किंग चार्ल्स तिसरे यांच्या राज्याभिषेक सोहळ्याला कोण कोण येतेय? प्रिन्स हॅरी आहेत, भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड जाणार आहेत, अमेरिकेच्या प्रथम महिला लेडी जिल बायडेन आणि मुंबईतील डबेवालेदेखील या सोहळ्याला हजेरी लावणार आहेत. निमंत्रितांची ही यादी देण्याचे कारण म्हणजे या यादीत जगभरातील मातब्बर, प्रतिष्ठित आणि लोकप्रिय लोकांसोबतच मुंबईचे डबेवाले उपस्थित राहणार आहेत हे विशेष. ६ मे रोजी लंडनमधील वेस्टमिन्स्टर ॲबे येथे राज्याभिषेक सोहळा संपन्न होणार असून ब्रिटनने या सोहळ्याची जोरदार तयारी सुरू केली आहे. या ऐतिहासिक सोहळ्यावर १०० दशलक्ष युरो खर्च करण्यात येणार आहेत. लंडनमध्ये या सोहळ्याची तयारी सुरू असताना इकडे मुंबईतील डबेवालेदेखील राजे चार्ल्स यांना भेटवस्तू देण्यासाठी लगबग करत आहेत. राजे चार्ल्स आणि त्यांच्या पत्नी राणी कॉन्सर्ट कॅमिला यांना डबेवाले भेटवस्तू देणार आहेत, अशी माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली. ७४ वर्षीय राजे चार्ल्स यांच्यासाठी पुणेरी पगडी आणि शाल विकत घेण्यात आली आहे.
या व्यतिरिक्त डबेवाल्यांकडून शनिवारी मुंबईतील सरकारी रुग्णालयाजवळ मिठाईवाटप करण्यात येणार आहे. याबद्दल माहिती देताना मुंबई डबेवाला असोसिएशनचे प्रवक्ते सुभाष तळेकर म्हणाले, “शनिवारी राज्याभिषेकानिमित्त आम्ही मुंबईतील सरकारी रुग्णालयाच्या परिसरात मिठाईवाटप करणार आहोत. राजे चार्ल्स यांच्यामुळे आम्हाला जगभरात एक ओळख मिळाली. आम्ही याबद्दल त्यांचे शतशः आभारी आहोत. राजे चार्ल्स यांचा राज्याभिषेक होतोय, याचा आम्हाला अतीव आनंद झालेला आहे.”
मुंबईत कार्यालयांमध्ये, विशेषतः दक्षिण मुंबई परिसरातील कार्यालयांमध्ये, डबे पोहोचवणारे डबेवाले आणि थेट ब्रिटनचे राजकुमार चार्ल्स यांच्यात नेमकी मैत्री कशी झाली? ब्रिटनने डबेवाल्यांची दखल घेऊन त्यांना या सोहळ्यासाठी निमंत्रित का केले? याचा घेतलेला हा आढावा.
चार्ल्स यांचा भारत दौरा आणि डबेवाल्यांसोबत मैत्री
दक्षिण मुंबईतील कार्यालयांमध्ये अगदी वेळेवर डबे पोहोचवणारी संघटना म्हणून डबेवाल्यांकडे पाहिले जाते. अचूक वेळ आणि डबे वितरणाच्या पद्धतीमुळे डबेवाल्यांची दखल जागतिक स्तरावर घेण्यात आलेली आहे. ब्रिटनच्या राजघराण्यातील राजकुमार चार्ल्स यांनी २००३ साली भारताचा दहा दिवसांचा दौरा केला होता. या वेळी त्यांनी डबेवाल्यांची भेट घेतल्यामुळे जगाचे या घटनेकडे लक्ष वळले होते.
चार्ल्स यांच्याकडे प्रिन्स ऑफ वेल्स हे पद असताना त्यांनी बीबीसीवर डबेवाल्यांच्या कामाबाबतची एक डॉक्युमेंट्री पाहिली होती. मुंबईतील कार्यालयात काम करणाऱ्या लाखो लोकांना वेळेवर डबे पोहोचविण्याचे काम डबेवाल्यांकडून करण्यात येत असल्याचे त्यांनी पाहिले होते. डबेवाल्यांची अचूकता आणि वेळेत डबे पोहोचविण्याच्या यंत्रणेबद्दल चार्ल्स यांना कुतूहल वाटले. त्यामुळेच त्यांनी भारतभेटीदरम्यान डबेवाल्यांची भेट घ्यायची, असे ठरवले होते. नोव्हेंबर २००३ मध्ये चार्ल्स भारत दौऱ्यावर आले होते. ४ नोव्हेंबर २००३ रोजी चार्ल्स यांनी चर्चगेट येथे डबेवाल्यांची भेट घेतली आणि जवळपास २० मिनिटे त्यांच्याशी संवाद साधला. डबेवाल्यांसमोर येणाऱ्या अडचणींवर ते कसे मात करतात? घरून डबे गोळा करणे, त्यांची विभागणी करणे आणि कार्यालयांच्या पत्त्यावर डबे पोहोचवणे ही सबंध यंत्रणा कशी काम करते, याची इत्थंभूत माहिती चार्ल्स यांनी घेतली.
