कसेबसे निम्म्या जागांच्या आसपास भाजपला पोहोचता आले. आता राष्ट्रीय राजकारणात भाजपविरोधी आघाडीत अखिलेश यांना महत्त्वाचे स्थान राहील.
ममतांनी किल्ला राखला
भाजपविरोधात सातत्याने संघर्षाची भूमिका पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी घेतली. निवडणुकीच्या तोंडावर संदेशखालीची घटना पुढे आली. त्यांच्या पक्षाच्या काही नेत्यांना कारागृहात जावे लागले. तरीही ममतांनी जिद्दीने प्रचार करत, गेल्या वेळच्या तुलनेत पक्षाच्या जागा वाढवल्या. भाजप किमान तीस जागा जिंकेल असे वातावरण होते. राज्यात तृणमूल काँग्रेस-भाजप-काँग्रेस-डावे पक्ष असा तिरंगी सामना झाला. तरीही ममतांनी भाजप तसेच काँग्रेस-डाव्यांना राज्यात रोखले. आता ममता पुन्हा इंडिया आघाडीशी कशा जुळवून घेतात ते पहावे लागेल.
हेही वाचा… चंद्राबाबूंनी कसे दाखवले जगनमोहनना अस्मान? आंध्रमध्ये सत्ताबदलाची परंपरा कायम!
चंद्राबाबू नायडूंचे महत्त्व वाढले
आंध्र प्रदेशात वायएसआर काँग्रेसचे जगनमोहन रेड्डी यांची सद्दी संपली. तेलुगु देसमचे चंद्राबाबू नायडू यांनी विरोधकांच्या इंडिया आघाडीबरोबर न जाता भाजपबरोबर जाणे पसंत केले. त्यांची ही खेळी यशस्वी ठरली. चंद्राबाबूंनी राज्यातील सत्तेत पुनरागमन करताना मोठा विजय मिळवला. त्याच बरोबर लोकसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवताना आता राष्ट्रीय लोकशाही आघाडीत चंद्राबाबूंच्या मताला विशेष महत्त्व आले आहे. भाजपला बहुमता तीस ते बत्तीस जागा कमी आहेत. अशा वेळी नायडूंच्या कलाने भाजपला निर्णय घ्यावे लागतील. त्यामुळे चंद्राबाबू आता पुन्हा निर्णायक ठरतील.
नितीशबाबूंची मतपेढी शाबूत
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी गेल्या तीन ते चार वर्षांत कधी भाजप आघाडीत तर कधी राष्ट्रीय जनता दलाबरोबर सरकार चालविले. नितीशकुमार यांच्या प्रतिमेवर परिणाम झाल्याची टीका विरोधकांकडून होत होती. नितीश यांना एक आकडी जागा जिंकणेही कठीण असल्याची टिप्पणी विरोधक करत होते. मात्र महिला मतदार तसेच अतिमागास गटात असलेली त्यांची प्रतिमा कायम असल्याचे लोकसभा निकालांवरून दिसत आहे. नितीशकुमार यांनी लोकसभेला बिहारमध्ये सर्वाधिक जागा मिळवत सर्वांना धक्का दिला. नितीशकुमार यांनी राजकारणातून अजून संपलेले नसल्याचे निकालातून दाखवून दिले.