|| शैलजा तिवले

बॉलीवूडचे प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक बप्पी लाहिरी यांचे स्लीप अ‍ॅप्नीया या विकाराने निधन झाले आहे. निद्रा श्वसनबाधा विकार – ‘स्लीप अ‍ॅप्नीया’ या आजारामध्ये झोपेत असताना अचानक श्वास घेणे थांबते आणि नंतर अचानक सुरू होते. या काळात शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. श्वास बंद झाल्यावर डोळे उघडतात आणि जागे होताच व्यक्ती वेगाने श्वास घेऊ लागते. दीर्घकाळ उपचार न केल्यास निद्रा श्वसनबाधा विकार – ‘स्लीप अ‍ॅप्नीया’ खूप धोकादायक ठरू शकतो.

Paresh Mokashi, Prashant Damle as Hitler,
प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले हिटलरच्या भूमिकेत, परेश मोकाशी यांच्या मु. पो. बोंबिलवाडीला हिटलर सापडला
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
Veteran theater writer and director Anand Mhasvekar passed away
ज्येष्ठ नाट्य लेखक आणि दिग्दर्शक आनंद म्हसवेकर यांचे निधन
Phulvanti Marathi movie based on the novel
कादंबरीवर आधारित ‘फुलवंती’
Ankhi ek Mohenjo Daro Documentary Review
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : दृश्यसंस्कृती प्रसाराचा प्रवास…
devara public review
Devara Public Review: प्रेक्षकांना कसा वाटला ‘देवरा: पार्ट १’चित्रपट? प्रतिक्रिया देत म्हणाले, “दिग्दर्शन खूपच….”
Famous writer and director Madhura Jasraj passed away
प्रसिद्ध लेखिका, दिग्दर्शिका मधुरा जसराज यांचे निधन
Navra Maza Navsacha 2 Bharud song Viral
Navra Maza Navsacha 2: “मुकूट घालीन ५० खोक्यांचा…”, सिद्धार्थ जाधवचं बाप्पाला साकडं; व्हायरल होणाऱ्या भारूडात राजकीय चिमटे, ऐका…

रात्री वारंवार झोपमोड होतेय?

बऱ्याच वेळेला आपल्याला हा विशिष्ट विकार कशामुळे झाला हे समजत नाही. पण संशोधनाअंती कळते की, तो आजार आपल्याला निद्रानाशामुळे झाला. रात्रीची झोप अपुरी राहिल्यामुळे दिवस मरगळलेल्या अवस्थेत जाणे हा त्रास अनेकांना होत असतो. रात्रीची झोप पूर्ण होत नाही हे लक्षात येत असले तरी ती पूर्ण का होत नाही, वारंवार झोपेदरम्यान अडथळा येण्याचे कारण काय हे कळत नाही. ते शोधण्यासाठी ‘स्लीप अ‍ॅप्नीया’ तपासणी उपयुक्त ठरू शकते. ‘स्लीप अ‍ॅप्नीया’ हा केवळ एकच एक विकार नाही तर अनेक आजारांचे मूळ या आजारात दडले आहे.

‘स्लीप अ‍ॅप्नीया’मध्ये शरीरात काय बदल होतात?

सर्वसाधारणपणे प्रौढ व्यक्तींना सात ते आठ तास आणि लहान मुलांना नऊ ते दहा तास झोपेची गरज असते. शरीराची झीज भरून काढण्यासाठी हे अत्यावश्यक आहे; परंतु अनेक रुग्णांना झोपेदरम्यान श्वासोच्छवास करण्यास विविध कारणांनी अडथळा निर्माण होतो. त्यामुळे त्यांची झोप पूर्ण होत नाही. या अडथळय़ाला ‘स्लीप अ‍ॅप्नीया’ किंवा निद्रा श्वसनबाधा विकार म्हणतात. ‘अ‍ॅप्नीया’ म्हणजेच काही वेळेस श्वास थांबणे. निद्रानाश हा आजार मानसिक आजाराशी संबंधित असून याचा आणि ‘स्लीप अ‍ॅप्नीया’चा संबंध नाही. ‘स्लीप अ‍ॅप्नीया’ झोपेदरम्यानच्या श्वसनक्रियेतील अडथळय़ासंदर्भातील आजार आहे. श्वसनास अडथळा होण्यासोबतच झोपेत श्वसनाचा वेग मंदावणे, हेदेखील या आजाराचे एक लक्षण आहे.

‘स्लीप अ‍ॅप्नीया’ विकार होण्यामागे कारण कोणते?

