– अन्वय सावंत

भारताचा युवा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने नुकत्याच झालेल्या विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेचे उपविजेतेपद मिळवले. जेमतेम १८ वर्षांच्या प्रज्ञानंदने अंतिम लढतीत पाच वेळच्या विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसनला कडवी झुंज दिली. मात्र, कार्लसनने आपला अनुभव आणि असाधारण काैशल्य पणाला लावताना जलद ‘टायब्रेकर’मध्ये सरशी साधत विश्वचषकाच्या जेतेपदावर मोहोर उमटवली. प्रज्ञानंदला अंतिम लढत जिंकता आली नसली, तरी त्याने भारतीयांची आणि जगभरातील बुद्धिबळप्रेमींची मने मात्र जिंकली. यामुळे प्रज्ञानंदवरील जबाबदारी वाढली असून चाहत्यांचे त्याच्या कामगिरीकडे आता बारीक लक्ष असेल. आगामी काळात तो कोणत्या महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये खेळताना दिसेल, तसेच भारताचे अन्य कोणते बुद्धिबळपटू प्रतिष्ठेच्या ‘कॅन्डिडेट्स’ स्पर्धेत खेळता यावे यासाठी प्रयत्नशील असतील, याचा आढावा.

Ramesh Chennithala Nana Patole
Congress : बंडखोरांविरोधात काँग्रेस अ‍ॅक्शन मोडवर, मतदानाच्या १० दिवस आधी १६ जण निलंबित
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
Political Parties in Maharashtra Vidhan Sabha Election 2024
रविवार प्रचारवार; घरोघरी भेटी, गृहनिर्माण संकुलांना भेटी, चौक सभा यांना जोर
icc cancels november 11 due to bcci and pcb fight over champions trophy schedule
चॅम्पियन्स करंडकाबाबत संभ्रमच! वेळापत्रक घोषणेचा आजचा कार्यक्रम ‘आयसीसी’कडून रद्द
maharashtra assembly election 2024 uddhav thackeray hoarding
‘प्रकल्प रोखणारे सरकार’ला ठाकरे गटाचे फलकबाजीतून उत्तर
maha vikas aghadi releases manifesto for maharashtra assembly poll 2024
महिला, शेतकऱ्यांवर आश्वासनांची खैरात; मविआचा ‘महाराष्ट्रनामा’ जाहीर
crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?

प्रज्ञानंदचे विश्वचषकातील यश खास का ठरले?

अझरबैजानची राजधानी बाकू येथे झालेली विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धा भारतासाठी अविस्मरणीय ठरली. प्रज्ञानंदसह डी. गुकेश, अर्जुन एरिगेसी आणि विदित गुजराथी या भारताच्या चार बुद्धिबळपटूंनी उपांत्यपूर्व फेरी गाठण्याची किमया साधली. त्यातच प्रज्ञानंदने दोन पावले पुढे जाताना अंतिम फेरीपर्यंतचा मजल मारली. या स्पर्धेत त्याने हिकारू नाकामुरा आणि फॅबिआनो कारूआना यांच्यासारख्या आघाडीच्या बुद्धिबळपटूंना पराभूत केले. त्याने भारतीय सहकारी एरिगेसीवरही सरशी साधली. या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे तो ‘कॅन्डिडेट्स’ म्हणजेच आव्हानवीरांच्या स्पर्धेसाठी पात्र ठरला. कार्लसनविना होणाऱ्या ‘कॅन्डिडेट्स’ स्पर्धेचे जेतेपद मिळवल्यास प्रज्ञानंदला जगज्जेत्या डिंग लिरेनला आव्हान देण्याची संधी मिळेल.

‘कॅन्डिडेट्स’ स्पर्धा कधी होणार?

