– विनायक डिगे
महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. शहरांच्या तुलनेत ग्रामीण भागातील महिलांमध्ये स्तन कर्करोगाचे प्रमाण अधिक दिसते. कर्करोगामुळे अनेक महिलांना स्तन गमवावे लागतात. बदललेल्या शारीरिक ठेवणीचा परिणाम अनेकदा महिलांच्या आत्मविश्वासावरही होतो. स्तन प्रत्यारोपण हा त्यावरील उपाय. मात्र त्याबाबत पुरेशी जागृती असल्याचे दिसत नाही. स्तन प्रत्यारोपण म्हणजे काय? त्याचे काय परिणाम होतात? ते कसे होते? याचा आढावा…
स्तन कर्करोगाची लक्षणे आणि कारणे काय?
स्तनात गाठ तयार होणे, स्तनाच्या त्वचेवर खड्डे पडणे, स्तनाच्या त्वचेवर रंग व पोत बदलणे, स्तनाग्रातून रक्त अथवा रंगहीन स्राव स्रवणे, इतर कर्करोगाप्रमाणे स्तनांच्या कर्करोगाची सुरुवात ही बाहेरील वातावरण आणि आपली आनुवंशिकता याच्याशी निगडीत आहे. स्तनाच्या पेशीत होणाऱ्या बदलांचा संबंध स्त्री संप्रेरकाशी असतो. स्तनाच्या पेशींमध्ये अनिर्बंध वाढ झाल्यास स्तन कर्करोगाची लक्षणे दिसण्यास सुरुवात होते. त्यातील अनेक महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग हा अनुवांशिकतेमुळे होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
स्तन कर्करोगाचा अधिक धोका कुणाला?
स्तन कर्करोगाचे सर्वाधिक प्रमाण हे रजोनिवृत्तीचा कालावधी संपलेल्या महिलांमध्ये अधिक प्रमाणात आढळते. म्हणजेच ४० ते ५५ वयोगटातील महिलांमध्ये स्तन कर्करोगाचे प्रमाण अधिक दिसून येते. बहुतांश महिलांमध्ये स्तन कर्करोग हा अनुवांशिक असल्याचे दिसून आले आहे. त्याचप्रमाणे ज्या महिला गर्भधारणा होऊ नये म्हणून नियमित गोळ्या घेतात, ज्या महिला स्थूल असतात अशांनाही स्तन कर्करोगाचा धोका अधिक असतो.
रोगनिदान कसे केले जाते?
स्त्रिया स्तनाची तपासणी करून, गाठ असेल तर कुठे व कशी आहे? गाठ वाढते आहे का? हे पाहू शकतात. गाठ जाणवली तर डॉक्टरांकडून मॅमोग्राफी, सोनोग्राफी, स्कॅनिंग किंवा रक्ताच्या काही तपासण्या करून खात्री करता येते. स्तनाच्या कर्करोगाची शंका आल्यास डॉक्टर बायोप्सीचा सल्ला देतात. बायोप्सीमध्ये स्तनातील गाठीचा अंश काढून त्याची तपासणी करण्यात येते. या तपासणीमध्ये कर्करोग असल्याचे स्पष्ट झाल्यास गाठ काढून टाकली जाते. काही रुग्णांचे स्तन काढावे लागतात. टाटा मेमोरियाल रुग्णालयामध्ये दरवर्षी १२ हजार रुग्णांवर स्तन कर्करोगाच्या शस्त्रक्रिया करून त्यांचे स्तन काढण्यात येतात.
स्तन गमावण्याची ७७ टक्के महिलांना चिंता
पीआरएस-ग्लोबल या संघटनेने केलेल्या एका सर्वेक्षणानुसार कर्करोग झालेल्या महिलांपैकी ७७ टक्के महिलांना आपले स्तन गमावण्याची चिंता अधिक असल्याचे दिसून आले आहे. या सर्वेक्षणात १० हजार २९९ महिलांशी चर्चा करण्यात आली. त्यात ४८.८ टक्के महिलांना स्तन प्रत्यारोपणाबाबत माहिती असल्याचे आढळले. तर ७७.५ टक्के महिलांना कर्करोगामुळे स्तन गमावण्याची भिती असल्याचे आढळून आले. मात्र त्यातील ७६.५ टक्के महिलांचा स्तन प्रत्यारोपणाला प्राधान्य देण्याकडे कल असल्याचे दिसून आले.
