– हृषिकेश देशपांडे
दक्षिणेकडे केरळमधील विशिष्ट अशा सामाजिक परिस्थितीमुळे भारतीय जनता पक्षाला विशेष पाय रोवता आलेले नाहीत. विधानसभेला एखाद्या जागेपलीकडे पक्षाची मजल गेलेली नाही. राज्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोठे काम असूनदेखील, राजकारणात त्याचा लाभ भाजपला मिळालेला नाही. मात्र आता गेल्या काही वर्षांत परिस्थिती बदलत आहे. राज्यात जवळपास १८ टक्के असलेल्या ख्रिश्चन समुदायाला साद घालण्याचा भाजपचा सातत्याने प्रयत्न आहे. अलीकडेच ईस्टरनिमित्त केरळमध्ये भाजप नेत्यांनी घरोघरी जाऊन ख्रिश्चन समुदायाशी संवाद साधला. त्यातच भाजपसाठी एक अनुकूल घडामोड आहे. राज्यातील ख्रिश्चन समुदायातील प्रभावी नेते जॉनी नेल्लोर यांनी केरळ काँग्रेसच्या जोसेफ गटाचा राजीनामा दिला. ते आता सहकाऱ्यांसह स्वतंत्र पक्ष स्थापन करणार आहेत. हा पक्ष भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
दोन आघाड्यांभोवती राजकारण…
केरळ काँग्रेसचा जोसेफ गट काँग्रेसप्रणीत संयुक्त लोकशाही आघाडीचा घटक आहे. तर राज्यात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाच्या आधारे डावी आघाडी सत्तेत आहे. या दोन आघाड्यांभोवतीच राज्यातील राजकारण फिरत आहे. तिसऱ्या भिडूला येथे फारशी संधी नाही. भाजपने भारत धर्म जन सेना व इतर काही छोट्या गटांना बरोबर घेऊन २०२१ ची विधानसभा निवडणूक लढवली. पक्षाला एकही जागा मिळाली नाही, सात मतदारसंघांत ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले. सातत्याने राज्यात भाजप विविध प्रयोग करत आहे, मात्र यश मिळत नाही. ख्रिश्चनबहुल अशा ईशान्येकडील राज्यांमध्ये भाजपला अलीकडे विधानसभा निवडणुकीत चांगले यश मिळाले. त्यानंतर खुद्द पंतप्रधानांनीच दिल्लीतील पक्ष कार्यालयात झालेल्या सभेत केरळमध्येही भाजप जिंकेल असा विश्वास व्यक्त केला होता. त्यातूनच भाजपचे पुढचे लक्ष्य केरळ असल्याचे स्पष्ट झाले. भाजपनेही राज्यात ख्रिश्चन समुदायावर लक्ष केंद्रित केले आहे. त्या दृष्टीने या घडामोडीकडे पाहिले जात आहे.
नव्या पक्षाचा उदय…
मध्य केरळमधील काही नेत्यांना बरोबर घेऊन नेल्लोर हे नवा पक्ष स्थापन करतील. राष्ट्रवादी प्रगतिशील पक्ष असे त्यांच्या प्रस्तावित पक्षाचे नाव असेल अशी चर्चा आहे. १९९१, १९९६ तसेच २००१ असे तीन वेळा ते आमदार होते. ते प्रख्यात वकील असून, एक अनुभवी राजकारणी म्हणून ते परिचित आहेत. याबाबत ख्रिश्चन समुदायातील काही नेत्यांची बैठक झाली. त्याला सहा माजी आमदार उपस्थित होते. हे सर्व जण राजकारणात फारसे सक्रिय नसल्याने या घडामोडींशी संबंधित व्यक्तीने स्पष्ट केले. तरीही या नव्या पक्षाची दखल विरोधकांनाही घ्यावीच लागेल. आपला नवा पक्ष हा ख्रिश्चनांपुरता मर्यादित नसेल तर तो धर्मनिरपेक्ष तसेच राष्ट्रीय विचारांचा असेल असे नेल्लोर यांनी नमूद केले आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या समस्या मांडू. विशेषत: मध्य केरळमधील रबर उत्पादकांचे प्रश्न हाती घेऊ असे त्यांनी स्पष्ट केले. रबर उत्पादकांना भाव मिळत नसल्याने ते अडचणीत आल्याचे नेल्लोर यांनी सांगितले. राज्यातील सत्तारूढ डाव्या आघाडीवरही त्यांनी टीका केली आहे. त्यांनी रबराच्या भावाबाबतचे आश्वासन पाळले नसल्याचा नेल्लोर यांचा आरोप आहे. भाजपबरोबरील युतीबाबत आताच बोलणे कठीण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मध्य केरळमधील राजकारण
मध्य केरळमध्ये ख्रिश्चन समुदायातील विविध गट राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावतात. केरळ काँग्रेस मणी गटाचे नेते के. एम. मणी यांचे निधन तसेच पक्षातील सातत्याने फूट यामुळे येथील राजकारण अस्थिरतेचे झाले आहे. त्याचबरोबर केरळमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उम्मन चंडी हे सक्रिय राजकारणातू दूर झाल्याने ख्रिश्चन समुदायातील राजकारणात काहीशी पोकळी निर्माण झाली आहे. त्यामुळेच २०२४ची लोकसभा निवडणूक व पुढे दोन वर्षांनी होणारी केरळ विधानसभा निवडणुकीत भाजप हा ख्रिश्चन समुदायातील या नाराज गटांना बरोबर घेऊन रणनीती आखत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए. के. अँटनी यांचे पुत्र अनिल यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांना फार जनाधार नसला तरी एक संदेश देण्यात भाजपला यश आले आहे. आता नेल्लोर यांच्या पक्षाने जर भाजपशी आघाडी केलीच तर मध्य केरळमधील काही जागांवर त्याचा परिणाम होऊ शकतो. यातून राज्यातील दोन आघाड्यांच्या राजकारणात आता भाजपची दखल विरोधकांनाही घ्यावी लागणार आहे.