– सुनील कांबळी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या जानेवारीत अमेरिकी संगीतकार-गायिका लिसा मेरी प्रेस्ली यांच्या अकाली निधनाने जगभरातील चाहते हळहळले. त्यांचा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला होता. मात्र, त्यासाठी लठ्ठपणावरील शस्त्रक्रियेनंतर उद्भवलेला आंत्रावरोध कारणीभूत ठरल्याचे शवचिकित्सा अहवालातून नुकतेच स्पष्ट झाले. लठ्ठपणा कमी करण्याबरोबरच सौंदर्यवृद्धीसाठी ही शस्त्रक्रिया करण्याचे प्रमाण वाढले असताना प्रेस्ली मृत्यू प्रकरणाचा वेध आवश्यक ठरतो.

लिसा प्रेस्ली यांचा मृत्यू कसा झाला?

लिसा प्रेस्ली या प्रख्यात पॉपस्टार दिवंगत मायकल जॅक्सन यांच्या पत्नी आणि दिवंगत गायक एल्विस प्रेस्ली यांच्या कन्या. १२ जानेवारी २०२३ रोजी लॉस एंजेलिस येथील घरी लिसा प्रेस्ली या बेशुद्धावस्थेत आढळल्या. रुग्णालयात दाखल केल्यानंतर काही तासांतच त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यांचे निधन हृदयविकाराने झाल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, लठ्ठपणा कमी करण्यासाठी त्यांच्यावर झालेल्या (बॅरिॲट्रिक) शस्त्रक्रियेच्या दुष्परिणामामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे शवचिकित्सा अहवालातून नुकतेच स्पष्ट झाले. शस्त्रक्रियेनंतरच्या व्रणामुळे प्रेस्ली यांच्या छोट्या आतड्यात अवरोध निर्माण झाला. त्यामुळे त्यांना जीव गमवावा लागल्याचे शवचिकित्सा अहवालात म्हटले आहे.

बॅरिॲट्रिक शस्त्रक्रिया काय आहे?

बॅरिॲट्रिक सर्जरी म्हणजे लठ्ठपणा कमी करण्यासाठी केली जाणारी शस्त्रक्रिया. लठ्ठपणा किंवा अतिलठ्ठपणा कमी करण्यासाठी इतर उपचार निरुपयोगी ठरल्यानंतर जठर आणि आतड्याच्या रचनेत या शस्त्रक्रियेद्वारे बदल केला जातो. बॅरिॲट्रिक शस्त्रक्रियेसाठी वेगवेगळ्या पद्धती अवलंबण्यात येतात. जठराचा काही भाग काढून त्याच्या रचनेत बदल करण्याच्या पद्धतीसह अनेक पद्धतीचा अवलंब जातात. प्रेस्ली यांच्यावरील शस्त्रक्रियेत कोणती पद्धत वापरण्यात आली, हे स्पष्ट झालेले नाही. उच्चभ्रू आणि स्वत:च्या शरीरप्रतिमेबद्दल जागरूक असलेल्या मंडळींना सौंदर्यवृद्धी करण्याचा उपाय म्हणून ही शस्त्रक्रिया करण्याचे प्रमाण वाढले आहे. अमेरिकेत २०२१ मध्ये २,६३,००० अशा शस्त्रक्रिया झाल्याचे ‘अमेरिकन सोसायटी फॉर मेटॅबोलिक ॲन्ड बॅरिॲट्रिक सर्जरी’च्या अध्यक्ष डॉ. मरीना कुरियन यांनी सांगितले.

या शस्त्रक्रियेत जोखीम किती?

‘‘सामान्यतः ही शस्त्रक्रिया पूर्णतः सुरक्षित आहे. शस्त्रक्रियेचा मोठा दुष्परिणाम निर्माण होण्याचा धोका चार टक्के, तर मृत्यूचा धोका ०.४ टक्के आहे. त्यामुळे पित्ताशयाच्या शस्त्रक्रियेपेक्षा ही सुरक्षित आहे’’, असे डॉ. कुरियन यांचे म्हणणे आहे.

शस्त्रक्रियेचा दुष्परिणाम काय असू शकतो?

बॅरिॲट्रिक शस्त्रक्रियेनंतरचे व्रण आंत्रविकारास निमंत्रण देऊ शकतात. प्रेस्ली यांच्या छोट्या आतड्यात अवरोध निर्माण झाला होता. या शस्त्रक्रियेनंतर आंत्रावरोधामुळे मृत्यू होण्याची घटना दुर्मीळ असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. प्रेस्ली यांनी मृत्यूच्या दिवशी सकाळी पोटात दुखत असल्याचे सांगितले होते, याकडेही डॉ. कुरियन यांनी लक्ष वेधले. मात्र, त्यांना अनेक महिन्यांपासून पोटात दुखत असावे, असा डॉक्टरांचा अंदाज आहे.

हेही वाचा : २१० किलो वजन उचलण्याच्या प्रयत्नात गेला जीव, फिटनेस ट्रेनरचा दुर्दैवी अंत

प्रेस्ली यांना आनुवंशिक आजार होता?

बॅरिॲट्रिक शस्त्रक्रियेनंतर लिसा प्रेस्ली यांना आंत्रावरोधाचा धोका वाढला. मात्र, त्यांना जन्मापासूनच पचनक्रियेचा त्रास होता, अशी माहिती पुढे आली आहे. त्या त्यास ‘क्रॉनिक प्रेस्ली प्रॉब्लेम’ असे म्हणायच्या. त्यांचे वडील दिवंगत प्रख्यात गायक एल्विस प्रेस्ली यांनाही जन्मापासूनच आतड्यांचा आजार होता. शिवाय औषध-गोळ्यांमुळे एल्विस यांची पचनक्रिया मंदावली असल्याचे सांगण्यात येते. एल्विस यांचे १९७७ मध्ये वयाच्या ४२ व्या वर्षी निधन झाले. त्यामुळे फक्त लठ्ठपणा कमी करण्यासाठी नव्हे, तर आतड्याचा या आनुवंशिक आजारामुळे लिसा यांच्यावर बॅरिॲट्रिक शस्त्रक्रिया करण्यात आली असावी, असाही अंदाज वर्तविण्यात येत आहे. मृत्यूआधी दोन दिवसांपूर्वी प्रेस्ली ‘गोल्डन ग्लोब’ सोहळ्यात सहभागी झाल्या होत्या. या सोहळ्यानंतर दोनच दिवसांनी तिच्या मृत्यूचे वृत्त पसरल्यानंतर चाहत्यांना धक्का बसला होता. आता शवचिकित्सा अहवालातील निष्कर्षामुळे लिसा यांचा मृत्यू हा त्यांच्या अल्पायुषी ठरलेल्या वडिलांच्या आजाराशी जोडला जात आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Analysis of death of lisa marie presley obesity operation print exp pbs
Show comments