अलास्का एअरलाईन्स कंपनीचे विमान हवेत असताना त्याचा दरवाजा उडून गेला. यामुळे वैमानिकाला विमान तातडीने खाली उतरवावे लागले. विमानाचे उड्डाण सुरू असताना घडलेल्या या घटनेमुळे सर्व प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात आली होती. बोईंग ७३७ मॅक्स ९ या विमानाच्या बाबत हा प्रकार घडला. यानंतर या विमानांची उड्डाणे सुरक्षेच्या कारणास्तव थांबविण्यात आली आहेत. यामुळे एकूणच शेकडो उड्डाणे रद्द झाली आहेत. या संकटाचा दीर्घकालीन फटका बोईंगसोबतच विमान प्रवासी कंपन्यांना बसणार आहे. याआधी बोईंगच्या विमानांचे झालेले अपघात आणि बिघाड हे मुद्दे या निमित्ताने पुन्हा चर्चेत आले आहेत. हे विमान कितपत सुरक्षित आहेत, असाही प्रश्न उपस्थित झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमके काय घडले?

अलास्का एअरलाइन्सच्या बोईंग ७३७ मॅक्स ९ विमानाने ५ जानेवारीला अमेरिकेतील पोर्टलँड विमानतळावरून उड्डाण केले. या विमानात १७१ प्रवासी आणि सहा कर्मचारी होते. उड्डाणानंतर काही मिनिटांनी विमानाचा संकटकालीन दरवाजा निसटला. तो विमानापासून वेगळा होऊन खाली पडला. यामुळे १६ हजार फूट उंचीवर असलेल्या विमानात हवेचा जोरदार प्रवाह घुसला. याचवेळी विमानाची दुर्घटना होण्याचा धोका निर्माण झाला. प्रवाशांसाठी हा प्रसंग तर जिवावर बेतला होता. या घटनेत अनेक प्रवासीही जखमी झाले आहेत. त्यामुळे वैमानिकाने विमान तातडीने उतरविण्याचा निर्णय घेतला. या विमानाचा वापर मागील ऑक्टोबरपासून सुरू झाला होता.

उड्डाणांवर काय परिणाम?

या घटनेनंतर अलास्का एअरलाइन्सने ताफ्यातील ६५ बोईंग ७३७ मॅक्स ९ विमानांची उड्डाणे रद्द केली. पूर्ण देखभाल आणि सुरक्षा तपासणी केल्यानंतरच या विमानांचा वापर केला जाईल, अशी भूमिका कंपनीने जाहीर केली. याचवेळी युनायटेड एअरलाइन्सनेही काही बोईंग ७३७ मॅक्स ९ विमानांचे उड्डाण रद्द केले. अमेरिकेच्या फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशनने बोईंग ७३७ मॅक्स ९ या विमानांचे उड्डाण तात्पुरत्या स्वरूपात थांबविण्याबाबत तातडीची सूचना जाहीर केली. विमान प्रवासी कंपन्यांनी ही विमाने पुन्हा सेवेत आणण्याआधी विशेष तपासणी करावी, असे निर्देशही ॲडमिनिस्ट्रेशनने दिले. त्यानंतर जगभरातील विमान कंपन्यांनी या विमानांची उड्डाणे थांबविली. अद्याप ही उड्डाणे सुरू झालेली नाहीत. त्यामुळे विमान प्रवासी कंपन्यांची डोकेदुखी वाढली आहे.

आधी कोणत्या दुर्घटना?

लायन एअरचे विमान ऑक्टोबर २०१८ मध्ये इंडोनेशियात कोसळले होते. त्यात १८९ जण ठार झाले होते. लायन एअरच्या विमानाने उड्डाण केल्यानंतर वैमानिकाला विमानाच्या सुरक्षा यंत्रणेत बिघाड झाल्याचे आढळले. परंतु, तो बिघाड दुरुस्त न करता आल्याने ते जावा समुद्रात कोसळले. इंडोनेशियातील राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा समितीने केलेल्या चौकशीत विमानाच्या सेन्सरमध्ये बिघाड असल्याचे समोर आले. त्यानंतर इथियोपियन एअरलाईन्सचे विमान मध्य इथियोपियात कोसळले. या दोन्ही अपघातातील समान दुवा म्हणजे कोसळलेली दोन्ही विमाने ही बोईंग ७३७ मॅक्स ८ या प्रकारची होती. बोईंग ७३७ मॅक्स ९ चा हा पूर्वावतार होता. इथियोपियन एअरलाईन्सच्या विमान दुर्घटनेनंतर ७३७ मॅक्स ८ विमानांचे उड्डाण बंद होते. ते पुन्हा जानेवारी २०२३ पासून सुरू झाले.

भारतीय हवाई क्षेत्राला फटका?

एकाही भारतीय विमान प्रवासी कंपनीकडून बोईंग ७३७ मॅक्स ९ या विमानाचा वापर केला जात नाही. आकासा एअर, स्पाईसजेट आणि एअर इंडिया एक्स्प्रेस या कंपन्या बोईंग ७३७ मॅक्स ८ या विमानांचा वापर करतात. त्यात आकासा एअरकडे या प्रकारची सर्वाधिक २२ विमाने आहेत. भारतात सध्या मॅक्स ८ प्रकारची एकूण ४० विमाने वापरात आहेत. त्यामुळे फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशनची नवीन नियमावली त्यांना लागू नाही. भारतीय नियामक संस्थेने या घटनेनंतर सर्व विमान कंपन्यांना विमानांची सुरक्षा तपासणी करण्याचे निर्देश दिले. विशेषत: विमानातील आपत्कालीन प्रसंगी बाहेर पडावयाचे दरवाजे हे वापरात नसल्यामुळे त्यांची तपासणी करण्यास सांगण्यात आले. आकासा एअरकडून मॅक्स ९ ही विमाने खरेदी करण्याचा करार केला जाणार आहे. या करारावर भविष्यात या घटनेमुळे परिणाम होऊ शकतो.

बोईंगची भूमिका काय?

अमेरिकेतील विमान उत्पादक कंपनी बोईंगने या प्रकरणात आपली चूक मान्य केली आहे. ‘पहिली गोष्ट म्हणजे आम्ही आमची चूक कबूल केली आहे. यात १०० टक्के पारदर्शक पद्धतीने पावले उचलली जातील. असा प्रकार पुन्हा कधीच घडणार नाही,’ असे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्ह कॅलहॉन यांनी म्हटले आहे. घडलेल्या घटनेचे गांभीर्य कंपनीला आहे, त्यामुळे गुणवत्ता नियंत्रण व तपासणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, असेही कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणामुळे भांडवली बाजारात बोईंगच्या समभागातही काही प्रमाणात घसरण झाली आहे.

sanjay.jadhav@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: An alaska airlines boeing 737 max 9 plane had its door blown off while in the air long term impact on airline companies safety of passengers print exp dvr