– हृषिकेश देशपांडे
Karnataka Nivadnuk 2023 : कर्नाटकमध्ये दहा मे रोजी विधानसभेसाठी मतदान होत आहे. दक्षिणेतील या महत्त्वाच्या राज्यात सत्तेसाठी भाजप विरुद्ध काँग्रेस अशी अटीतटी आहे. कर्नाटकचे राजकारण उत्तर भारताप्रमाणे जातींभोवती प्रामुख्याने केंद्रित आहे. राजकीय पक्षही उमेदवारी देताना जातीचाच विचार करत असल्याचे स्पष्ट झाले.
लिंगायत समाजाचा प्रभाव…
कर्नाटकमधील राजकारणात लिंगायत समाजाचा मोठा प्रभाव आहे. साधारणत: राज्यभरात १५ ते १७ टक्के असणारा हा समाज सुरुवातीला काँग्रेसचा पाठिराखा होता. नंतर तो भाजपकडे वळला. माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते बी. एस. येडियुरप्पा हे राज्यातील लिंगायतांचे प्रमुख नेते मानले जातात. ते भाजपमधून बाहेर पडले तेव्हा २०१३च्या निवडणुकीत भाजपला त्याचा जबर फटका बसला होता. राज्यात केवळ ४० जागाच भाजपला मिळाल्या होत्या. लिंगायत समाजाची मते येडियुरप्पा यांच्या कर्नाटक जनता पक्ष तसेच भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात विभागली होती. पुढे येडियुरप्पा पुन्हा भाजपमध्ये आले. काँग्रेस तसेच धर्मनिरपेक्ष जनता दलाने मोठ्या प्रमाणात लिंगायत समाजातून उमेदवार दिले आहेत. ९२ वर्षीय उमेदवार काँग्रेसचे शमनूर शिवशंकराप्पा हे लिंगायत समाजातील प्रभावी नेते आहे. काही सर्वेक्षणांनुसार लिंगायत समाजाची जवळपास ६० टक्के मते भाजपकडे वळतील असा अंदाज वर्तवला जात आहे. भाजपचे यश हे याच समाजावर अवलंबून आहे.
म्हैसूर पट्ट्यात वोक्कलिगा निर्णायक…
लिंगायतांपाठोपाठ राज्याच्या राजकारणातील प्रभावी असा वोक्कलिगा समाज ११ ते १३ टक्के आहे. जुना म्हैसूर पट्ट्यातील विधानसभेच्या ६६ जागा असलेल्या भागांत तसेच राजधानी बंगळूरु परिसरात हा समुदाय मोठ्या संख्येने आहे. माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा हे या समुदायातील प्रमुख नेते. याखेरीज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार हेही वोक्कलिगा आहेत. धर्मनिरपेक्ष जनता दलाला येथून मोठ्या प्रमाणात मते मिळतात. अलीकडच्या काळात नव्या पिढीने काँग्रेस किंवा भाजपचा पर्याय निवडल्याचे चित्र आहे. विशेषत: शहरी भागांत तरुण वर्ग पर्याय शोधत आहे. काही विश्वसनीय संस्थांच्या सर्वेक्षणात या दोन्ही पक्षांना या समुदायातून प्रत्येकी ३० ते ३५ टक्के मते मिळतील असा अंदाज. भाजपला तेवढा प्रतिसाद नसल्याचे काही सर्वेक्षणातून दिसते.
हेही वाचा : प्रचार संपला आता मतदान आणि निकालाकडे लक्ष; ‘हे’ मुद्दे ठरवणार कोण जिंकणार?
छोट्या समुदायांवरही भिस्त…
या दोन समुदायांनंतर राज्यात १३ टक्के मुस्लीम मते निर्णायक आहेत. काँग्रेसने राज्यात ११ तर धर्मनिरपेक्ष जनता दलाने २३ तर आम आदमी पक्षाने २३ मुस्लीम उमेदवार दिलेत. राज्यातील २२४ मतदारसंघांपैकी भाजपने एकही मुस्लीम उमेदवार दिलेला नाही. आजपर्यंतचे मतदानाचे सूत्र पाहिले तर राज्यात जवळपास ७० टक्क्यांच्या आसपास मुस्लीम मतदान काँग्रेसला होते असे काही सर्वेक्षणांचे आकडे आहेत. याखेरीज कुरबा तसेच वाल्मिकी समुदाय हे प्रत्येकी पाच ते सात टक्के आहे. काँग्रेसचे मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार सिद्धरामैय्या हे कुरबा आहेत. याखेरीज भाजपचे ज्येष्ठ नेते ईश्वराप्पा याच समुदायातून येतात. या समुदायाचे प्रामुख्याने काँग्रेसला अधिक मतदान होईल असा अंदाज आहे.
अनुसूचित जाती १७ टक्के तर आदिवासी ७ टक्के आहेत. या मतांवर भाजप तसेच काँग्रेसची मदार आहे. उमेदवारी देताना त्यांनी छोट्या जातींना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. काँग्रेसने आरक्षण मर्यादा वाढवण्याचे आश्वासन दिले. भाजपला अलीकडे दलितांची मते मोठ्या प्रमाणात पडतात हे दिसून आले आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांत या मतांसाठी चुरस आहे. राज्यात ब्राह्मण तीन ते चार टक्के असून, मराठा समाज तीन टक्के आहे. प्रामुख्याने हा समाज सीमाभागात आहे. प्रत्येक पक्षाने जेथे एखादी जात प्रबळ आहे तेथून तो उमेदवार देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे निवडणुकीत जात हा घटक महत्त्वाचा ठरला आहे.