उपचार कसे?
स्तन कर्करोगावर प्रमुख्याने केमोथेरपी केली जाते. मात्र केमोथेरपीमध्ये कर्करोगाच्या पेशींबरोबरच अन्य पेशीही नष्ट होतात. त्यामुळे रुग्णाला अनेक दुष्परिणामांनाही सामारे जावे लागते. त्यामुळे केमोथेरपी ही त्रासदायक ठरते. दुसरी उपचार पद्धत म्हणजे इम्युनो थेरपी. ती काहीशी खर्चिक असली तरी यामध्ये फक्त कर्करोगाच्या पेशीच नष्ट केल्या जातात. तर तिसऱ्या उपचार पद्धतीमध्ये रुग्णाच्या जनुकाच्या साहाय्याने प्रयोगशाळेमध्ये रसायन तयार केले जाते. ते इंजेक्शनच्या माध्यमातून रुग्णाच्या शरीरात सोडल्यानंतर थेट कर्करोगाच्या पेशींवर असलेल्या जनुकांवर हल्ला करून कर्करोगाच्या पेशी नष्ट करते.
स्तन काढल्यावर ते पुन्हा मिळवता येतात का?
टाटा मेमोरियाल रुग्णालयामध्ये दरवर्षी १२ हजार रुग्णांवर स्तन कर्करोगाच्या शस्त्रक्रिया केल्या जातात. त्यातील मोजक्याच महिलांवर स्तन प्रत्यारोपण करण्यात येते. गतवर्षी टाटा मेमोरियल रुग्णालयाने केवळ ७० स्तन प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केल्याचे सुघटनशल्य चिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. विनय शंखधर यांनी सांगितले. स्तन कर्करोग झालेल्या अनेक महिलांना त्यांचे स्तन गमवावे लागतात. मात्र स्तनांची पुनर्रचना किंवा स्तन प्रत्यारोपणाद्वारे स्तन पुन्हा परत मिळवता येतात. महिला वयाच्या कोणत्याही टप्प्यावर आपले स्तन पुन्हा मिळवू शकतात. महिलांमध्ये असलेले अज्ञान आणि माहितीचा अभाव लक्षात घेता टाटा रुग्णालयाने स्तन प्रत्यारोपणासंदर्भात जनजागृती करण्यावर भर दिला आहे.
हेही वाचा : कॉन्टॅक्ट लेन्सेसमुळे कर्करोगाचा धोका?
स्तन प्रत्यारोपण कसे असते?
स्तन कर्करोगामुळे हॉलिवूड अभिनेत्री अँजेलिना जोली हिचे स्तन काढून टाकण्यात आले होते. या घटनेनंतर स्तन कर्करोगाची आणि प्रत्यारोपणाची चर्चा सुरू झाली. कर्करोगामुळे काढण्यात येणाऱ्या स्तनाबाबत लोकांमध्ये जागरुकता निर्माण होण्यास मदत झाली. स्तन प्रत्यारोपणमध्ये महिलांच्या छातीवर स्तनांच्या आकाराचे कप बसविण्यात येतात. यावर त्वचा असल्याने ते खऱ्याखुऱ्या स्तनांप्रमाणे दिसतात. मात्र त्यात कोणत्याही प्रकारच्या रक्तवाहिन्या किंवा दुग्धग्रंथी नसतात. त्यामुळे स्तन प्रत्यारोपण करण्यात येणाऱ्या महिलेचे स्तन अन्य महिलांप्रमाणे दिसत असले तरी त्या बाळाला दूध पाजू शकत नाहीत. मात्र कृत्रिमरित्या बसविण्यात येणाऱ्या या स्तनांमुळे महिलांना त्यांच्या शरीराची रचना अबाधित राखता येत. पाश्चिमात्य देशांत स्तन प्रत्यारोपणाचे प्रमाण अधिक आहे. मात्र भारतात प्रमाण कमी आहे.