आठ बुद्धिबळपटूंचा समावेश असलेली ‘कॅन्डिडेट्स’ स्पर्धा पुढील वर्षी एप्रिलमध्ये कॅनडा येथे रंगणार आहे. या स्पर्धेसाठी आतापर्यंत प्रज्ञानंदसह इयान नेपोम्नियाशी (जागतिक लढतीतील गतउपविजेता), कारूआना आणि निजात अबासोव यांनी पात्रता मिळवली आहे. तसेच अन्य आघाडीचे बुद्धिबळपटू या स्पर्धेसाठी पात्र ठरण्याकरिता शर्थीचे प्रयत्न करतील. विश्वचषक विजेत्या कार्लसनने या स्पर्धेतून माघार घेतली असली तरी ‘कॅन्डिडेट्स’ जिंकणे हे प्रज्ञानंदसाठी मोठे आव्हान असेल. या स्पर्धेला अजून सात महिन्यांचा कालावधी शिल्लक असल्याने प्रज्ञानंदला सरावासाठी आणि आपल्या खेळातील उणिवा दूर करण्यासाठी पुरेसा वेळ आहे.

प्रज्ञानंद कशी तयारी करणार?

प्रशिक्षक आरबी रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली नवे तंत्र, खेळाच्या पद्धती आणि चाली शिकण्यासाठी प्रज्ञानंद प्रयत्नशील असेल. विश्वचषकाच्या अंतिम लढतीतील ‘टायब्रेकर’मध्ये कार्लसनने आपला सर्वोत्तम खेळ केल्यानंतर प्रज्ञानंदकडे त्याचे उत्तर नव्हते. या लढतीतून प्रज्ञानंदला बरेच काही शिकायला मिळाले असेल. मात्र, एकंदरीत या स्पर्धेत नाकामुरा, कारूआना, कार्लसन यांसारख्या प्रथितयश आणि कसलेल्या बुद्धिबळपटूंविरुद्ध खेळल्याने व दर्जेदार कामगिरी केल्याने प्रज्ञानंदचा आत्मविश्वास दुणावला असेल. याच आत्मविश्वासासह तो ‘कॅन्डिडेट्स’मध्ये खेळण्याचा निश्चित प्रयत्न करेल.

प्रज्ञानंद आगामी काळात कोणत्या स्पर्धा खेळणार?

क्रमवारीत २९व्या स्थानावर असलेला प्रज्ञानंद आपले गुणांकन वाढवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करणार, हे उघड आहे. त्यासाठी तो अधिकाधिक स्पर्धांमध्ये खेळण्याचा प्रयत्न करेल. जर्मनीत होत असलेल्या जागतिक जलद सांघिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत तो खेळत आहे. त्यानंतर तो सप्टेंबरमध्ये होणाऱ्या टाटा स्टील मास्टर्स स्पर्धेतही सहभाग नोंदवणार आहे. या स्पर्धेत दमदार कामगिरी करून क्रमवारीत बढती मिळवण्याचा प्रज्ञानंदचा मानस असेल. गुकेशने क्रमवारीत अव्वल १०मध्ये प्रवेश मिळवताना विश्वनाथन आनंदलाही मागे टाकले आहे. आता प्रज्ञानंदही अशीच कामगिरी करण्यासाठी प्रयत्नशील असेल.

हेही वाचा : अग्रलेख :..बजाव पुंगी!

अन्य कोणत्या भारतीय बुद्धिबळपटूंवर लक्ष असणार?

विश्वचषकातील उत्कृष्ट कामगिरीसह भारताचे बुद्धिबळविश्वातील स्थान अधिक बळकट झाले आहे. प्रज्ञानंदने ‘कॅन्डिडेट्स’साठी पात्रता मिळवली असून स्पर्धेतील चार जागा अद्यापही रिक्त आहेत. आगामी ‘फिडे’ ग्रँड स्वीस स्पर्धेतील अव्वल दोन बुद्धिबळपटू, २०२३ ‘फिडे सर्किट’चा विजेता आणि जानेवारी २०२४ मध्ये सर्वाधिक गुणांकन असलेला बुद्धिबळपटू ‘कॅन्डिडेट्स’ स्पर्धेसाठी पात्र ठरेल. गुकेश, एरिगेसी, विदित आणि निहाल सरीन यांसारख्या भारतीय बुद्धिबळपटूंसाठी ग्रँड स्वीस स्पर्धेची अंतिम फेरी गाठणे हा ‘कॅन्डिडेट्स’च्या पात्रतेसाठीचा सर्वोत्तम पर्याय असेल. त्यामुळे त्यांच्या कामगिरीकडे बुद्धिबळप्रेमींचे विशेष लक्ष असेल.