– निशांत सरवणकर
आक्रमक कामगार नेते डॉ. दत्ता सामंत यांची १६ जानेवारी १९९७ रोजी पवई येथील त्यांच्या घराजवळ १७ गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली होती. छोटा राजन उर्फ राजन सदाशिव निकाळजे याच्यासाठी त्यावेळी काम करणाऱ्या गुरु साटमने मारेकरी पुरविले आणि छोटा राजनच्या इशाऱ्यावरून सामंत यांची हत्या झाली, असा निष्कर्ष पोलिसांनी काढला. अर्थात सुपारी कोणी दिली हे कायम गुलदस्त्यात राहिले. यातील मारेकऱ्यांना जन्मठेपही झाली. या प्रकरणात भारतात पाठविण्यात आलेल्या छोटा राजनला अटक झाली. छोटा राजनवरील सर्व गुन्ह्यांचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात आल्यामुळे त्यापैकी एक असलेल्या प्रकरणात सीबीआयने २०२० मध्ये आरोपपत्र दाखल केले. आता विशेष न्यायालयाने पुराव्याअभावी छोटा राजन याची निर्दोष मुक्तता केली आहे. या प्रकरणाला २६ वर्षे झाली आहेत. असे का झाले, याबाबत.
प्रकरण काय?
१९८२ मध्ये केवळ एका हाकेने अभूतपूर्व असा गिरणी कामगारांचा संप घडवून आणणारे आक्रमक कामगार नेते व माजी खासदार डॉ. दत्ता सामंत यांची १६ जानेवारी १९९७ रोजी पवई येथील त्यांच्या निवासस्थानापासून काही अंतरावर दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. डॉ. सामंत हे टाटा सुमो गाडीने पंतनगर येथील कार्यालयात जात होते. गॅस सिलिंडर असलेली सायकल डॉ. सामंत यांच्या गाडीसमोर आडवी टाकण्यात आली. चार मारेकऱ्यांनी त्यांच्यावर १७ गोळ्या झाडल्या. डॉ. सामंत यांचा जागीच मृत्यू झाला तर चालक गंभीर जखमी झाला. मात्र तो बचावला. या घटेनेने प्रचंड खळबळ उडाली. शिवसेना-भाजप युतीचे सरकार त्यावेळी सत्तेवर होते. संघटित गुन्हेगारीही खूपच बळावली होती. एका लोकप्रिय कामगार नेत्याची दिवसाढवळ्या हत्या होते ही बाब पोलिसांसाठी आव्हानात्मक होती. या प्रकरणात पोलिसांनी मारेकरी पकडले. त्यांना जन्मठेपही झाली. पण डॉ. सामंत यांची हत्या हा बराच काळ चर्चेचा विषय ठरली होती.
कोण होते डॉ. सामंत?
केईएम रुग्णालयातून एमबीबीएसची पदवी घेतलेले डॉ. दत्ता सामंत यांचा घाटकोपर येथील पंतनगरात वैद्यकीय दवाखाना होता. त्यांची पत्नीही डॉक्टर आहे. या परिसरात ते ‘डॉक्टरसाब’ या नावाने प्रसिद्ध झाले होते. त्याच वेळी गरीब व पिळल्या गेलेल्या औद्योगिक कामगारांशी त्यांचा संबंध आला आणि या कामगारांच्या प्रश्नावर लढताना ते कामगार चळवळीशी जोडले गेले. प्रचंड हटवादी व आक्रमक कामगार नेते अशी त्यांची अल्पावधीतच प्रतिमा बनली. राजकीय दृष्ट्या त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेसशी (इंटक) ते जोडले गेले. व्यवस्थापनाशी आक्रमक राहून कामगारांना भरघोस पगारवाढ मिळवून देण्यात त्यांचा हातखंडा होता. त्यामुळे कामगार संघटनांमध्ये त्यांचा दबदबा वाढू लागला होता आणि व्यवस्थापनामध्ये दहशत निर्माण झाली होती. काँग्रेसच्या तिकिटावर ते विधानसभेत निवडून गेले. तेव्हाही कामगारांच्या प्रश्नावर त्यांनी विधिमंडळ दणाणून सोडले. आणीबाणीच्या वेळी त्यांना अटक झाली. पण तोपर्यंत डॉ. सामंत हा कामगारांमधला झंझावात म्हणून प्रसिद्ध पावला होता. १९८२ मध्ये गिरणी कामगारांनी इंटकचे नेतृत्व झुगारून डॉ. सामंत यांना गळ घातली. तोपर्यंत त्यांचे प्रस्थ वाढले होते आणि व्यवस्थापन वर्तुळात त्यांच्याविषयी दहशत निर्माण झाली होती. त्यांनी कामगार आघाडी या नावे स्वतंत्र चूल मांडली होती. त्यानंतर ‘न भूतो, न भविष्यती’ असा गिरणी कामगारांचा ऐतिहासिक संप झाला. वर्ष-दोन वर्षे हा संप सुरू होता. परंतु डॉ. सामंत यांच्या मागण्या मान्य केल्या तर त्यांचे प्राबल्य वाढेल ही भीती वाटल्याने सरकारने संप ठेचून काढला. त्यातून ते बाहेर आलेच नाही. गिरण्या बंद पडल्या. गिरणी मालकांना आयते कोलीत मिळाले. त्यांनी नंतर गिरण्यांच्या जागा विकसित करून कोट्यवधी रुपये कमावले. अयशस्वी गिरणी संपानंतरही डॉ. सामंत यांचे प्रस्थ तसूभरही कमी झालेले नव्हते. तब्बल चार हजार छोट्या मोठ्या उद्योगात डॉ. सामंत यांच्या कामगार आघाडी युनियनचे प्राबल्य होते. त्यांना अपक्ष खासदार म्हणून दक्षिण मध्य मुंबईतील कामगारांनी भरघोस मतांनी लोकसभेत पाठविले.
