– संदीप नलावडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काही अन्नपदार्थांमध्ये साखरेला पर्याय म्हणून ‘ॲस्पारटेम’ हा रासायनिक पदार्थ वापरला जातो. मात्र ॲस्पारटेम या पदार्थामुळे कर्करोग होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे. जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) स्वीटनर म्हणून वापरला जाणारा हा पदार्थ कर्करोगकारी पदार्थ म्हणून घोषित करण्याची शक्यता आहे. मुख्यत: शीतपेये, च्युईंगम, आइसक्रीम या पदार्थांमध्ये वापरल्या जाणाऱ्या ॲस्पारटेमवर डब्ल्यूएचओ बंदी घालण्याचीही शक्यता आहे.

ॲस्पारटेम म्हणजे नक्की काय?

मधुमेहींना पर्याय म्हणून अनेकदा कृत्रिम साखर असलेले पदार्थ दिले जातात. खाद्यनिर्मिती करणाऱ्या अनेक कंपन्या कृत्रिम साखर म्हणजेच स्वीटनरचा वापर असलेले पदार्थ खास मधुमेहींसाठी तयार करतात. ॲस्पारटेम हा अशाच प्रकारचा कृत्रिम गोड पदार्थ आहे. रासायनिकदृष्ट्या ॲस्पारटेममध्ये नैसर्गिक अमिनो आम्ल, एल-ॲस्पार्टिक आम्ल असते. १९६५ मध्ये अमेरिकी औषधनिर्माण कंपनी ‘जीडी सीअर्ल’चे रसायन शास्त्रज्ञ जेम्स एम. स्लॅटर यांनी ॲस्पारटेमचा शोध लावला. अल्सरविरोधी औषधावर संशोधन करताना एका रासायनिक पदार्थाची चव त्यांना गोड लागली. त्यावर अधिक संशोधन केल्यानंतर त्यांनी यास ॲस्पारटेम नाव दिले. अमेरिकी अन्न व औषधनिर्माण प्रशासनाच्या मते ॲस्पारटेम हे सामान्य साखरेपेक्षा २०० पट गोड आहे. एक ग्रॅम ॲस्पारटेममध्ये दोन चमचे (सुमारे आठ ग्रॅम) साखर असते. उष्मांक कमी करणारे, वजन कमी करण्याचा प्रयत्न करणारे आणि मधुमेही नागरिक ॲस्पारटेमला प्राधान्य देतात. अनेकदा डाएट कोलावर शून्य कॅलरीज असे लिहिले असले तरी ॲस्पारटेम असलेल्या डाएट कोलामध्ये सात किलो कॅलरीज असते, जी सामान्य कोलापेक्षाही अधिक असते. भारतामध्ये मिळणाऱ्या साखरमुक्त गोल्ड टॅबलेट किंवा पावडरमध्येही ॲस्पारटेम असते.

‘डब्ल्यूएचओ’चे हे मूल्यांकन काय आहे?

४० वर्षांहून अधिक काळ ॲस्पारटेम या रासायनिक पदार्थावर अभ्यास केला जात आहे. अनेक अभ्यासांनी वारंवार सांगितले आहे की ॲस्पारटेममुळे कर्करोगाचा धोका नाही. मात्र नव्या संशोधनानुसार ॲस्पारटेममुळे कर्करोग होण्याची शक्यता आहे. मात्र डब्ल्यूएचओमधील दोन भिन्न संस्था ॲस्पारटेमच्या उपयुक्ततेचा आढावा घेत आहेत. त्यापैकी आंतरराष्ट्रीय कर्करोग संशोधन संस्थेने (आयएआरसी) गेल्या आठवड्यातच फ्रान्समध्ये बाह्य तज्ज्ञांची बैठक घेतली आणि संयुक्त अन्नपदार्थ परीक्षणतज्ज्ञ समिती (जेईसीएफए) लवकरच याबाबत आपला अहवाल देणार आहे. ॲस्पारटेम धोकादायक आहे की नाही, यावर आतापर्यंत उपलब्ध असलेल्या महत्त्वाच्या संशोधनाच्या आधारे आयएआरसीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्याच वेळी ॲस्पारटेम कर्करोगास कारणीभूत ठरत असल्याचा मुद्दा मांडण्यात आला. परंतु कृत्रिम स्वीटनर नेमका किती घेणे सुरक्षित आहे, यावर चर्चा झालेली नाही. खाद्यपदार्थांमधील कृत्रिम घटकांबाबत डब्ल्यूएचओने नेमलेल्या समितीकडून नियामकांशी याबाबत चर्चा केली जाणार आहे. या दोन्ही संस्थांच्या तज्ज्ञांशी चर्चा करून १४ जुलै रोजी डब्ल्यूएचओ ॲस्पारटेमबाबत निर्णय घेणार आहे. हा कृत्रिम स्वीटनर कर्करोगाला कारणीभूत ठरत असल्याची धक्कादायक बाब समोर आली असली तरी १४ जुलैलाच डब्ल्यूएचओकडून याबाबत अधिकृत घोषणा होणार आहे. यामुळे आगामी काळात खाद्यपदार्थ उद्योगांमध्ये त्याचा वापर बंद होण्याची शक्यता आहे.

