देशातील करोना रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत असली तरी, ‘समूह संसर्गा’च्या टप्प्यात भारताचा प्रवेश अद्याप झाला नाही. मात्र चीन, इटली, अमेरिका आणि स्पेनमधील परिस्थिती पाहात भविष्यात भारातमध्ये करोनाचा समूह संसर्ग होण्याचा धोका आहे. केंद्र आणि राज्य सरकार करोनाचा प्रसार रोखण्यासाठी सर्वोत्परीनं प्रयत्न करत आहे. त्याला नागरिकही घरात राहून चांगला प्रतिसाद देत आहेत. करोना हे विषाणूच्या एका समूहाचे नाव असून माणसांमध्ये आणि प्राण्यांमध्ये आढळतो. हा विषाणू यापूर्वी माणसामध्ये आढळलेल्या सहा-सात विषाणूंपेक्षा वेगळा आहे. म्हणून याला नोवेल करोना विषाणू असे म्हटले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रुग्ण खोकल्यावर हवेत उडालेल्या तुषारामध्ये करोनाचे विषाणू असतात. ही विषाणूयुक्त हवा श्वसनावाटे घेतल्यानंतर दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात ते प्रवेश करू शकतात. रुग्णाच्या खोकल्यातून उडालेले तुषार करोनाच्या विषाणूंसह आजूबाजूच्या वस्तूंवर पडतात. त्या वस्तूंना आपल्या हाताचा स्पर्श झाल्यास ते विषाणू हातांना चिकटतात. त्यानंतर हे हात चेहऱ्याला किंवा नाकाला लावल्यास तर ते श्वसनमार्गातून जाऊन संसर्ग होतो. WHO रिपोर्ट्सनुसार, करोना व्हायरस हा एका व्यक्तीपासून साधारण तीन व्यक्तींमध्ये आणि असं करत काही दिवसांतच १००० लोकांना आपल्या विळख्यात घेऊ  शकतो.

करोना व्हायरस हा संसर्गजन्य रोग असून एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला होतो. या रोगाने आतापर्यंत ३० हजारांपेक्षा आधिक जणांचा बळी घेतला आहे तर लाखो लोकांना याचा संसर्ग झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने या रोगाला महामारी म्हणून घोषीत केलं आहे. या हा रोग समाजात पसरल्यानंतर अनेक लोकांचे बळी घेत असल्याचे आतापर्यंत समोर आले आहे.

समुह संसर्ग म्हणजे, एखाद्या व्यक्तीला संसर्गजन्य रोगाची लागण झाली आहे. त्या व्यक्तीला कोणामुळे, कुठे आणि कशी लागण झाली याबाबतचा शोध घेणं जेव्हा कठीण होतं तेव्हा देशात किंवा राज्यात समुह संसर्गाला सुरूवात झाली असे समजावे. समुह संसर्ग सुरू होण्यापूर्वी, सुरूवातीच्या काळात विषाणूची लागण झालेल्या व्यक्तीला कशामुळे किंवा कोणामुळे संसर्ग झाला हे समजते. पण एखादा व्हायरस अथावा रोगाचा सुरूवातीच्या काळात प्रसार किंवा संसर्ग होण्याचं प्रमाण जास्त असते. कारण सुरूवातीच्या काळात याची लक्षणे दिसून येत नाही. तोपर्यंत एखादा संसर्ग झालेला व्यक्ती हजोरांना या रोगाची लागण करू शकतो.

चीन येथूल वुहान शहरातून करोना या रोगाची उत्पत्ती झाली. या शहरात गेलेले अथवा येथून दुसऱ्या शहरात गेलेल्यांना सर्वांना या विषाणूची लागण झाली. अमेरिका, इटली, स्पेन यासारख्या १९५ देशांमध्ये करोनानं आपला प्रभाव दाखवला. विदेशात प्रवास करणाऱ्या लोकांमुळे जगभरात या रोगानं आपली पायामुळे रोवली आहेत.

काय काळजी घ्याल?
तज्ञ्जांच्या मते, एखादा साथीचा रोग वाढत असेल तर सोशल डिस्टन्स ठेवावा. गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं शिवाय कमीत कमी एक मीटर अंतर ठेऊन इतरांशी संपर्क साधावा. हे उपाय केल्यास वाढणारा संसर्ग कमी किंवा थांबवू शकतो.

सर्वाधिक धोका कुणाला?
ज्येष्ठ नागरिक, उच्च रक्तदाब, मधुमेहाचे रुग्ण, गर्भवती महिला, मूत्रपिंडाचे विकार, कर्करुग्ण ज्यांची प्रतिकारशक्ती कमी असते, अशा रुग्णांमध्ये संसर्गाचे स्वरूप गंभीर होण्याचा संभव असतो.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: An explanation of community spread nck