हत्येमागील कारण?
व्यवस्थापन व प्रतिस्पर्धी कामगार संघटनांमध्ये असलेला वाद यामुळे त्यावेळी संघटित गुन्हेगारीनेही शिरकाव केला होता. डोंबिवली येथील प्रीमिअर कंपनीमध्ये डॉ. सामंत यांनी संप घडवून आणला. हा संप प्रीमिअरमधील अंतर्गत कामगार संघटनेचे नेते रमेश पाटील यांनी फोडला. कामगार बेरोजगार व कर्जबाजारी झाल्यामुळे संप फोडणे आवश्यक असल्याचे पाटील यांचे म्हणणे होते. मात्र त्यामुळे डॉ. सामंत संतापले होते व त्यांना रमेश पाटील यांचा काटा काढण्यासाठी सुरेश मंचेकर (हा गुंड पोलीस चकमकीत मारला गेला) याला सुपारी दिल्याची आवई उठली होती. त्यामुळे अस्वस्थ झालेले रमेश पाटील व त्यांच्या साथीदारांनी कुख्यात गुंड गुरू साटमशी हाँगकाँग येथे संपर्क साधला व डॉ. सामंत यांना मारण्याची सुपारी दिली, अशी शक्यता तेव्हा पोलिसांनी मांडली होती. डॉ. सामंत यांची सुपारी घेण्यास छोटा राजननेच संमती दिली, असाही पोलिसांचा दावा होता. चेंबूर येथे राहणारा अशोक सातार्डेकर (ज्याची डॉ. सामंत हत्याप्रकरणातून निर्दोष सुटका झाली) हा छोटा राजनचा लहानपणापासूनचा मित्र होता. तो कुर्ला येथील प्रीमिअर कंपनीत कामाला होता. तेथे डॉ. सामंत यांचीच कामगार संघटना होती. सततच्या संपामुळे डॉ. सामंत आणि सातार्डेकर यांच्यात मतभेद निर्माण झाले होते. भांडणे वाढल्यानंतर सातार्डेकर याने, आपल्याला डॉ. सामंत यांच्यापासून जिवाला धोका असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली होती. आपल्या साथीदारालाही डॉ. सामंत यांच्यापासून धोका असल्याचे समजल्यानंतर छोटा राजनने डॉ. सामंत यांचा काटा काढण्यासाठी गुरू साटमला हिरवा कंदील दाखविला व छोटा राजनने स्वत: कच रचला, अशीही एक शक्यता वर्तवली जाते.
सद्यःस्थिती काय?
डॉ. सामंत यांच्या हत्येप्रकरणात त्यावेळी गुन्हे अन्वेषण विभागाने नऊ जणांना अटक केली. त्यापैकी विजय थोपटे, गणपत बामणे व अनिल लोंढे या मारेकऱ्यांना जन्मठेप झाली. यापैकी लोंढे तुरुंगात मरण पावला. थोपटे व बामणे जन्मठेप भोगत आहेत. यातील रमेश पाटील यांनाही सुरुवातीला मुख्य आरोपी म्हणून अटक करण्यात होती. परंतु पुराव्याअभावी २००० मध्ये त्यांची मुक्तता करण्यात आली. गुरु साटम अद्याप या खटल्यात फरारी आहे. डॉ. सामंत यांची कामगार आघाडीची युनियन फोडून डोंबिवलीतील प्रीमिअर कंपनीत स्वतंत्र कामगार संघटना स्थापन झाली होती. त्यातूनच डॉ. सामंत यांची हत्या करण्यात आली ही शक्यता पोलिसांनी कायम ठेवली होती.
हेही वाचा : दत्ता सामंत हत्येप्रकरणी छोटा राजनची पुराव्यांअभावी निर्दोष सुटका; विशेष सीबीआय न्यायालयाचा निर्णय
छोटा राजन का सुटला?
या खटल्यातून २६ वर्षांनंतर छोटा राजनची निर्दोष मुक्तता झाली आहे. छोटा राजनचा सहभाग असल्याचा पुरावा आढळलेला नाही, असे विशेष न्यायालयाचे म्हणणे आहे. या खटल्यात एकूण २२ साक्षीदार होते. त्यापैकी आठ साक्षीदार फुटले. त्यात डॉ. सामंत यांचा चालकही होता. याबाबत सादर केलेला वस्तुस्थितीदर्शक पुरावा तसेच इतर साक्षही छोटा राजनचा या गुन्ह्यात सहभाग स्पष्ट करण्यासाठी पुरेशी नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे. डॉ. दत्ता सामंत यांची हत्या कामगार संघटनांमधील वैमनस्यातून झाल्याचा पोलिसांचा दावा आहे. हत्या झाल्यानंतर त्यामागील मुख्य हेतू कधीच बाहेर येत नाही. तसेच या खटल्यातही झाले आहे. गुन्हे अन्वेषण विभागाकडून हा तपास सीबीआयकडे गेला आहे. त्यातच ही मेख आहे, असे तेव्हाच्या तपास अधिकाऱ्यांना वाटत आहे. जे. डे. हत्या प्रकरणात छोटा राजनला जन्मठेप होऊ शकते. मग या प्रकरणात का नाही, असा सवाल हे अधिकारी विचारत आहेत.
nishant.sarvankar@expressindia.com