वंदे मेट्रो ही वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांचा एक छोटा अवतार आहे. केंद्र सरकार डिसेंबर २०२३ पर्यंत ही ट्रेन सुरू करण्याच्या तयारीत आहे. २०२४-२५ मध्ये ट्रेनचे उत्पादन वाढवण्याचा सरकारचा मानस आहे. नवीन ट्रेन ही एका शहरातून दुसऱ्या शहरात जाणारे विद्यार्थी आणि नोकरी शोधणार्यांसाठी एक स्वस्त आणि सुलभ पर्याय बनणार आहे. वंदे मेट्रोमुळे एका शहरातून दुसऱ्या शहरात नोकरी शोधण्यासाठी जाणाऱ्या व्यक्ती आणि विद्यार्थ्यांच्या वेळेची बचत होणार आहे. तसेच एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठी जागतिक दर्जाच्या वाहतुकीचा अनुभवही मिळणार आहे. वंदे मेट्रोमुळे लोकल ट्रेनमधील गर्दी कमी होण्यास मदत होऊ शकते. डिसेंबरपर्यंत ही ट्रेन पूर्णपणे तयार होण्याची शक्यता आहे.
तुम्हीसुद्धा वंदे मेट्रोमध्ये कोणती वैशिष्ट्ये आहेत हे जाणून घेऊ शकता. तसेच वंदे भारत एक्सप्रेस वंदे मेट्रोपेक्षा कशी वेगळी आहे हेसुद्धा आम्ही सांगणार आहोत. वंदे मेट्रो ही नवीन तंत्रज्ञानाने तयार केली जात असलेली ट्रेन आहे. ती १०० किमीपेक्षा कमी अंतरावरील शहरांमध्ये दिवसातून ४ किंवा ५ वेळा धावू शकते, जी प्रवाशांसाठी खूप आरामदायक आणि परवडणारी असेल. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेष म्हणजे वंदे मेट्रो ही वंदे भारत एक्सप्रेसपेक्षा वेगवान पद्धतीने धावेल. त्यामुळे प्रवाशांच्या वेळेचीही मोठी बचत होणार आहे. या ट्रेनमध्ये प्रवाशांना वेगवान रेल्वेसारख्या सुविधेचा अनुभव मिळणार आहे. याशिवाय या मेट्रोमध्ये सुमारे ८ डबे असतील. ही वंदे मेट्रो वंदे भारतपेक्षा थोडी लहान असेल, तर वंदे भारत एक्स्प्रेसला १६ डबे असतील.
ही मेट्रो दिवसातून ४ ते ५ वेळा धावेल
वंदे भारत एक्सप्रेस गाड्या लांब पल्ल्याच्या शहरांदरम्यान धावतात, परंतु वंदे मेट्रो त्यांच्या दरम्यानच्या लहान अंतराच्या शहरांमध्ये धावेल. वंदे मेट्रो वंदे भारतपेक्षा जास्त वेळा धावेल. वंदे मेट्रोचे प्रवासी दिवसातून किमान ४ ते ५ वेळा यातून प्रवास करू शकतात. याशिवाय दैनंदिन प्रवाशांसाठी ते अतिशय स्वस्त आणि सोयीस्कर होणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांचा प्रवास पूर्वीपेक्षा सोपा होणार आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.
वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये विशेष काय?
विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रात पहिली ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस धावली. या रेल्वेमुळे मुंबई-पुणे हा प्रवास आता केवळ अडीच तासांमध्ये पूर्ण करता येतोय. ‘डेक्कन क्वीन’नंतर वंदे भारत सध्या मुंबई-पुणे मार्गावर धावणारी सर्वात जलद रेल्वे आहे. डेक्कन क्वीनने मुंबई-पुणे अंतर पूर्ण करण्यासाठी ३ तास १० मिनिटांचा कालावधी लागतो. मात्र ‘वंदे भारत’ रेल्वे सुरू झाल्यामुळे या प्रवासाचा कालावधी ४० मिनिटांनी कमी होऊन तो अडीच तासांवर आला आहे. देशातील दोन महत्त्वपूर्ण शहरातील प्रवास अधिक जलद व्हावा, यासाठी वंदे भारत या रेल्वे चालवण्यात येते. येत्या दोन वर्षांत तब्बल ४०० वंदे भारत रेल्वे संपूर्ण देशभरात चालवण्यात येणार असल्याचं सांगितलं जातंय. देशात वाराणसी ते नवी दिल्ली, नवी दिल्ली ते कटरा आणि हावडा ते रांची या रेल्वेमार्गांवर वंदे भारत रेल्वे धावत आहेत. भारतीय रेल्वेची ‘वंदे भारत’ रेल्वे चेन्नईमध्ये तयार केलीय. या एक्स्प्रेसचं प्रत्येक युनिट युरोपियन एक्स्प्रेसच्या तुलनेत ४० टक्के स्वस्त असल्याचं सांगितलं जात आहे. चेन्नईतील इंटिग्रेटेड कोच फॅक्टरी (ICF) मधील LHB शेडमध्ये वंदे भारत एक्स्प्रेसच्या डब्यांची निर्मिती केलीय. पंतप्रधानांची महत्त्वाकांक्षी योजना ‘मेक इन इंडिया’ला केंद्रस्थानी ठेवून ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ची रचना आणि निर्मिती भारतात करण्यात आल्याचं सरकारकडून सांगण्यात येत आहे. वंदे भारत रेल्वेचे डबे प्रवाशांसाठी आरामदायी आणि सुसज्ज आहेत. या एक्स्प्रेसमध्ये एकूण १६ एसी डबे आहेत, ज्यापैकी दोन डबे एक्झिक्युटिव्ह क्लाससाठी ठेवण्यात आले आहेत.
हेही वाचाः विश्लेषण: रानटी हत्ती गडचिरोलीत वारंवार का येताहेत?