संजय जाधव

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतातील तब्बल ३५.५ टक्के लोकसंख्येला उच्च रक्तदाब, तर ११.४ टक्के लोकसंख्या मधुमेहग्रस्त असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (आयसीएमआर) संशोधनातून ही आकडेवारी पुढे आली आहे. हे आकडे गंभीर आणि चिंताजनक आहेत. यामुळे एकंदरीत भारतीयांच्या आरोग्याबाबतचा प्रश्न निर्माण झाला आहे. चयापचयाशी निगडित आजार भारतात वाढत असल्याचे अहवालात अधोरेखित करण्यात आले आहे. हे सर्व आजार आहार, व्यायाम आणि ताणतणाव यांच्याशी निगडित आहेत. त्यामुळे भारतीयांच्या आरोग्यासाठी ही एकप्रकारे धोक्याची घंटा ठरणार आहे.

संशोधनाचा आवाका किती?

आयसीएमआर आणि इंडिया डायबेटिस (इंडिया बी) यांनी हे संशोधन केले आहे. हे संशोधन २००८ ते २०२० या कालावधीत करण्यात आले. त्यात २० वर्षे व त्यावरील वयोगटातील एक लाख १३ हजार ४३ जणांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात शहरी भागातील ३३ हजार ५३७ आणि ग्रामीण भागातील ७९ हजार ५०६ जणांचा समावेश होता. हे सर्वेक्षण देशातील ३१ राज्ये, केंद्रशासित प्रदेशांमध्ये करण्यात आले. हे संशोधन लॅन्सेट या संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध झाले आहे. असंसर्गजन्य आजार आणि मधुमेह यावरील हे व्यापक गटाचा समावेश असलेले हे मोठे संशोधन आहे.

कोणते आजार वाढताहेत?

देशातील मधुमेहींची संख्या २०२१ मध्ये १०.१ कोटी, मधुमेहपूर्व रुग्णांची संख्या १३.६ कोटी आणि उच्च रक्तदाब असलेल्यांची संख्या ३१.५ कोटी असल्याचा अंदाज संशोधनात मांडला आहे. देशातील मधुमेहपूर्व रुग्णांची संख्या १३ कोटी असून, २१ कोटी नागरिकांना उच्च कोलेस्टेरॉल, तर १८ कोटी जणांना अतिउच्च कोलेस्टेरॉल आहे. स्थूलतेची समस्या २५ कोटी जणांना असून, ३५ कोटी जणांना उदराची स्थूलता आहे. मानवी विकास निर्देशांकात पिछाडीवर असलेल्या राज्यांमध्ये मधुमेह ते मधुमेहपूर्व रुग्णांचे प्रमाण कमी आहे. देशात डिस्लिपिडेमिया असलेल्यांची संख्या तब्बल ८१.२ टक्के आहे. यात कोलेस्टेरॉल, कमी घनतेचे लिपोप्रोटीन कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसराईड्स आणि उच्च घनतेचे लिपोप्रोटीन यांचे असंतुलन मोठ्या प्रमाणात आढळून आले आहे.

कोणत्या राज्यांत प्रमाण जास्त?

केरळ, पुद्दुचेरी, गोवा, सिक्कीम आणि पंजाबमध्ये चयापचयाशी निगडित विकारांचे प्रमाण इतर राज्यांपेक्षा जास्त आहे. सर्वाधिक मधुमेही गोव्यात असून, त्यांचे प्रमाण २६.४ टक्के आहे. उत्तर प्रदेशात सर्वांत कमी ४.८ टक्के मधुमेही आहेत. मधुमेहपूर्व रुग्णांची संख्या सिक्कीममध्ये सर्वाधिक ३१.३ टक्के आणि मिझोराम सर्वांत कमी ६.८ टक्के आहे. पंजाबमध्ये उच्च रक्तदाबाचे सर्वांत जास्त ५१.८ टक्के प्रमाण आहे. त्यामुळे या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी राज्यनिहाय धोरण आखण्याची आवश्यकता आहे. असे घडल्यास या आजारांना रोखता येईल, असे संशोधनात नमूद केले आहे.

शहरी आणि ग्रामीण स्थितीत तफावत?

देशभरात शहरी भागात उच्च रक्तदाबाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळले आहेत. याला केवळ मध्य भारताचा अपवाद आहे. चयापचयाशी निगडित असंसर्गजन्य आजार, स्थूलता, उच्च रक्तदाब आणि डिस्लिपिडेमिया हे ग्रामीणपेक्षा शहरी भागांमध्ये जास्त आढळून आले. देशाच्या दक्षिण आणि उत्तर भागात मधुमेहाचे जास्त रुग्ण आढळले आहेत. विशेषत: शहरी भागात ही रुग्णसंख्या अधिक आहे. मध्य आणि ईशान्य भारतात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या कमी आहे. विकसित राज्यांमध्ये मधुमेहाच्या रुग्णांची संख्या स्थिर पातळीवर आली असून, मागास राज्यांमध्ये आता मधुमेही वाढू लागले आहेत, असे निरीक्षणही संशोधनात नोंदवण्यात आले आहे.

भविष्यातील आव्हाने कोणती?

देशात २०१७ मध्ये मधुमेहींचे प्रमाण ७.५ टक्के होते. तेव्हापासून त्यांच्या संख्येत सुमारे ५० टक्के वाढ नोंदवण्यात आलेली आहे. देशातील चयापचयाशी निगडित रुग्णांची संख्या आधी वर्तवण्यात आलेल्या अंदाजापेक्षा अनेक पटींनी जास्त आहे. भारतात आरोग्य व्यवस्था ही प्रामुख्याने राज्यांच्या अखत्यारीत असते. राज्यांनी या आजाराच्या रुग्णांची आकडेवारी जमा केल्यास देश पातळीवर व्यापक धोरण राबवता येऊ शकते. जीवनशैलीशी निगडित आजारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असून, हे चिंताजनक आहे. आहार, शारीरिक हालचाली आणि तणावाची पातळी या गोष्टी प्रामुख्याने या आजारांसाठी कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे वेळीच काळजी घेतल्यास या आजारांचे प्रमाण कमी करता येईल. जीवनशैलीशी निगडित आजारांबाबत जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्याची आवश्यता आहे. असे घडल्यास वेळीच अशा आजारांचे निदान होऊन त्यांना रोखणेही शक्य होईल.

sanjay.jadhav@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: An alarm bell for the health of indians what does icmrs research say about diabetes high blood pressure scj