– उमाकांत देशपांडे
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही आमदारांसह बंड केले, तरी आपण न्यायालयात जाणार नाही, जनतेमध्ये जाऊ, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केले आहे. परंतु कायदेशीर लढाई अपरिहार्य दिसते. तसेच विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला मिळण्याची शक्यता आहे.
अजित पवार यांच्या बंडानंतर कोणते कायदेशीर मुद्दे उपस्थित झाले आहेत?
अजित पवार यांनी आपल्याला बहुतेक आमदार-खासदारांचे समर्थन असल्याचे सांगून राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्षनाव आणि घड्याळ निवडणूक चिन्हावर दावा केला आहे. अजित पवारांबरोबर किती आमदार, खासदार आणि अन्य पदाधिकारी आहेत, हे पूर्णपणे उघड झालेले नाही. त्यांच्याबरोबर असलेले आमदार व अन्य नेते गेल्या वेळेप्रमाणे शरद पवारांकडे परत फिरण्यास सुरुवात झाल्याने अजित पवारांबरोबर किती आमदार व नेते राहतात, हाही प्रश्न आहे. त्यामुळे शिवसेनेप्रमाणेच मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा, हा मुद्दा उपस्थित झाला आहे. शरद पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांची विरोधी पक्षनेते आणि मुख्य प्रतोदपदी नियुक्ती केली आहे. विधानसभेत माझाच पक्षादेश (व्हिप) पाळावा लागेल, असे आव्हाड यांनी सांगितले आहे. त्यामुळे आमदारांनी पक्षादेश कोणाचा पाळायचा, या वादाला तोंड फुटणार आहे.
बंडखोर आमदारांना अपात्र ठरविता येईल का?
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे एकत्र असून अजित पवारांबरोबर २२-२५ आमदार असल्याचा दावा करण्यात आला असला तरी घरवापसी सुरू झाली आहे. अजित पवारांबरोबर असलेल्या आमदारांची संख्या एकूण ५४ आमदारांच्या दोन तृतीयांशपेक्षा कमी आहे. विरोधी पक्षात असताना सत्ताधाऱ्यांबरोबर सरकारमध्ये जाण्याची बंडखोरांची कृती ही पक्षविरोधी ठरू शकते. त्यामुळेच शरद पवार यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवारांसह नऊ मंत्र्यांना अपात्र ठरविण्यासाठी विधानसभा अध्यक्षांकडे याचिका सादर केली आहे. पण अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सत्ताधारी पक्षाचे असल्याने अपात्रतेच्या याचिका सुनावणीसाठी एक-दीड वर्षे प्रलंबित राहिल्यास बंडखोर आमदारांना अपात्रतेचा धोका नाही.
विधानसभेत पक्षादेश (व्हिप) कोणाचा चालणार? विरोधी पक्षनेतेपद कोणाकडे जाणार?
राज्य विधिमंडळाचे अधिवेशन १७ जुलैपासून सुरू होत असून विधानसभा अध्यक्षांना व्हिप कोणाचा चालणार आणि विरोधी पक्षनेतेपद कोणाकडे याबाबतही निर्णय द्यावा लागेल. राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार असून ते काही आमदारांबरोबर सत्ताधारी पक्षाबरोबर गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली आहे. मूळ पक्ष कोणाचा,या वादावर निर्णयासाठी बराच कालावधी लागेल. तोपर्यंत ४५ आमदार असलेला काँग्रेस हा सर्वात मोठा विरोधी पक्ष असल्याने विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे जाण्याची शक्यता आहे. पक्षप्रमुखाला प्रतोद नियुक्तीचा अधिकार असल्याचा निर्वाळा शिवसेना फुटीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने दिला आहे.
हेही वाचा : जयंत पाटलांच्या मागणीनुसार अजित पवारांसह ९ आमदारांना अपात्र करणार का? राहुल नार्वेकर म्हणाले, “मला…”
सध्या सरकारकडे बहुमत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे किती सदस्य अजित पवारांकडे व किती शरद पवारांकडे आहेत, हे विधानसभेत सिद्ध करायचे असेल आणि पक्षादेश न पाळल्यास आमदारांना अपात्र ठरवायचे असेल, तर विरोधकांना सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणावा लागेल. पण सरकारवर विश्वासदर्शक ठराव मंजूर झाल्याने आता पुन्हा पावसाळी अधिवेशनात लगेच त्यावर सभागृहात मतदान होईल का, पुरवणी मागण्यांवर मतदान होणार का, यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून राहतील. मात्र विरोधी पक्षनेता आणि प्रतोद कोण, यावर विधानसभा अध्यक्षांना निर्णय द्यावा लागेल.
राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्षनाव आणि घड्याळ हे निवडणूक चिन्ह अजित पवारांना मिळणार की शरद पवारांकडे राहणार?
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि लोकसभा, विधानसभा निवडणुका लक्षात घेता पक्षनाव व चिन्हाबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाला पुढील काही महिन्यात सुनावणी घेऊन निर्णय द्यावा लागेल. आयोग कोणत्या गटाला पक्षनाव व चिन्ह देणार, त्यानुसार विधानसभा अध्यक्षही व्हिप, अपात्रता व अन्य मुद्द्यांचा विचार करतील. विधानसभा अध्यक्ष आणि निवडणूक आयोगाचा निर्णय अजित पवारांच्या बाजूने दिला गेल्यास शरद पवार गटाला उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याशिवाय पर्याय नाही.