‘स्लीप अ‍ॅप्नीया’चे सर्वात प्रमुख कारण म्हणजे लठ्ठपणा. लठ्ठपणामुळे शरीरांतर्गत चरबीचा एक थर जमा होतो. त्यामुळे अवयवांना काम करताना अतिरिक्त ताण सोसावा लागतो. अनेकदा घसा किंवा मानेभावेती चरबीचा थर जमा होतो. त्यामुळे श्वसनक्रियेत अडथळा होत असतो. अशा वेळी शरीराला आवश्यक तितका ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही. त्या वेळी मेंदू सतर्क होतो आणि झोपेच्या अधीन झालेली व्यक्ती जागी होते. याव्यतिरिक्त पडजीभ किवा जीभ जाड असणे, नाकाचे हाड वाढणे, सातत्याने थंड पदार्थ खाल्ल्यामुळे टॉन्सिल्स वाढणे यामुळे घोरण्याचे प्रमाण वाढून श्वसनक्रियेत अडथळा निर्माण होतो. मद्यपान आणि धूम्रपान यामुळेही श्वसनगती मंदावते.

‘स्लीप अ‍ॅप्नीया’ची लक्षणे कोणती?

या आजारात रुग्णाला दिवसभर झोप येत राहते आणि ती आवरणेही अवघड होते. त्यामुळे जिथे शक्य होईल तेथे रुग्ण झोपतो. तसे पाहता सर्वसाधारण व्यक्तीलाही अनेकदा झोपेदरम्यान जाग येत असते. मात्र रात्रभरात १५ ते २० पेक्षा अधिक वेळा जाग येत असेल तर वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक आहे. तसेच एकाग्रता नसणे, कामात मन न लागणे ही लक्षणे ‘स्लीप अ‍ॅप्नीया’मध्ये पाहावयास मिळतात.

‘स्लीप टेस्ट’ काय आहे?

रुग्णाची साधारण तपासणी केल्यानंतर त्याच्या झोपेची तपासणी केली जाते. रुग्णाचे वजन, शरीर द्रव्यमान निर्देशांक (बीएमआय), उंची मोजली जाते. नंतर रुग्णाच्या नाकाला नलिका जोडल्या जातात. छातीला आणि हाताच्या बोटांना पल्सोमीटर जोडले जाते. ही यंत्रे संगणकाला जोडून त्यावरील ‘पॉलिसोनिनोग्राफी’ या सॉफ्टवेअरच्या साह्याने संबंधित रुग्णाच्या झोपेचा अभ्यास केला जातो. साधारण रात्री नऊ वाजता ही यंत्रे लावली जातात. रात्रभर झोपेदरम्यान रुग्णाला किती वेळा जाग आली, याची पाहणी केली जाते. २० पेक्षा अधिक वेळा झोपमोड झाली असल्यास त्याची एन्डोस्कोपी केली जाते. त्यानंतर नाकातून दुर्बीण घालून अंतर्गत भागाची तपासणी केली जाते. त्यातून झोपेला अडथळा ठरणारा भाग शोधला जातो आणि त्याआधारे रुग्णाला वैद्यकीय सल्ला दिला जातो. याला स्लीप टेस्ट म्हटले जाते. मुंबईतील कूपर रुग्णालयात ही चाचणी मोफत उपलब्ध आहे.

‘स्लीप अ‍ॅप्नीया’चा धोका कोणता?

थकवा, वजन वाढणे, मधुमेह बळावणे, रक्तदाब वाढणे, हृदयविकार, पक्षाघात आणि झोपेत मृत्यू आदी विकार संभवतात. मधुमेहाच्या रुग्णांमध्ये ही समस्या प्रामुख्याने आढळते.

‘स्लीप अ‍ॅप्नीया’वर उपचार काय असतात?

दुर्बिणीतून एन्डोस्कोपी केल्यानंतर नेमका अडथळा लक्षात येतो. अनेकदा हा आजार जीभ, पडजीभ, टॉन्सिल, लठ्ठपणा यांच्या एकत्रित समस्येमुळेही होतो. मात्र एका वेळी दोन किंवा तीन भागांवर शस्त्रक्रिया करणे चांगले. काही वेळा अशा रुग्णांना ‘सी-पॅप’ हे यंत्र दिले जाते. रात्री झोपताना हे यंत्र नाकाला लावून झोपायचे असते. या यंत्रातून ऑक्सिजन पुरविला जातो. त्यामुळे नैसर्गिक श्वसनक्रियेत ऑक्सिजनपुरवठा कमी झाला तरी या यंत्राच्या मदतीने ऑक्सिजन पुरवला जातो. शस्त्रक्रिया केल्यानंतर रुग्णाने वजन नियंत्रणात ठेवले नाही तर हा त्रास पुन्हा उद्भवू शकतो. यासाठी ‘स्लीप अ‍ॅप्नीया’ झाल्यानंतर रुग्णाने सजगतेने आहार आणि व्यायामाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. झोपेशी संबंधित समस्यांवर घरगुती उपायांनी फरक पडत नसेल तर निद्राविकारतज्ज्ञांचा सल्ला घेणे जरुरीचे  असते. ‘स्लीप अ‍ॅप्नीया’चे परिणाम गंभीर असले तरी त्यावर १०० टक्के यशस्वी होणारे उपचार उपलब्ध आहेत.

shailaja.tiwale@expressindia.com