सुभाष तळेकर यांनी रेडिफ डॉट कॉमला माहिती देताना सांगितले की, २००३ साली माझे वडील चार्ल्स यांना भेटले होते. चार्ल्स यांनी वडिलांकडे डबे पोहोचविण्याची पद्धत जाणून घेतली होती. डबे घेऊन सायकल कशी चालवता, एवढे डबे एका लाकडी पेटीत ठेवून ते कसे उचलता आणि कोणाचा कोणता डबा आहे, हे ओळखण्यासाठी काही कोड वापरला जातो का? असे प्रश्न चार्ल्स यांनी विचारले होते.
चार्ल्स यांच्या लग्नाला डबेवाल्यांची हजेरी
चार्ल्स आणि डबेवाले यांची मैत्री फक्त मुंबई भेटीपुरती मर्यादित राहिली नव्हती. दोन वर्षांनंतर म्हणजेच २००५ साली ब्रिटिश राजघराण्याने प्रिन्स चार्ल्स आणि कॅमिला पार्कर बोवल्स यांच्या विवाह सोहळ्यासाठी डबेवाला संघटनेकडून दोन प्रतिनिधींना लग्नसोहळ्याचे निमंत्रण दिले होते. नूतन मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स असोसिएशनचे रघुनाथ मेडगे हे त्या दोन प्रतिनिधींपैकी एक आहेत. त्यांनी लंडन येथे जाऊन लग्नसोहळ्यास हजेरी लावली. मेडगे म्हणाले की, लंडनचा प्रवास आणि इतर सर्व खर्च चार्ल्स यांनी केला होता. सोपानकाका यांनीदेखील मेगडे यांच्यासोबत लंडनच्या लग्नसोहळ्यास उपस्थिती लावली होती. लग्नसोहळ्यात राजघराण्याने आमचे मनापासून स्वागत केले, अशी माहिती सोपानकाका यांनी दिली. आम्हीदेखील त्यांच्या कुटुंबाचा एक भाग आहोत, अशी आमची भावना त्या वेळी झाल्याचे सोपानकाका यांनी रेडिफ डॉट कॉमला सांगितले.
लग्नसोहळ्यासोबतच दोघांनाही राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्यासोबत विशेष नाश्त्यासाठी निमंत्रित करण्यात आले. राणी एलिझाबेथ यांनीही आमचे स्वागत केले. तसेच आम्ही भेट दिलेली साडी आणि कोल्हापुरी सँडल खूप आवडले असल्याचे राणीने सांगितले. या लग्नसोहळ्यातली मला आवडलेली ही सर्वाधिक चांगली भेटवस्तू होती, असेही राणीने सांगितले असल्याचे मेडगे आणि सोपानकाका यांनी सांगितले.
चार्ल्स यांचे ज्येष्ठ पुत्र प्रिन्स विल्यम आणि त्यांची पत्नी केट मिडलटॉन यांच्या लग्नसोहळ्यालादेखील डबेवाल्यांच्या प्रतिनिधींनी हजेरी लावली होती. या वेळी डबेवाल्यांकडून केट यांना पैठणी साडी भेट देण्यात आली होती. यासोबतच वधू-वरांना विठ्ठलाची मूर्तीही भेट देण्यात आली. त्याचबरोबर २०१८ साली हॅरी आणि मेगन यांच्या लग्नसोहळ्यालाही डबेवाल्यांनी पैठणी आणि कुर्ता-पगडी लंडनला पाठविली होती.
राणी एलिझाबेथ यांच्या मृत्यूनंतर शोक
राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे सप्टेंबर २०२२ मध्ये निधन झाले. या वेळी डबेवाला संघटनेकडून शोक व्यक्त करण्यात आला. सुभाष तळेकर यांनी त्या वेळी सांगितले की, राणी एलिझाबेथ यांच्या मृत्यूची बातमी ऐकून आम्हाला दुःख वाटले. त्यांच्याप्रति आम्ही श्रद्धांजली व्यक्त करतो. मेडगे यांनी २००५ साली राणी एलिझाबेथ यांची लंडन येथे भेट घेतली होती. मेडगे यांनी शोक व्यक्त करताना म्हटले की, राणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर आमच्या घरातल्या व्यक्तीचे निधन झाल्याची भावना निर्माण झाली. आम्ही अतिशय साधी माणसे असतानादेखील त्यांनी आमच्यावर प्रेमाचा वर्षाव केला होता, त्यावरूनच त्यांचे मोठेपण दिसले होते.