‘रॉयटर्स’ने याबाबत काय बातमी दिली आहे?

जागतिक आरोग्य संघटनेची कर्करोग संशोधन शाखा ॲस्पारटेम या जगात सर्वाधिक वापरला जाणाऱ्या कृत्रिम साखरेला कर्करोगजन्य पदार्थ म्हणून सूचिबद्ध करेल, अशी बातमी राॅयटर्सने २९ जून रोजी प्रसिद्ध केली. आयएआरसी ही कर्करोग संशोधन शाखा पुढील महिन्यात हा निर्णय घेण्याची शक्यता आहे, असे रॉयटर्सने अज्ञात स्रोताच्या हवाल्याने वृत्त दिले आहे. अनेक अभ्यासांनी वारंवार सांगितले आहे की ॲस्पारटेममुळे कर्करोगाचा धोका नाही. मात्र डब्ल्यूएचओची सूची जर आली तर, त्या आधीचे निष्कर्ष बाद होतील, असे रॉयटर्सच्या वृत्त अहवालात म्हटले आहे.

कोणत्या पदार्थांमध्ये ॲस्पारटेम आढळतो?

कोका कोलाच्या डाएट सोडापासून अनेक शीतपेये आणि खाद्यपदार्थांमध्ये ॲस्पारटेम या कृत्रिम स्वीटनरचा वापर केला जातो. शीतपेये, साखरमुक्त च्युईंगम, साखरमुक्त आइस्क्रीम, तृणधान्ययुक्त नाश्ता अशा पदार्थांमध्ये ॲस्पारटेमचा वापर केला जातो. जगातील अनेक खाद्यनिर्मिती उद्योग खास मधुमेहींसाठी ‘ॲस्पारटेम’युक्त खाद्यपदार्थ बनवतात. भारतामध्ये साखरमुक्त गोल्डमध्ये (टॅबलेट व पावडर) ॲस्पारटेम असते.

हेही वाचा : विश्लेषण : स्तन प्रत्यारोपणाचा पर्याय आजही दुर्लक्षित? कर्करोगग्रस्त महिलांमध्ये जागृती आवश्यक

खाद्यनिर्मिती उद्योगाची प्रतिक्रिया काय?

मधुमेहींसाठी खाद्यपदार्थ बनविणाऱ्या अनेक उद्योगांनी ॲस्पारटेम या कृत्रिम स्वीटनरचा वापर करून खाद्यपदार्थांची निर्मिती केली. मात्र त्यावर जर बंदी आली तर उद्योग जगतातून तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे. ॲस्पारटेम हा कर्करोगकारी पदार्थ असल्याच्या बातम्यांना अनेक उद्योगांकडून आक्षेप घेण्यात आला आहे. ‘इंटरनॅशनल स्वीटनर्स असोसिएशन’ने आयएआरसी ही अन्नसुरक्षा संस्था नसल्याचाच मुद्दा उपस्थित केला आहे. ॲस्पारटेमबाबतचे संशोधन पुरेसे शास्त्रीय नसून, केवळ सध्या उपलब्ध असलेल्या वरवरच्या संशोधनाचा यासाठी आधार घेण्यात आल्याचा दावाही करण्यात आला आहे. अनेक मोठ्या खाद्यनिर्मिती कंपन्यांनाही याला विरोध दर्शविला आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Analysis of artificial sweeteners aspartame cancer risk who print exp pbs
Show comments